Representative Image

भारतीय हवामान विभागाने देशाच्या बहुतेक भागात उष्णतेच्या लाटेचा (Heatwave) इशारा जारी केला आहे. आयएमडीने म्हटले आहे की, पुढील काही दिवसांत दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात पारा 2 ते 5 अंशांनी वाढण्याची शक्यता आहे. मार्च ते मे दरम्यान 30 ते 35 दिवस तीव्र उष्णतेची लाट राहील असेही सांगण्यात आले आहे. महाराष्ट्रात तापमानात सातत्याने वाढ होत असताना, नवी मुंबई महानगरपालिकेने (NMMC) रहिवाशांना उष्माघातापासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. यासाठी महापालिकेने काही सुचना जारी केल्या आहेत.

जाणून घ्या काय आहे उष्णेतेची लाट-

मार्च महिन्यापासून राज्यातील अनेक भागात तापमान वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. हिट वेव्ह किंवा उष्णेतेची लाट ही एक मूक आपत्ती (सायलेंट डिझास्टर) आहे. साधारणपणे एखादया प्रदेशात सलग तीन दिवस नेहमीच्या कमाल तापमानापेक्षा वातावरणातील तापमान 3 डिग्री सेल्सियसने जास्त असेल किंवा सलग दोन दिवसांसाठी 45 डिग्री सेल्सियस पेक्षा जास्त असेल तर त्याला उष्णतेची लाट असे संबोधतात. यामुळे माणसांसोबतच पक्षी, प्राणी, वनस्पती यांची होणारी हानी मोठी आहे. साधारणपणे मार्च ते मे या मान्सून पूर्वकाळात उष्णतेच्या लाटा येताना दिसतात.

अति उष्णतेच्या लाटेसाठी नागरिकांना सुचना-

अति उष्णतेच्या लाटेसाठी हवामान बदल आणि मानवी आरोग्यावरील राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत सार्वजनिक आरोग्य विभाग यांचेमार्फत खालीलप्रमाणे सुचना देण्यात येत आहेत.

‘हे’ करा-

तहान लागली नसली तरीही जेव्हा शक्य असेल तेव्हा पुरेसे पाणी प्यावे.

प्रवास करताना पिण्याचे पाणी सोबत ठेवावे.

ओरल रिहायड्रेशन सोल्यूशन (ORS) वापरावे आणि लिंबू पाणी, ताक लस्सी आणि फळांचे रस यांसारखी घरगुती पेये प्यावीत.

टरबूज, खरबूज, संत्री, द्राक्षे, अननस, काकडी, कोशिंबीर तसेच स्थानिक उपलब्ध फळे आणि भाज्या यासारखी उच्च जलसामग्री असलेली हंगामी फळे आणि भाज्या खाव्यात.

पातळ, सैल, सुती आणि शक्यतो हलक्या रंगाचे कपडे घालावेत.

डोके झाकून ठेवावे. थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात असताना छत्री, टोपी, टॉवेल आणि इतर पारंपारिक साधनांचा वापर करावा.

उन्हात बाहेर जाताना बूट किंवा चप्पल घालाव्यात.

हवेशीर आणि थंड ठिकाणी जास्त वेळ घालवावा.

थेट सूर्यप्रकाश आणि उष्णतेच्या लाटा रोखाव्या. दिवसा खिडक्या आणि पडदे बंद ठेवावेत, विशेषतः घराच्या सूर्यप्रकाशाच्या बाजूला थंड हवा येण्यासाठी त्यांना  रात्री खिडक्या उघड्या कराव्यात.

स्वयंपाक करताना पुरेशा प्रमाणात हवा येण्यासाठी दरवाजे आणि खिडक्या उघड्या ठेवाव्यात.

घराबाहेर जात असाल, तर घराबाहेरील कामे शक्य असल्यास  सकाळ आणि  संध्याकाळ या वेळेच्या मर्यादेत करावीत.

दिवसाच्या थंड वेळांमध्ये बाहेरील कामांचे नियोजन करावे.

'हे' करू नये-

उन्हात बाहेर पडणे, विशेषत: दुपारी १२:०० ते ०३:०० या वेळेत.

दुपारच्या वेळी बाहेर असताना कठोर परिश्रम करणे टाळावे.

अनवाणी बाहेर जाणे.

अल्कोहोल, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक्स किंवा मोठ्या प्रमाणात साखर असलेली पेय पिणे.

उच्च प्रथिनेयुक्त अन्न, आणि शिळे अन्न खाणे

उभ्या केलेल्या वाहनांमध्ये लहान मुले किंवा पाळीव प्राणी यांना एकटे सोडणे.

Advisory On Heatwave:

संवेदनशील किंवा जोखीमीचे घटक-

लहान अर्भक आणि लहान मुले, घराबाहेर काम करणारे लोक, गर्भवती महिला, ज्यांना मानसिक आजारपण असलेल्या व्यक्ती, शारीरिकदृष्ट्या आजारी, विशेषतः हृदयरोग किंवा उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्ती अतिसंवेदनशील आहेत. कोणालाही उष्णतेचा ताण आणि उष्णतेशी सबंधित आजाराचा त्रास होऊ शकतो, तरीही या लोकांना इतरांपेक्षा जास्त धोका असतो आणि त्यांच्याकडे अतिरिक्त लक्ष द्यावे. एकटे राहणाऱ्या वृद्ध किंवा आजारी व्यक्तींवर देखरेख ठेवली पाहिजे. त्यांच्या आरोग्याचे दररोज निरीक्षण केले पाहिजे.

आरोग्यसेवा तयारी-

नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत महानगरपालिकेची सर्व रुग्णालये व नागरी आरोग्य केंद्र या स्तरांवर केंद्र व राज्य शासनाच्या वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या सूचना देण्यात येत आहेत  व त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. तरी नवी मुंबई नागरिकांनी खबरदारीचा भाग म्हणून काय करावे व काय करू नये या संदर्भातील सूचनांचे पालन करावे आणि उष्माघात संदर्भात लक्षणे आढळून आल्यास त्वरित नमुंमपाच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र व रुग्णालयातून उपचार घ्यावेत असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.