देशात बर्ड फ्लू (Bird Flu) संसर्गाच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. 21 जानेवारी 2021 पर्यंत 6 राज्यात- छत्तीसगड, हरियाणा, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि पंजाबच्या पोल्ट्री पक्ष्यांमध्ये एव्हीयन इन्फ्लूएंझाच्या प्रादुर्भावाची पुष्टी झाली आहे. अशावेळी मांस (Chicken), अंडी (Eggs) खाणे सुरक्षित आहे का? हा प्रश्न सर्वांच्याच मनात आहे. याबाबत लोक चिंतीतही आहे, कारण अपूर्ण माहिती लोकांच्या मनाचा गोंधळ उडवीत आहे. सध्या मांस व अंड्याची फक्त मागणीच कमी झाली नाही, तर त्यांच्या किंमतीही गडगडल्या आहेत. ही परिस्थिती लक्षात घेता, भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
या मार्गदर्शक सूचनांमुळे खाद्य व्यवसाय संचालक आणि ग्राहक यांच्यापर्यंत योग्य माहिती पोचविली जाऊ शकते. अन्न सुरक्षा प्राधिकरणाने म्हटले आहे की हा विषाणू 70 डिग्री सेल्सिअस तापमानावर 3 सेकंदात मरतो. जर मांसाचा संपूर्ण भाग आणि अंडी 74 डिग्री सेल्सिअस तापमानात शिजवले गेले, तर विषाणूचा मृत्यू होतो. म्हणूनच, व्यापारी आणि ग्राहकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. लोकांनी मांस व अंडी योग्य प्रकारे हाताळणे महत्वाचे आहे. एफएसएसएआयने व्यापारी आणि ग्राहकांना आपल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये काय करावे आणि काय करू नये याबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे.
काय करावे व काय करू नये -
- अर्धवट शिजवलेली अंडी, मांस खाऊ नये
- चिकन शिजत असताना मधेच खाऊ नका
- संक्रमित भागात पक्ष्यांचा थेट संपर्क टाळा
- उघड्या हातांनी मृत पक्ष्यांना स्पर्श करु नका
- कच्चे मांस मोकळ्या जागेत ठेवू नका
- कच्च्या मांसाच्या थेट संपर्कात येण्याचे टाळा
- कच्चे चिकन हाताळताना मास्क आणि गल्व्ह वापरा
- पुन्हा पुन्हा हात धुवा
- आसपासची जागा स्वच्छ ठेवा
- केवळ चांगले आणि पूर्णपणे शिजवलेले चिकन आणि अंडी खा (हेही वाचा: शाकाहारी, स्मोकर्स यांना कोरोना वायरस संसर्गाचा धोका कमी: CSIR serosurvey चा दावा)
जागतिक आरोग्य संघटनेनेही (WHO) म्हटले आहे की कोंबडीचे मांस आणि अंडी वापरण्यास सुरक्षित आहे. दरम्यान, छत्तीसगड, दिल्ली, गुजरात, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड अशा 10 राज्यांमधील कावळे/प्रवासी पक्षी व वन्य पक्ष्यांमध्ये एव्हीयन इन्फ्लूएंझाचीही पुष्टी झाली आहे.