देशात सध्या कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी लसीकरण मोठ्या प्रमाणात पार पाडले जात आहे. अशातच लसीकरणासंबंधित विविध प्रश्न नागरिकांकडून विचारले जात आहेत. त्याचसोबत लस घेतल्यानंतर काही जणांना थकवा जाणवणे किंवा ताप येणे असे प्रकार घडत असल्याने ते लस घेण्यापासून घाबरत आहेत. अशातच आता लसीकरणासंबंधित वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे तज्ञांनी दिली आहेत.(Covishield, Covaxin आणि Sputnik V या कोविड-19 लसींमधील नेमका फरक काय? जाणून घ्या लसींची किंमत, डोसेसमधील अंतर आणि परिणाम)
लसीकरणाबद्दल बहुतांश जणांनी असे विचारले की, अॅलर्जीचा त्रास असल्यास ती घेऊ शकतो का? तसेच गरोदर महिला आणि स्तनदा मातांना सुद्धा कोरोनाची लस घेणे किती सुरक्षित आहे? लस घेतल्यानंतर शरीरात पुरेशा अँन्टीबॉडी तयार होतील का? लस घेतल्यास शरीरात रक्ताच्या गुठळ्या होणे सर्वसामान्य बाब आहे का? तसेच कोरोना झाल्यानंतर किती दिवसांनी लस घ्यावी अशा सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला येथे एका क्लिकवर मिळणार आहेत.
कोविड लसी संदर्भात वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांपैकी हे काही प्रश्न आहेत. नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ व्ही के पॉल आणि अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्सचे संचालक डॉ रणदीप गुलेरिया यांनी 6 जूनला डीडी न्यूज या वृत्तवाहिनीवरच्या विशेष कार्यक्रमात कोविड-19 लसीकरणाबाबत जनतेच्या मनातल्या विविध शंकांचे निरसन केले. अचूक माहिती आणि तथ्य जाणून घेण्यासाठी वाचा आणि संसर्गापासून सुरक्षित राहा. या प्रश्नांसह आणखी प्रश्नांची उत्तरेही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या एफएक्यू अर्थात वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांच्या उत्तराअंतर्गत दिली आहेत.
प्रश्न: अॅलर्जीचा त्रास असणाऱ्या व्यक्ती कोविड-19 ची लस घेऊ शकतात का ?
डॉ पॉल : एखाद्या व्यक्तीला अॅलर्जीचा लक्षणीय त्रास असेल तर केवळ वैद्यकीय सल्ल्यानंतरच कोविडची लस घ्यावी. मात्र सर्दी, त्वचेची अॅलर्जी यासारखी किरकोळ अॅलर्जी असेल तर लस घेण्यासाठी टाळाटाळ करू नये.
डॉ गुलेरिया : अॅलर्जीसाठी आधीपासूनच औषध घेणाऱ्या व्यक्तींनी ते थांबवू नये, लस घेण्याच्या काळातही त्यांनी आपली औषधे नियमित सुरूच ठेवावीत. लसीमुळे अॅलर्जी निर्माण झाल्यास त्यासाठीच्या व्यवस्थापनासाठी सर्व लसीकरण केंद्रावर व्यवस्था करण्यात आलेली आहे हे जाणून घेणे महत्वाचे आहे. म्हणूनच तीव्र अलर्जी असली तरी औषध सुरु ठेवून लस घेण्याचा आमचा सल्ला राहील.
प्रश्न: गरोदर महिला कोविड-19 ची लस घेऊ शकतात का ?
डॉ पॉल: सध्याच्या मार्गदर्शक सूचनांनुसार गरोदर महिलांना लस देण्यात येऊ नये. लसीच्या चाचण्यामधून उपलब्ध झालेल्या डाटानुसार, डॉक्टर आणि वैज्ञानिक समुदायाने, गरोदर महिलांना लस देण्याची शिफारस करणारा निर्णय घेतलेला नाही. तथापि यासंदर्भातल्या नव्या शास्त्रीय माहितीच्या आधारावर केंद्र सरकार यासंदर्भात परिस्थिती स्पष्ट करेल.
