
गेल्या पाच वर्षांत भारतात 4.5 लाखांहून अधिक लोकांना हिपॅटायटीस बीची (Hepatitis B) लागण झाली होती, त्यापैकी सुमारे तीन लाख लोक 10 राज्यांतील होते. आकडेवारीनुसार, जुलै 2018 ते सप्टेंबर 2023 या कालावधीत 31,128 हिपॅटायटीस बी प्रकरणांच्या नोंदीसह महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे, राजस्थान (39,059) आणि मध्य प्रदेश (47,255) ही राज्ये अनुक्रमे दुसऱ्या व पहिल्या स्थानावर आहेत. बिजू जनता दलाचे नेते आणि राज्यसभेचे सदस्य सस्मित पात्रा यांनी 5 डिसेंबर रोजी कनिष्ठ सभागृहात भारतातील हिपॅटायटीसची सद्यस्थिती आणि राष्ट्रीय व्हायरल हेपेटायटीस कंट्रोल प्रोग्राम (NVHCP) च्या प्रगतीचा तपशील मागितला होता.
आरोग्य अधिकार्यांनी हिपॅटायटीस बीबाबत महाराष्ट्र तिस-या क्रमांकावर असण्याची अनेक कारणे उद्धृत केली आहेत. यामध्ये जास्त लोकांची तपासणी, उशीरा निदान, जागरूकता नसणे इत्यादींचा समावेश आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले, ‘तरुण प्रौढ लोक स्ट्रीट फूडचे सर्वाधिक ग्राहक असतात, ते सामाजिक आणि लैंगिकदृष्ट्या सक्रिय असतात आणि ते उत्साही प्रवासी देखील असतात. यामुळे त्यांना हिपॅटायटीस ए आणि ई सारख्या अन्न-जनित यकृत रोग आणि हिपॅटायटीस बी आणि सी सारख्या लैंगिकरित्या संक्रमित यकृत रोगांचा धोका असतो. हिपॅटायटीस ए असणारे प्रौढ आणि हिपॅटायटीस ई असलेल्या गर्भवती महिलांना यकृत निकामी होण्याचा धोका जास्त असतो.’
जुलै 2018 मध्ये NVHCP लागू झाल्यापासून, ज्याचे उद्दिष्ट हिपॅटायटीसशी मुकाबला करणे आणि 2030 पर्यंत हेपेटायटीस सीचे देशव्यापी उच्चाटन करणे हे या आहे, सुमारे 8.13 कोटी लोकांना याचा लाभ झाला आहे आणि 2.74 लाखांहून अधिक रुग्णांनी हिपॅटायटीसवर उपचार घेतले आहेत. कार्यक्रमाची अंमलबजावणी वाढवण्यासाठी निदान आणि उपचार आणि देखरेखीचे प्रशिक्षण देण्यासाठी देशभरात सुमारे 4,800 'मास्टर ट्रेनर्स' तैनात करण्यात आले आहेत. (हेही वाचा: Cough Syrup Fails Quality Tests: अलर्ट! देशातील 50 हून अधिक कफ सिरप गुणवत्तेच्या चाचणीत अयशस्वी; अहवालात समोर आली धक्कादायक माहिती)
व्हायरल हिपॅटायटीसचे निदान आणि उपचारासाठी सेवा सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये उपलब्ध आहेत. प्रोग्राममध्ये मजबूत देखरेख आणि मूल्यमापनासाठी NVHCP व्यवस्थापन माहिती प्रणालीवर पेपरलेस डेटा रेकॉर्डिंग आणि रिपोर्टिंग आहे. आजपर्यंत, देशभरात 978 उपचार स्थळे स्थापन करण्यात आली आहेत जिथे लाभार्थ्यांना प्रतिबंधात्मक आणि उपचार सेवा पुरविल्या जातात.
राज्याच्या आरोग्य विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, हिपॅटायटीस बी आणि सी हे व्हायरल हिपॅटायटीसचे दोन गंभीर प्रकार आहेत, ज्यामुळे जळजळ होते, यकृताला नुकसान होते आणि कधीकधी कर्करोग होतो. महाराष्ट्रातील 11 कोटी लोकसंख्येपैकी अंदाजे 6%-7% लोकांना हिपॅटायटीस बी आणि 0.5%-1% हिपॅटायटीस सी ची लागण होण्याची भीती आहे.