Corn (PC -Pixabay)

पावसाळा आणि मकाचं कणीस असं एक समीकरणचं बनलं आहे. पासाळ्यात गरमागरम मक्याचं कणीस खाण्याची मजा काही औरचं. धो-धो कोसळणाऱ्या पावसात लिंबू-मीठ लावून भाजलेली कणसं खाणं हा अनेकांच्या आवडतीचा कार्यक्रम असतो. त्यामुळे पावसाळ्यात मक्याच्या कणसांना जास्त मागणी असते.

अनेकजण तर भाजून किंवा उकडून मक्याचं कणीस खातात. मक्याचं कणीस खाल्याने आपल्या शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे होतात. बाजारात अगदी सहजासहजी मिळणाऱ्या मक्याच्या कणीसाचे काही आरोग्यदायी फायदे आज या लेखातून जाणून घेऊयात...(हेही वाचा - Benefits of Coconut: रोज ओलं खोबरं खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासोबत शरीरास होतात 'हे' आरोग्यदायी फायदे)

हाडांना बळकटी मिळते -

मका खाल्ल्याने हाडांना बळकटी मिळते. मक्यामधील आर्यन, मॅग्नेशियम ही तत्वे हाडांना मजबूत करतात. तसेच यात झिंक आणि फॉस्फरसचे प्रमाण असते. त्यामुळे आपल्याला हाडांच्या आजारांपासून सुटका मिळते.

डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयोगी -

मक्याचं कणीस खाल्ल्याने तुमच्या डोळ्यांना मोठा फायदा मिळतो. यात व्हिटॉमिन ए आणि बीटा कॅरेटीन असते. त्यामुळे तुमची दृष्टी सुधारण्यास मदत होते.

शरीराला ऊर्जा मिळते -

मक्यात कार्बोहायड्रेट भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. आहारात मक्याचा समावेश केल्याने तुमचं पोट लवकर भरते.

पित्तावर गुणकारी -

बऱ्याच जणांना पित्ताचा आणि वाताचा त्रास असतो. अशा व्यक्तींसाठी मक्याचे कणीस खाणं फायदेशीर ठरू शकतं. मक्याचं कणीस उकडून त्यात हळद आणि मीठ घालून खाल्ल्यास वात किंवा पित्ताच्या विकारापासून आराम मिळतो.

कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत -

मक्यामुळे शरीरातील अतिरिक्त फॅट्स कमी होतात. मक्यात असलेल्या बायोफ्लेवोनॉयड्स, कॅरोटेनॉयइस, विटॉमिन्स आणि फायबर्स असतात. ज्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होते. त्यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठी मका फायदेशीर ठरतो.

हिमोग्लोबिनची कमतरता दूर होते -

मक्याचे कणीस खाल्ल्याने शरीरातील हिमोग्लोबिन तसेच रक्ताची कमतरता दूर होते. याशिवाय मक्याचे कणीस खाल्ल्याने पोट साफ होण्यास मदत होते.