अनेक कोविड-19 लसी गरोदर महिलांसाठी सुरक्षित आहेत असे दिसून आले आहे, आपल्या दोन लसींनाही हा मार्ग मोकळा होईल अशी आमची आशा आहे. मात्र लस अतिशय अल्प काळात विकसित झाली आहे आणि सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून प्रारंभिक चाचण्यांमधे सर्वसाधारणपणे गरोदर महिलांचा समावेश केला जात नाही हे लक्षात घेऊन जनतेने संयमाने आणखी थोडी प्रतीक्षा करावी.
डॉ गुलेरिया : अनेक देशांनी गरोदर महिलांसाठी लसीकरण सुरु केले आहे. अमेरिकेच्या एफडीएने फायझर आणि मॉडेर्ना लसींना मान्यता दिली आहे. कोवॅक्सीन आणि कोविशिल्ड संदर्भातला डाटा लवकरच उपलब्ध होईल, काही डाटा आधीच उपलब्ध आहे, आवश्यक असलेला संपूर्ण डाटा काही दिवसात उपलब्ध होईल आणि भारतातही गरोदर महिलांच्या लसीकरणासाठी परवानगी मिळेल अशी आशा आहे.
प्रश्न: स्तनदा माता कोविड-19 प्रतिबंधक लस घेऊ शकतात का ?
डॉ पॉल : यासंदर्भात अतिशय स्पष्ट मार्गदर्शक सूचना असून स्तनदा मातांसाठी लस पूर्णपणे सुरक्षित आहे. कोणतीही भीती बाळगण्याचे कारण नाही. लसीकरणापूर्वी किंवा नंतर बाळाचे स्तनपान थांबवण्याची आवश्यकता नाही.
प्रश्न: लसीकरणानंतर आपल्या शरीरात पुरेश्या अँन्टीबॉडी म्हणजे रोगाला प्रतिकार करण्यासाठी प्रतिपिंडे तयार होतील का ?
डॉ गुलेरिया : लसीची परिणामकारकता ही केवळ शरीरात निर्माण होणाऱ्या अँन्टीबॉडीजच्या प्रमाणावरून ठरवता कामा नये हे लक्षात घेणे महत्वाचे आहे. अँन्टीबॉडीज, पेशींच्या सहाय्याने प्रतिकार क्षमता, आणि मेमरी सेल (या पेशी, जेव्हा आपल्याला संसर्ग होतो तेव्हा अधिक प्रतिपिंडे तयार करतात) अशा अनेक प्रकारांनी, लस आपल्याला संरक्षण देत असते. याशिवाय परिणामकारकतेबाबत आलेले निकाल हे चाचण्यांच्या अभ्यासावर आधारित आहेत, प्रत्येक चाचणीसाठी अभ्यास आराखडा काहीसा भिन्न आहे. कोवॅक्सीन असो, कोविशिल्ड असो किंवा स्पुटनिक V, या सर्व लसींची परिणामकारकता जवळ जवळ सारखीच आहे असे आतापर्यंत मिळालेला डाटा दर्शवत आहे. म्हणूनच आपण ही लस घ्या किंवा ती लस घ्या असे म्हणता कामा नये आणि आपल्या भागात जी लस उपलब्ध आहे ती घेऊन आपण स्वतः आणि आपले कुटुंब सुरक्षित करावे.
