देशात कोरोना विषाणूची (Coronavirus) दुसरी लाट ओसरत असलेली दिसत आहे. अशात काळ्या बुरशीच्या संसर्गाने डोके वर काढले आहे. या आजाराने डॉक्टरांच्या व रुग्णांच्या चिंता वाढवल्या आहेत. त्यात आता कोरोनामधून बरे झाल्यानंतर अनेक रूग्णांमध्ये त्वचारोग, नखे व केसांशी संबंधित संबंधित समस्या दिसून येत आहेत. कमी रोग प्रतिकारशक्ती किंवा इतर कारणांमुळे बर्याच रुग्णांमध्ये हर्पिस (Herpes) होत असल्याचेही आढळले आहे. सिम्प्लेक्स विषाणूमुळे होणार्या या संसर्गास सामान्यतः नागीण म्हणून ओळखले जाते. हर्पिस सिम्प्लेक्स व्हायरस टाइप-1 (HSV-1) किंवा सिम्प्लेक्स व्हायरस टाइप-2 (HSV-2) अशा दोहोंमुळे होऊ शकतो.
दिल्ली, मुंबई आणि इतर शहरांतील तज्ज्ञांनी सांगितले की, कोरोना व्हायरस आजारातून बरे झाल्यानंतर रुग्णांनी त्यांच्या त्वचेही संबधी समस्यांकडे लक्ष द्यावे, तसेच गरज वाटल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. दिल्लीतील इंद्रप्रस्थ अपोलो रुग्णालयातील त्वचारोगतज्ज्ञ डॉ डी एम महाजन यांनी सांगितले की, कोविडमधून बरे झालेले अनेक लोक, आपल्या काळी बुरशी झाल्याच्या भीतीने त्वचारोगाबाबत डॉक्टरांना भेटत आहेत. मात्र त्यांनी घाबरण्याची गरज नाही. यामध्ये बऱ्याच लोकांना हर्पिस झाल्याचे दिसून आले आहे.
हर्पिस लेबियल्समुळे ओठांच्या सभोवतालच्या त्वचेत जखम होऊ शकते, ज्यामुळे वेदना होऊ शकतात. त्याच वेळी, हर्पिस झोस्टर एक विषाणूजन्य संसर्ग आहे, जो शरीरातील व्हेरिसेला-झोस्टर विषाणूच्या (Varicella-Zoster Virus) पुनरुत्पादनामुळे होतो. डॉक्टर म्हणतात की, हर्पिसपेक्षा हर्पिस झोस्टरची अधिक प्रकरणे समोर येत आहेत. (हेही वाचा: COVID19 Vaccination संदर्भात वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची तज्ञांनी दिलेली उत्तरे तुम्हाला येथे मिळतील फक्त एका क्लिकवर)
मुंबईस्थित त्वचारोगतज्ज्ञ आणि केसांचे प्रत्यारोपण सर्जन डॉ. सोनाली कोहली यांनीही या संदर्भात माहिती दिली आहे. त्या म्हणतात की, कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे प्रतिकारशक्ती कमकुवत झाल्यामुळे बर्याच रुग्णांमध्ये त्वचा तसेच केस आणि नखे यांचे आजार दिसू लागले आहेत. त्या पुढे म्हणतात की, कोरोना आणि असे आजार यांचा संबंध जोडण्याबाबत कोणताही क्लिनिकल अभ्यास नसला तरी, अनेक कोरोना रुग्णांच्या रिकव्हरी फेजमध्ये अशा समस्या दिसून आल्या आहेत. यामध्ये हर्पिसचा संसर्ग अधिक असल्याचे आढळले आहे.