Flies (Photo Credits: PixaBay)

पावसाळा सुरु झाला की, वेगवेगळ्या किटकांचा घरात वावर सुरु होतो. त्यात सर्वात त्रासदायक ठरतात त्या म्हणजे माश्या (Files). पावसाळ्यात सर्वत्र पाणी साचल्यामुळे माश्यांची पैदास जास्त होते. त्यामुळे या पावसाळा सुरु झाला की माश्यांचा घरामध्ये जणू धुडगूसच सुरु होतो. अशा वेळी घरातील अन्नावर, साठवलेल्या पाण्यावर माश्या घोंगावण्यास सुरुवात होतो. त्यामुळे अशा त्रासदायक माश्यांपासून काही अंशी सुटका कशी करुन घेता येईल यासाठी आम्ही तुम्हाला आज असे 5 घरगुती उपाय तुम्हाला सांगणार आहोत. ते पुढीलप्रमाणे-

1. कापूर- घरात कापूर असल्यास रोज संध्याकाळी धूपासोबत कापूर जाळल्यास माश्या कमी होतात. घरात चारही कोपर्‍यात कापराच्या गोळ्या टाका. माश्या खूप असतील तर कापूर जाळा.

2. तुळस- तुळशीमधील औषधी गुणधर्मासोबत किटकांना दूर ठेवण्याची क्षमतादेखील आहे. घरात तुळशीचे रोप लावल्यास माश्यांचा वावर कमी होतो.

3. निलगिरी- या तेलामध्ये कापसाचा बोळा बुडवून तो हवाबंद डब्ब्यात ठेवा. ज्याठिकाणी कीटक असतात तेथे हा डबा उघडा करून ठेवा.

4. लिंबू- लिंबू चे दोन तुकडे करुन त्यात 6-7 लवंगा रोवा. लवंगाचा चार कोन्यावाली बाजू वरच्या बाजूस असेल असे लिंबूमध्ये लवंगा रोवा. घरात जिथे जास्त माश्या दिसतील तिथे हा लिंबू ठेवून द्या. घरात माश्या येणार नाही.

5. पुदिना- सुक्या पुदिन्याची पाने वाटून एका कपड्यात ते गुंडाळून त्याचे छोटे गाठोडे बनवून घरात ठेवावे. माश्या घरात येणार नाही.

हेही वाचा- पावसाळ्यात पायांना भेगा पडल्यास करा 'हे' सोपे उपाय

पावसाळ्यात माश्यांमुळे मोठ्या प्रमाणात आजार पसरण्याची भिती असते. माशांमुळे होणारे आजार हे संसर्गजन्य असल्यामुळे लहान मुलांना या आजारांची लागण लवकर होते. घाणीवर बसून आलेल्या माश्या घरात अन्नपदार्थ अथवा अंगावर बसल्याने आजार पसरतात. रोगराई पसरवणाऱ्या या माशांचा बंदोबस्त केल्यास अनेक आजार दूर ठेवता येतात. म्हणून वर सांगितलेले घरगुती उपाय एकदा नक्की करुन पाहा

(सूचना: या लेखाचा उद्देश फक्त माहिती देणे हा आहे, यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे.)