पावसाळ्यात दोन किटकांचा त्रास सर्वात जास्त होतो, ते म्हणजे मच्छर (Mosquito) आणि माश्या (Flies). पावसाळ्यात ठिकठिकाणी पाणी साचून राहिल्याने मच्छरांची पैदास जास्त प्रमाणात होते. म्हणून पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, ताप यांसारख्या आजारांना आपण जणू आमंत्रणच देत असतो. अशा गंभीर आजारांवर योग्य वेळी योग्य ते उपचार झाले नाही तर आपल्या जीवावरही बेतू शकते. म्हणून पावसाळ्यात अशा मच्छरांपासून स्वत:चा बचाव करणे गरजेचे आहे.
पण ते म्हणतात ना Prevention Is Better Than Cure. म्हणजेच प्रतिबंध हे उपचारांपेक्षा कधीही चांगले. कोणताही आजार होऊन इलाज करण्यापेक्षा तो आजार होऊ नये यासाठी योग्य ती काळजी घेतली पाहिजे. मच्छरांपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी हे घरगुती उपाय खूपच फायदेशीर ठरू शकतात.
1. लसूण
लसूणाच्या साहाय्याने तुम्ही मच्छरांचा बंदोबस्त करु शकता. त्यासाठी लसणाच्या 5-6 पाकळ्या एक चमचा शुद्ध तेलात एकत्रित करुन रात्रभर ठेवून द्या. त्यानंतर त्या तेलात अर्धा लिंबू रस आणि 2 कप पाणी मिसळा. त्यानंतर त्या मिश्रणाला एक स्प्रे बॉटलमध्ये भरुन घरात आणि बाल्कनीतील झाडांजवळ मारा.
2. दालचिनी तेल
दालचिनीमध्ये सिनानेल्डीहाइड, सिनेमाइल एसीटेट सारखी तत्व असतात. दालचिनी तेलाचे 10 थेंब एक कप पाण्यात मिसळून ते मिश्रण स्प्रे बॉटलमध्ये भरा. घरात ज्या भागात मच्छरांचा वावर असतो, तेथे हा स्प्रे मारा.
हेही वाचा- पावसाळ्यात घरात घोंगावणा-या माश्यांचा कसा कराल बंदोबस्त? जाणून घ्या 5 घरगुती उपाय
3. कडूलिंब आणि खोबरेल तेल
कडूलिंब तेलाचे 10 थेंब आणि 30 ml खोबरेल तेलाचे मिश्रण बनवा आणि त्याला आपल्या शरीरावर लावा. हे तेल तुम्हाला मच्छरांपासून सुरक्षित ठेवेल.
4. बेकिंग सोडा आणि व्हिनेगार
बेकिंग सोडा आणि व्हिनेगार चे मिश्रण एकत्रित केल्याने कार्बनडाय ऑक्साइड बाहेर पडतो. ज्याचा उपयोग मच्छरांपासून बचाव करण्यासाठी होऊ शकतो. त्यासाठी 1 कप व्हिनेगारमध्ये पाव चमचा बेकिंग सोडा मिसळून बॉटलमध्ये भरा आणि घरात आणि मच्छर प्रभावित जागेत फवारा.
5. रबिंग अल्कोहोल
एक चमचा रबिंग अल्कोहोल मध्ये इसेंशिअल तेलाचे 10 थेंब आणि 1 कप पाणी मिसळा. या मिश्रणाला एक स्प्रे बॉटलमध्ये भरा. या मिश्रण मच्छर घरातील ज्या भागात जास्त असतील, तेथे फवारा.
हे घरगुती आणि नैसर्गिक उपायांनी मच्छरांपासून तुमचा बचाव होऊ शकतो. तसेच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचा कोणताही विपरित परिणाम होणार नाही. त्यामुळे पावसाळ्यात घरात फैलावणारे मच्छर दूर करण्यासाठी या उपायांचा विचार करायला काही हरकत नाही एवढच आम्ही सांगू.
(सूचना: या लेखाचा उद्देश फक्त माहिती देणे हा आहे, यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे.)