Image used for representational purpose | (Photo Credits: Getty Images)

पाकिस्तानात (Pakistan) तब्बल 500 लोकांना एचआयव्हीची (HIV) बाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला  आहे. यात अनेक लहान मुलांचा समावेश आहे. संसर्ग असलेल्या सुईने इंजेक्शन दिल्यामुळे अनेक मुले एचआयव्हीच्या जाळ्यात अडकली आहेत. सिंधमधील लंकारा परिसरातील वायसो गावातील ही घटना आहे.

सरकारकडून एका कॅम्प चालवण्यात येत असून यात अनेक लोकांना एचआयव्ही झाल्याचे निदान झाले आहे. या प्रकरणी मुजफ्फर घुर्गानो याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी तपासणी अधिकारी अधिक तपास करत असून या प्रकारणामागील नेमक्या कारणाचा शोध घेतला जात आहे. संसर्ग असलेल्या सुईने इंजेक्शन दिल्यामुळे हा सर्व प्रकार घडला की हा एक अपघात होता, याचा तपास केला जात आहे.

सिंध एड्स कंट्रोल प्रोग्रॅम चीफ सिंकदर मेनन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, आतापर्यंत लंकारा येथून आतापर्यंत तब्बल 13800 लोकांची तपासणी झाली असून त्यापैकी 410 मुले आणि 100 प्रौढ नागरिकांना एचआयव्ही झाल्याचे निदान झाले आहे.

संपूर्ण पाकिस्तानात गेल्या दोन दशकात सुमारे 23000 एचआयव्ही रुग्ण असल्याची नोंद झाली आहे. पाकिस्तानात एचआयव्हीचे प्रमाण कमी असल्याचे मानले जात असले तरी ग्रामीण भागात संसर्ग झालेल्या सुयांचा वापर सर्रास केला जातो. ग्रामीण भागातील राज्य आरोग्य विभागातील असुविधांमुळे या घातक रोगाचा प्रसार होत असल्याचे हेडल एक्सपर्ट्सने सांगितले आहे.