डॉ पॉल : काही लोक लसीकरणानंतर अँन्टीबॉडी टेस्ट करण्याचा विचार करतात. मात्र केवळ अँन्टीबॉडी, एखाद्या व्यक्तीची रोग प्रतिकार क्षमता दर्शवत नसल्यामुळे अशा चाचणीची आवश्यकता नाही. कारण आपण जेव्हा लस घेतो तेव्हा टी पेशी किंवा मेमरी पेशीमध्ये काही बदल घडतो आणि या पेशी अधिक बळकट होऊन प्रतिकार क्षमता प्राप्त करतात आणि टी पेशी या बोन मॅरोमध्ये असल्याने अँन्टीबॉडी चाचणीमध्ये त्या आढळत नाहीत. म्हणूनच लस घेण्याआधी किंवा नंतर अँन्टीबॉडी चाचणी करून घेऊ नये, जी लस उपलब्ध असेल त्या लसीच्या दोन्ही मात्रा घ्याव्या आणि कोविड संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने योग्य वर्तन ठेवावे असे आवाहन आम्ही करत आहोत. आपल्याला कोविड-19 होऊन गेला असेल तर लस घेण्याची आवश्यकता नाही अशी चुकीची धारणाही लोकांनी ठेवता कामा नये.
प्रश्न: लसीची मात्रा घेतल्यानंतर रक्ताची गुठळी होणे ही सर्वसामान्य बाब आहे का ?
डॉ पॉल : अशा प्रकारची गुंतागुंत झाल्याची थोडी प्रकरणे समोर आली, विशेषकरून एस्ट्रा-झेनका लसीबाबत. युरोपमध्ये काही प्रमाणात त्यांच्या युवावर्गात, त्यांची जीवनशैली, शरीर आणि जनुकीय रचना यामुळे अशी प्रकरणे दिसून आली. मात्र मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की भारतात या डाटाचा व्यवस्थित अभ्यास केल्यानंतर, रक्ताच्या गुठळ्या होण्याच्या घटना अगदीच नगण्य असल्याचे आढळून आले, या घटना खूपच नगण्य असल्याने त्याबाबत चिंतेचे कारण नाही. आपल्या देशाच्या तुलनेत युरोपियन देशांमध्ये या गुंतागुंतीचे प्रमाण 30 पट जास्त आढळले आहे.
डॉ गुलेरिया : शस्त्रक्रियेनंतर रक्ताची गुठळी होण्याचे प्रमाण, अमेरिका आणि युरोपियन लोकांच्या तुलनेत भारतीयांमध्ये कमी आहे हे आधीच दिसून आले आहे. लसीमुळे निर्माण झालेला थ्रोम्बोसीस किंवा थ्रोम्बोसायटोपेनिया नावाचा हा साईड इफेक्ट अर्थात दुष्परिणाम भारतात अतिशय क्वचित असून युरोपपेक्षा अतिशय कमी प्रमाणात आढळतो. म्हणूनच याबाबत भीतीचे कारण नाही. यासाठी उपचारही उपलब्ध असून लवकर निदान झाल्यास ते उपयोगात आणता येतात.
प्रश्न: मला कोविडची लागण झाली असेल तर त्यानंतर किती दिवसांनी मी लस घ्यावी ?
डॉ गुलेरिया : अद्ययावत मार्गदर्शक सूचनांमध्ये स्पष्ट म्हटले आहे की कोविड-19 बाधित व्यक्ती, त्यातून बरे झाल्याच्या दिवसापासून तीन महिन्यांनी लस घेऊ शकते. यामुळे शरीराला अधिक बळकट रोग प्रतिकार क्षमता विकसित करण्यासाठी मदत होणार असून लसीचा परिणाम अधिक उत्तम होईल.
भारतात आतापर्यंत आढळलेल्या आणि उत्परिवर्तन झालेल्या विषाणूच्या रुपावरही आपल्या लसी प्रभावी असल्याची ग्वाही डॉ पॉल आणि डॉ गुलेरिया या दोन्ही तज्ञांनी दिली. लस घेतल्यानंतर रोग प्रतिकार प्रणाली क्षीण होते किंवा लस घेतल्यानंतर मृत्यू होतो अशा प्रकारच्या सोशल मिडिया वरून पसरणाऱ्या अफवांमध्ये आणि लसी बाबत ग्रामीण तसेच दुर्गम भागात काही लोकांची असलेली चुकीची धारणा यामध्ये काहीही तथ्य नसून त्या निराधार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.