Indian Spices to Treat Cancer: आता भारतीय मसाल्यांचा वापर करून होणार कर्करोगावर उपचार; IIT मद्रासच्या संशोधकांनी घेतले पेटंट
Cancer Cell | Image used for representational purpose (Photo Credits: Pixabay)

Indian Spices to Treat Cancer: मसाल्यांमुळे (Spices) जेवणाची चव तर वाढतेच, पण असे अनेक मसाले आहेत जे कर्करोगासारख्या (Cancer) आजारांवर रामबाण उपाय ठरतात. आता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT), मद्रास येथील संशोधकांनी भारतीय मसाल्यांच्या वापराचे पेटंट घेतले आहे, जे कर्करोगासारख्या प्राणघातक आजाराच्या उपचारात प्रभावी ठरू शकतात. या मसाल्यांचा वापर करून औषधी गुणधर्म असलेली औषधे 2028 पर्यंत बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले.

त्यांनी सांगितले की भारतीय मसाल्यापासून बनवलेल्या नॅनोमेडिसिनद्वारे फुफ्फुस, स्तन, कोलन, ग्रीवा, तोंड आणि थायरॉईडमधील कर्करोगाच्या पेशींवर परिणाम दिसून आला आहे. मात्र, ही औषधे सामान्य पेशींवर सुरक्षित असल्याचे आढळून आले. संशोधक सध्या सुरक्षा आणि किमतीच्या समस्या सोडवण्यावर काम करत आहेत जे सध्याच्या कर्करोगाच्या औषधांचे सर्वात मोठे आव्हान आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले अशा औषधांचा प्राण्यांवर अलीकडेच यशस्वी अभ्यास करण्यात आला आहे. 2027-28 पर्यंत ही औषधे बाजारात उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आता क्लिनिकल चाचण्यांचे नियोजन केले जात आहे. आयआयटी मद्रासच्या केमिकल इंजिनीअरिंग विभागाचे प्राध्यापक आर. नागराजन म्हणाले की, ‘भारतीय मसाल्यांचे अनेक आरोग्यासाठी फायदे आहेत. त्यांच्या जैवउपलब्धतेमुळे त्यांचा उपयोग आणि वापर मर्यादित आहे. नॅनो-इमल्शन फॉर्म्युला या मर्यादांवर मात करते. नॅनो-इमल्शनची स्थिरता विचारात घेणे महत्त्वाचे होते आणि हे सूत्र आमच्या प्रयोगशाळेत स्वीकारले गेले. कर्करोगाच्या पेशींशी सक्रिय घटक आणि त्यांच्या परस्परसंवादाच्या पद्धती ओळखण्यासाठी अभ्यास आवश्यक आहेत आणि हे अभ्यास आमच्या प्रयोगशाळांमध्ये सुरूच राहतील.’ (हेही वाचा: Norovirus In America: अमेरिकेत वेगाने पसरतोय नवीन 'नोरोव्हायरस'; काय आहेत या व्हायरसची लक्षणे? जाणून घ्या)

नागराजन पुढे म्हणाले की नॅनो-ऑन्कोलॉजीचे पारंपरिक कर्करोग उपचार थेरपीपेक्षा बरेच फायदे आहेत. नॅनो-ऑन्कोलॉजीमध्ये कोणतेही दुष्परिणाम नाहीत आणि उपचारांचा खर्च कमी आहे. दरम्यान, जगात सर्वाधिक मृत्यू होणा-या आजारांमध्ये हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर कर्करोग दुसऱ्या क्रमांकावर आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या आकडेवारीनुसार, 2020 मध्ये कर्करोगाने सुमारे एक कोटी लोकांचा जीव घेतला. म्हणजेच जगातील प्रत्येक सहा मृत्यूंपैकी एक मृत्यू कर्करोगामुळे होतो.