भारतासोबतच जगभरात मागील 6 महिन्यांपासून कोरोना व्हायरसने (Coronavirus) थैमान घातले आहे. जगभरातील कोरोनाबाधितांचा आकडा अंदाजे 28,054,015 पेक्षा अधिक आहे. अद्याप या आजारावर ठोस उपाय, उपचार किंवा लस नसल्याने सध्या त्याचा फैलाव रोखण्यासाठी केवळ 'टेस्टिंग टेस्टिंग आणि टेस्टिंग' वरच भर द्या असा घोषा केला जात आहे. जागतिक आरोग्य संघटना ते मुंबई महानगर पालिका सध्या Chase The Virus च्या ध्येयाने या जागतिक आरोग्य संकटाचा सामना करत आहेत. मग कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊन तुम्हांला कोविड 19 ची बाधा झाली आहे का? याचा शोध घेण्यासाठी सध्या विविध चाचण्या भारत सरकारने मान्य केल्या आहेत. त्यापैकी प्रामुख्याने RT-PCR, Antigen आणि Antibody टेस्टिंगच्या माध्यमातून कोरोना संसर्गाचा शोध घेतला जातो. साधा सर्दी, ताप, खोकला झाला तरीही आजकाल अनेकांच्या मनात 'कोरोना तर नसेल ना?' ही शंकेची पाल चुकचुकते. मग जो पर्यंत लस किंवा ठोस उपाय मिळत नाही तोपर्यंत या कोरोना व्हायरसशी सामना करण्यासाठी आपल्याला कोविड टेस्ट (COVID Test) चं शस्त्र म्हणून वापरून त्याला प्रसार रोखायचा आहे. पण कोविड 19 चं निदान करण्यासाठी वेगवेगळ्या टेस्ट का? त्यातली नेमकी विश्वासार्ह कोणती? कोणी कधी आणि कुठली टेस्ट करायला पाहिजे? असे एक ना दोन हजार प्रश्न तुमच्या मनात असतील तर जाणून घ्या तुमच्या मनातल्या याच काही प्रश्नाची उत्तरं!
RT-PCR Test
कोरोना व्हायरस संसर्गाचं नेमकं निदान करण्यासाठी सध्या जगभरात RT-PCR Test केली जाते. यामध्ये नाकातून आणि घशाच्या मागील भागातून स्वॅब घेतले जातात. ते लॅब मध्ये पाठवून किमान 24 तासात त्याचा निकाल दिला जातो. दरम्यान भारतामध्ये सध्या ही टेस्ट कोरोनाची लक्षण असणार्यांसाठी बंधनकारक आहे. खाजगी, सरकारी लॅब्समध्ये ती केली जाते. मात्र इतर टेस्टच्या तुलनेत RT-PCR खर्चिक आणि निदान हाती येण्यास प्रतिक्षा करायला लावणारी आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अधिकाधिक लोकांनी वेळीच निदान करण्यासाठी पुढे यावं याकरिता आता सरकार त्याचे दर कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे.
जर RT-PCR Test मध्ये अहवाल पॉझिटीव्ह आला तर रूग्णालयात किंवा होम आयसोलेशनमध्ये उपचार केले जातात. निगेटीव्ह आला तर तुम्हांला संसर्ग नाही असे सांगितले जाते. Mouth Rash COVID 19 Symptom: तोंडात रॅश हे कोविड 19 चं संभाव्य लक्षण, अधिक अभ्यासाची गरज; स्पेन संशोधकांचा दावा.
Antigen टेस्ट
भारतामध्ये काही महिन्यांपूर्वी RT-PCR सोबतच Antigen टेस्ट साठी देखील आयसीएमआरने परवानगी दिली आहे. या टेस्टचा प्रमुख फायदा म्हणजे अवघ्या काही मिनिटांत ती टेस्ट निकाल देऊ शकते. एकाच वेळी मोठ्या प्रमाणात टेस्ट करता येऊ शकते. त्यामुळे दाटीवाटीच्या भागांमध्ये लोकांना अलग करून प्रसार रोखण्यासाठी ही टेस्ट महत्त्वाची आहे. यामध्ये नाकातून स्वॅब घेऊन टेस्ट केलं जातं. सामान्यपणे शरीरात प्रवेश करणाऱ्या विषाणूंवर अँटीजेन्स असतात. त्यांचं निदान करण्यासाठी विशिष्ट कीट असतं. आता ICMR ने अॅन्टीजन टेस्ट मध्ये अहवाल निगेटीव्ह आला आणि कोरोनाची लक्षणं असतील तर RT-PCR Test बंधनकारक केली आहे. मात्र Asymptomatic निगेटीव्ह असेल तर खात्री करून घेण्यासाठी RT-PCR Test ही ऐच्छिक आहे. जर अॅन्टिजन टेस्टमध्ये दोष असेल तर चूकीचे रिपोर्ट्स मिळू शकतात. त्यामुळे लक्षणं असणार्यांना केवळ अॅन्टिजन टेस्टचा सल्ला दिला जात नाही. अॅन्टीजन रिपोर्ट पॉझिटिव्ह असलेल्यांमध्ये नक्कीच कोरोनाचा संसर्ग झालेला असतो.
RT-PCR आणि अॅन्टिजन या दोन मुख्य डायनोस्टिक टेस्ट आहेत.
अॅन्टी बॉडी टेस्ट
अॅन्टी बॉडी टेस्ट ही सेरो सर्व्हलंस साठी प्रामुख्याने वापरली जाते. कोविड योद्धा म्हणून काम करणार्यांमध्ये, त्यांच्या शरीरात अॅन्टी बॉडीज तयार झाल्या आहेत का? हे तपासण्यासाठी अॅन्टी बॉडी टेस्ट वापरल्या जातात. मात्र सामान्यांची अॅन्टी बॉडी टेस्ट केली तर त्यामध्ये दोन टप्प्यातील निष्कर्षामधूनही कोरोना संसर्गाचा अंदाज लागू शकतो.
रक्ताच्या नमुन्यमधून ही टेस्ट होते. IgG चं प्रमाण आढळलं तर ते संसर्ग होऊन गेल्याचे संकेत देतात. IgM मध्ये इंफेक्शन ताजं असल्याचं संकेत देतात. यामधूनही संसर्गातून अॅन्टीबॉडीज निर्माण झाल्यानंतर इतर अत्यावस्थ कोरोना बाधित लोकांना प्लाझ्मा दान करून जीव वाचवण्यासाठी मदत करण्यास फायदेशीर ठरते.
भारत हा सध्या जगात कोरोनाबाधितांच्या आकडेवारीमध्ये दुसर्या क्रमाकांवर आहे. आता दिवसागणिक कोरोनाव्हायरसच्या फैलावाचं प्रमाण वाढत आहे. काही लोकांमध्ये दुसर्यांदा इंफेक्शन झाल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे वेळोवेळी शरीराकडून तुम्हांला मिळत असलेल्या संकेतांकडे लक्ष ठेवा. कोरोनाची लक्षणं असल्यास योग्य चाचणी करा. लवकर निदान झाल्यास आजारावर लवकर मात करण्यास मदत होत आहे. त्यामुळे टेस्टिंगला घाबरू नका.