भारतीय तरुणांमध्ये वाढतोय Heart Attack चा धोका; जाणून घ्या काय आहेत तारुण्यपणी हृदयविकाराचा झटका येण्याची कारण
प्रतीकात्मक तस्वीर Photo Credits: Pixabay)

Heart Attack Problem in Youth: बदलती जीवनशैली आणि स्वतःसाठी पुरेसा वेळ न दिल्यास याचा आरोग्यावर विपरित परिणाम होतो. काही आजार वृद्धापकाळात उद्भवू शकतात. परंतु, गेल्या काही वर्षांपासून अनेक आजारांनी तरूणांना अडचणीत आणण्यास सुरुवात केली आहे. यातील एक प्रमुख आजार म्हणजेचं हृदयविकाराचा झटका. एका संशोधन अहवालात असे दिसून आले आहे की, तरुणांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण वाढत आहे. हृदयविकाराचा धोका कोणालाही असू शकतो. मात्र, तारुण्यात हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण तुलनेने जास्त आहे. यासंदर्भात हृदयरोग विशेषज्ञ डॉ. अमिना मलिक यांच्याशी चर्चा केली तेव्हा सर्व धक्कादायक खुलासे समोर आले. आज या लेखातून तरुणांमध्ये वाढत्या हृदयविकाराच्या झटक्या संबंधित महत्वाची माहिती जाणून घ्या.

युवक हे आपल्या देशाचे आधारस्तंभ आहेत. ज्यावर आपल्या देशाचे भविष्य अवलंबून आहे. त्यामुळे तरुणांच्या आरोग्याच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे. डॉ. अमिना यांच्या मते, तरुणांमध्ये हृदयविकाराच्या वाढत्या घटनेसाठी त्यांची अतिशय व्यस्त जीवनशैली जबाबदार आहे. त्यांच्याकडे स्वत: साठी वेळ नसतो, नियमित व्यायामाचा अभाव, जंक फूडचे जास्त प्रमाणात सेवन, धूम्रपान आणि मद्यपान करणे, वर्क फ्रॉम होम (Work From Home), तणाव इत्यादीमुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. (वाचा - Amazing Benefits of Giloy: गुळवेलाचे सेवन केल्याने होतात 'हे' आरोग्यदायी फायदे; जाणून घ्या)

वर्क फ्रॉम होममुळे ही वाढतोय धोका -

कोरोना साथीमुळे सध्या घरातून काम करण्याचा नवीन ट्रेंड आला आहे. डॉ. अमिना म्हणतात, घरातून काम केल्यामुळे तरूणांना तासन्तास एका ठिकाणी बसून काम करावे लागते. हे आरोग्यासाठी चांगले नाही. डेस्कच्या कामामुळे आरोग्यावर अनेक प्रकारे परिणाम होतो. त्यातील एक म्हणजे लठ्ठपणा. लठ्ठपणा हा बर्‍याच रोगांचा स्रोत असू शकतो. उदाहरणार्थ, उच्च रक्तदाब, मधुमेह, कोलेस्ट्रॉल आणि ऑस्टिओपोरोसिस इ. हे हृदयरोगास जन्म देऊ शकतात. म्हणूनचं, घरातून काम करताना मधे-मधे काही मिनिटांसाठी ब्रेक घेणं आवश्यक आहे.

अमली पदार्थांचे व्यसन -

तरूणांमध्ये धूम्रपान, मद्यपान आणि अमली पदार्थांचे व्यसन सतत वाढत आहे. डॉ. अमिना यांच्या म्हणण्यानुसार, कोणत्याही गोष्टीची व्यसन करणे शरीरासाठी हानिकारक आहे. अल्कोहोल किंवा धूम्रपान करण्याची सवय हृदयविकाराच्या झटक्यासह कर्करोगास आमंत्रित करते. धूम्रपान केल्याने कोलेस्टेरॉलची पातळी वाढते, ज्यामुळे हृदय गती 50 टक्क्यांनी वाढते आणि रक्तदाब 30 टक्क्यांनी वाढतो. त्यामुळे एक सामान्य आणि निरोगी व्यक्ती देखील हृदयविकाराचा बळी ठरू शकते.

जंक फूड -

आजकालचे बहुतेक तरुण जंक फूडला प्राधान्य देतात. जंक फूड, नावातचं ते आरोग्यासाठी किती धोकादाय असू शकते याची कल्पना येते. खर्‍या अर्थाने, जंक फूड शरीरासाठी कोणत्याही विषापेक्षा कमी नाही. अशा पदार्थांमध्ये साखर, कॅलरी आणि कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असते. जे आरोग्यासाठी थेट विष म्हणून काम करतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जंक फूड शरीराला कोणतेही पोषण देत नाही.

तणाव -

डॉ. अमिना मलिक यांच्या म्हणण्यानुसार, तणाव हे तरूणांमध्ये उच्च रक्तदाबाचे सर्वात मोठे कारण आहे. स्पर्धा, जास्त काम, दबाव इत्यादी गोष्टींमुळे तरुणांमध्ये ताण येतो. कॉर्पोरेट संस्कृतीत काम करणाऱ्या तरुणांना व्यायामासाठी वेळ नसतो हे बर्‍याचदा पाहायला मिळतं. वेळेआधीच ऑफिस गाठायची घाई असल्याने बर्‍याचदा तरुणांना घरचे जेवण खायला मिळत नाही. बाहेरील खाद्यपदार्थात मीठ आणि तेल जास्त असते, जे आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असते. याशिवाय जास्त प्रदूषण आणि ग्लोबल वार्मिंगमुळे उच्च रक्तदाबची प्रकरणे देखील वाढत आहेत. त्यामुळे सर्व ताणतणावापासून दूर राहून आत्मसंयम जीवन जगणे महत्त्वाचे आहे. तसेच चांगला आणि संतुलित आहार घेणे व नियमित व्यायाम किंवा योग करणे महत्त्वाचे आहे.