
सध्या तरुणाईमध्ये टॅटूची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चाललेली पाहायला मिळत आहे. पूर्वीच्या काळी ज्या गोष्टींला गोंदणं असं म्हटलं जायचं त्याची जागा आता टॅटू (Tattoo) या शब्दाने घेतली आहे. या वेगवेगळ्या डिझाईन्सच्या टॅटूंनी आपल्या शरीराच्या अनेक भागांवर टॅटू काढण्याची क्रेझ वाढत चालली आहे. टॅटू हा सध्या जरी फॅशनचा विषय बनला असला तरीही तो खूपच डोकेदुखी आणि शरीराला घातक असा पर्याय आहे हे तुम्हाला माहित आहे का? त्यामुळे जर तुम्हाला आपल्या शरीरावर टॅटू काढायचा असेल तर त्याआधी तुम्ही खाली दिलेल्या गोष्टींचा नीट काळजीपूर्वक विचार करावा.
टॅटू ही खरे तर एक ‘मिनी सर्जिकल प्रोसिजर’ आहे. त्यामुळे टॅटू काढण्यापुर्वी टॅटू आर्टिस्टने प्रत्येक ग्राहकासाठी वेगळ्या सुया वापरणे, स्वच्छता राखणे, ग्लोव्हज वापरणे अशा वेगवेगळ्या गोष्टींकडे जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे.
1. रक्तदान करण्यास येतो अडथळा
टॅटू काढल्यानंतर जवळपास 1 आठवडा कोणालाही रक्तदान करता येत नाही. कारण टॅटू काढताना वापरलेली शाई आणि घातक केमिकल्स आपल्या रक्तावाटे अन्य व्यक्तीच्या रक्तात मिसळू शकतात.
हेदेखील वाचा- पावसाळ्यात टॅटू किंवा पिअर्सरिंग करणार असाल तर सावधान, आजाराला बळी पडण्याची शक्यता
2. त्वचाविकार
अनेकांची त्वचा ही सेंसिटीव्ह असते. त्यामुळे अशी त्वचा असणाऱ्यांनी टॅटू काढण्यापूर्वी आवश्यकती खबरदारी घेणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा टॅटूसाठी वापरलेल्या सुयांचा एकाहून अधिक ग्राहकांसाठी वापर केला जातो. त्यामुळे त्वचाविकार होण्याची शक्यता असते. एचआयव्ही, हिपेटायटिस ‘बी’, हिपेटायटिस ‘सी’ अशा आजारांचे संक्रमण होण्याची शक्यता असते.
3. एमआरआय चाचणी करताना समस्या
बऱ्याच जणांना असं वाटतं की टॅटू काढल्यानंतर एमआरआय चाचणी करता येत नाही. परंतु असं नाहीये. टॅटू काढल्यानंतरही एमआरआय चाचणी करता येऊ शकते.मात्र चाचणी झाल्यानतंर येणाऱ्या रिपोर्टमध्ये एमआरआयची प्रतिमा थोडी खराब येण्याची शक्यता असते.
4. अॅलर्जिक रिअॅक्शन
टॅटू काढून घेणाऱ्याची त्वचा त्यातील ‘डाय’ला संवेदनशील असू शकते आणि त्यामुळे त्वचेवर अॅलर्जी येऊ शकते. त्यात खाज येणे, फोड येणे, त्यातून पाण्यासारखा स्राव येणे हे होऊ शकते. त्वचेला संसर्गही होऊ शकते.
त्यामुळे ज्यांना टॅटू काढायची हौस आहे त्यांनी नक्कीच आपली हौस पूर्ण करुन घ्या मात्र त्याआधी त्यानंतर होणारे परिणामही लक्षात घ्या.