जाणून घ्या मासिक पाळीबद्दल जगातील महत्वाच्या धर्मांचे विचार; एकीकडे कठोर नियम तर दुसरीकडे स्त्री-पुरुष समानता
प्रातिनिधिक प्रतिमा (संग्रहित-संपादित प्रतिमा)

भारत देश हा अनेक जाती धर्मांनी बनला आहे, विविध पंथांचे लोक इथे राहतात. या सर्वांच्या आपापल्या धर्माचे काही नियम आहेत, काही चालीरीती आहेत. एका ठराविक काळात काही गोष्टींना परवानगी असते तर काही गोष्टी निषिद्ध मानल्या आहेत. हे नियम ज्यासाठी लागू होतात त्यातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मासिक पाळी (Menstruation Cycle). आज जरी या संकल्पेनाबाबत समाज आपल्या विचारांची कात टाकत आहे असे म्हटले तरी, प्रत्येक धर्मामध्ये मासिक पाळीबद्दल काही नियम आखून दिले आहेत. मुख्यत्वे जेव्हा देव आणि देवालयाशी  निगडीत जेव्हा गोष्टी असतात तेव्हा हे नियम काटेकोरपणे पाळावे असे धर्मात सांगितले जाते. चला तर पाहूया मासिक पाळीबद्दल प्रत्येक धर्म काय सांगतो.

  • हिंदू धर्म (Hinduism) – हिंदू धर्मात पुजेअर्चेवेळी मासिक पाळी असलेल्या स्त्रीने तिथे येणे निषिद्ध मानले आहे. मासिक पाळी चालू असताना स्त्री देवाची पूजा किंवा कोणतेही विधी करू शकत नाही किंवा मंदिरातही प्रवेश करू शकत नाही. मात्र दुसरीकडे आसाममधील कामाख्या मंदिरात देवीच्या मूर्तीची नव्हे तर योनीची पूजा होते. या काळात रजस्वला देवीचा उत्सव साजरा केला जातो.
  • मुस्लीम धर्म (Islam) – मुस्लीम धर्मामध्ये मासिक पाळीबद्दल कोणतेही नियम नाहीत मात्र या काळात महिलांचा दर्ग्यामधील प्रवेश निषिद्ध मानला आहे. स्त्रिया कुराणला स्पर्श करू शकत नाही किंवा धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकत नाहीत. मासिक काळात स्त्रीला वेदना होत असल्याने त्या काळात पुरुषांनी त्यांच्यापासून लांब राहावे असे सांगितले गेले आहे. तसेच तलाक झाल्यानंतरचे तीन महिने मासिक पाळी येऊन गेल्यानंतरच पुनर्विवाहाचा विचार करण्याची मुभा आहे. कारण यामुळे पुढे होणारे मुल हे पहिल्या नवऱ्याचे नाही हे सिद्ध होते.
  • ख्रिस्चन धर्म (Christianity) – ख्रिस्चन धर्मामध्ये बायबल हे काही वेळा नव्याने लिहिलेले आढळते. Old Testament मासिक पाळीबद्दल काही नियम आहेत मात्र हे नियम स्पष्टपणे दिसून येत नाहीत. तसेच मासिक पाळीच्या काळात स्त्रीच्या चर्चमधील प्रवेशही निषिद्ध मानला नाही.
  • बौद्ध धर्म (Buddhism) – या धर्मात मासिक पाळीबद्दल कोणतेही नियम नाहीत किंवा या गोष्टीमुळे कुठे प्रवेश निषिद्ध मानला आहे. मात्र इतर धर्माचे अनुकरण काही काही लोक स्वतःहून 5 दिवस धार्मिक कार्यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतात.
  • शीख धर्म (Sikhism) – या धर्मात स्त्री पुरुषांना समान वागणूक दिली आहे. मासिक पाळीबद्दल नियम नाहीत किंवा त्याला विटाळही मानले नाही. या काळात स्त्रिया धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकतात. (हेही वाचा: महिलांनो आता मासिक पाळीच्या काळात रहा कंफर्टेबल; Pads ऐवजी वापरा Period Panties)
  • पारशी धर्म (Zoroastrianism) – मासिक पाळी चालू असताना पारशी स्त्रियांना मंदिरातील प्रवेश पूर्णपणे नाकारण्यात आला आहे.
  • जैन धर्म (Jainism) – जैन धर्मातील काही ग्रंथांमध्ये महिलेचे मासिक काळातील रक्त अशुद्ध मानले आहे. जैन धर्म मासिक पाळीच्या वेळी महिलांना स्वयंपाक करण्यास किंवा मंदिरात प्रवेश करण्याची परवानगी देत नाही.
  • ज्यू धर्म (Judaism) - ज्यू धर्मामध्ये मासिक पाळीबद्दल अतिशय कडक  नियम सांगितले आहेत. या काळात स्त्रीने 7 दिवस सर्वांपासून वेगळे राहावे, तसेच या काळात तिला कोणी स्पर्शही करू शकत नाही. मासिक पाळी चालू असताना स्त्री कोणत्याही धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकत नाही.

हे झाले धर्मामध्ये किंवा काही ग्रंथांमध्ये लिहून ठेवलेले नियम. मात्र स्त्रीचे रक्त आणि पुरुषाचे वीर्य यातूनच एका नव्या जीवाचा जन्म होते, असे असताना मासिक पाळी येण्याच्या काळात स्त्री अपवित्र कशी ठरू शकते? याबाबतील प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतीलही मात्र या नियमाच्या ओझ्याखाली एखाद्या व्यक्तीचा माणुसकी सोडून छळवाद केला जाऊ नये हीच अपेक्षा.

(हा लेख इन्टरनेटवरील माहितीच्या आधारावर लिहिलेला आहे. लेटेस्टली मराठी या लेखातील कोणत्याही माहितीची पुष्टी करत नाही)