World AIDS Day 2019: जागतिक एड्स दिनानिमित्त जाणून घ्या कसा होतो हा आजार, याची लक्षणे आणि टाळण्याचे उपाय
World AIDS Day (Photo Credits: Pixabay)

एचआयव्ही (HIV) संसर्गामुळे होणाऱ्या आजारामुळे, म्हणजेच एड्समुळे (AIDS) जगभरात दररोज 320 मुलांचा मृत्यू होत आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या युनिसेफच्या म्हणण्यानुसार, एचआयव्ही-बाधित 0-14 वर्षांच्या मुलांचे मृत्यू होण्याचे मुख्य कारण म्हणजे योग्य उपचारांचा अभाव हे आहे. भारतामध्येही साधारण हीच आकडेवारी पाहायला मिळते. आता तर राजधानी दिल्ली मध्ये अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या लोकांमध्ये एड्सचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. म्हणूनच आजच्या ‘जागतिक एड्स दिना’निमित (World AIDS Day 2019) जाणून घ्या कसा होतो हा आजार, याची लक्षणे आणि टाळण्याचे उपाय.

विविध मार्गांनी एच. आय. व्ही. विषाणूचा शरीरात प्रवेश झाल्यावर शरीराची रोग प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे विविध रोगांची लक्षणे दिसू लागतात, या रोगांचा समूह म्हणजे एड्स होय. एड्स असणारी व्यक्ती अगदी सर्वसामान्यांप्रमाणे दिसत असली तरी, या रोगाची ढोबळमानाने काही लक्षणे आहेत.

लक्षणे - 

वजन कमी होते, सतत किंवा जास्त कालावधीसाठी जुलाब, त्वचेवर वरचेवर खाज, एका महिन्यापेक्षा जास्त काळ खोकला, तोंडात व घशात फोड ही प्रमुख लक्षणे दिसतात. तसेच वरचेवर न्युमोनिया, फुफ्फुसाचा क्षय, नागीण, कावीळ, अन्ननलिकेला बुरशीमुळे येणारी सूज, कातडीचे आजार, त्वचा कर्करोग असे अनेक आजार होतात

एड्स कसा होतो - 

एच.आय.व्ही. बाधित व्यक्तीबरोबर असुरक्षित शारीरिक संबंध ठेवणे, एच.आय.व्ही. बाधित व्यक्तीची इंजेक्शन व सुई अबाधित व्यक्तीसाठी वापरल्यास, एच.आय.व्ही. बाधित रक्त दिल्यास आणि एच.आय.व्ही. बाधित पालकांकडून त्यांच्या मुलांस अशाप्रकारे हा रोग पसरतो.

एड्स टाळण्याचे काही उपाय –

आजारावर रामबाण औषध अथवा लस उपलब्ध नाही, म्हणून प्रतिबंध हाच उत्तम मार्ग होय.

> लैंगिक संबंधावेळी कंडोम वापरला तर एडस टाळू शकतो असा काही लोकांचा समज असतो, मात्र कंडोम वापरूनही एड्स झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे लग्नाबाहेरील लैंगिक संबंध टाळणे हा यावरील सर्वोत्तम उपाय आहे.

> लग्नाआधी प्रत्येक मुला-मुलीने भावी जोडीदाराची एड्सची चाचणी करावी.

> इंजेक्शन घेण्यासाठी प्रत्येक वेळी नवीन सिरींज आणि सुईचा वापर करावा

> शरीरात रक्त घेण्यापूर्वी ते अधिकृत रक्तपेढीतीलच आहे याची खात्री करून घ्यावी.

> तुम्हाला कोणताही त्वचाविकार, गुप्तरोग किंवा प्रायव्हेट पार्टसच्या जागी इन्फेक्शन झाले असल्यास त्वरित डॉक्टरांच्या सल्ल्याने उपाय योजना करणे. (हेही वाचा: Pakistan HIV Outbreak: पाकिस्तान मधील सिंध येथे 500 हून अधिक लोकांना AIDS चे निदान)

> गोंदवून घेताना अस्वच्छ हत्यारे तर नाहीत ना याची खात्री करावी.

मात्र लक्षात घ्या, एच.आय.व्ही. बाधित व्यक्तीला स्पर्श केल्याने, त्या व्यक्तीशी हस्तांदोलन केल्याने, गळाभेट घेतल्याने, एका ताटात जेवल्याने, भांडी वापरल्याने, एकाच स्नानगृहाचा किंवा शौचालयाचा वापर केल्याने एड्स होत नाही.

(सूचना : या लेखाचा उद्देश हा माहिती देणे हा आहे, यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे)