एकीकडे संपूर्ण जग कोरोना व्हायरस (Coronavirus) साथीच्या आजाराने ग्रस्त आहे, तर दुसरीकडे, 'म्यूकोर्मिकोसिस' (Mucormycosis) या रोगाच्या आजाराला लोक बळी पडत आहेत. हा रोग जरी नवीन नसला तरी साथीच्या आजाराने आधीच अडचणीत सापडलेल्या लोकांसाठी हा धोका बनत आहे. दिल्ली, मुंबई आणि अहमदाबाद अशा अनेक शहरांमध्ये हा धोकादायक बुरशीजन्य संसर्ग फैलावत आहे. आतापर्यंत या आजाराने ग्रस्त 44 रुग्णांना अहमदाबादच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले आहे, तर येथे या संसर्गामुळे 9 लोकांचा मृत्यू झाला आहे.
अनियंत्रित मधुमेह, मूत्रपिंड, उच्च रक्तदाब आणि लठ्ठपणाशी झुंज देणार्या लोकांना विशेषत: जागरूक राहण्याची गरज आहे. असे अनेक आजार असलेल्या लोकांसाठी या म्यूकोर्मिकोसिसचा धोका अधिक वाढला आहे. या आजारामुळे 9 लोकांच्या मृत्यूसह दोन जणांची दृष्टी गेली आहे. म्यूकोर्मिकोसिस एक दुर्मिळ बुरशीजन्य संसर्ग आहे, याला झिगॉमायकोसिस (Zygomycosis) देखील म्हणतात. या रोगात रोग आणि जंतूंचा सामना करण्याची क्षमता कमी होते.
सिव्हिल हॉस्पिटलकडून मिळालेल्या माहितीनुसार, बहुविध आजार असलेल्या लोकांसाठी कोरोना व्हायरस ही मोठी समस्या आहे. कोरोनामधून बरे झाल्यांनतर असे लोक इतर आजारांना बळी पडतात. म्यूकोर्मिकोसिसमुळे अशा रुग्णांना त्यांच्या रक्त नलिकामध्ये गुठळ्या होण्याच्या तक्रारी येत आहेत. यामुळे त्यांची साखरेची पातळी लक्षणीय वाढते. याशिवाय नाक आणि कानात संसर्ग झाल्यानंतर बुरशी उद्भवते व त्यामुळे संपूर्ण चेहऱ्यावर सूज येते. महत्वाचे म्हणजे रुग्णांच्या डोळ्यावर याचा परिणाम होतो व त्यामुळे योग्य वेळी उपचार न मिळाल्यामुळे डोळ्यांची दृष्टी जाऊ शकते.
अहमदाबादच्या सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉक्टर बेलाबेन प्रजापती यांच्या म्हणण्यानुसार, या आजारामध्ये पहिल्यांदा रुग्णाला सर्दी होते त्यानंतर कफ व पुढे याचा परिणाम डोळ्यांवर होतो. एकदा फंगल इन्फेक्शन झाल्यावर त्वरित उपचार करणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत नाकात सूज किंवा जास्त वेदना असल्यास, अस्पष्ट दिसत असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. (हेही वाचा: रशियामध्ये भारतीय बनवटीचे Sputnik V चे सॅम्पल टेस्ट साठी सज्ज; देशात 2021 पर्यंत तयार होणार 300 मिलियन डोस)
दरम्यान, अनेक राज्यांमध्ये कोविड रुग्णांमध्ये 'म्यूकोर्मिकोसिस’ आजार आढळून आला आहे. पूर्वीदेखील हा आजार समोर आला होता मात्र आता कोविड पेशंटमध्ये याचा धोका जास्त आहे.