तुळशीचे 'हे' 5 प्रकार आणि त्यांचे औषधी गुणधर्म तुम्हाला माहित आहेत का?
Tulsi (PC- File Photo )

भारतात तुळशीला अनन्य साधारण महत्त्व आहे. हिंदू धर्मात तुळशीची दररोज पुजा केली जाते. त्यामुळे प्रत्येकाच्या घरात तुळस (Tulsi) लावली जाते. शहरात चाळीत, गॅलरीत, ब्लॉकमध्ये किंवा बंगल्यात एक तरी तुळशीचे झाड लावलं जातं. तुळशीचे विविध प्रकार असून त्याचे वेगवेगळे फायदे आहेत. परंतु, तुम्हाला हे प्रकार कसे ओळखायचे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर हा खास लेख तुमच्यासाठी. चला तर मग तुळशीचे विविध प्रकार आणि त्यांचे गुणधर्म जाणून घेऊयात...

वेगवेगळ्या प्रदेशानुसार, तुळशीला वेगवेगळी नाव पडलेली आहेत. परंतु, असे असले तरी प्रत्येक वनस्पती ही जगभर एकाच शास्त्रीय नावाने (Botanical Name) ओळखली जाते. तुळशीच्या अनेक प्रजाती आहेत. त्यातील बहुतेक प्रजाती (Ocimum) या वंशात मोडतात. इंग्रजीत सर्व तुळशींना सरसकटपणे बेसिल (Basil) या नावाने संबोधले जाते. (हेही वाचा - Tulsi Vivah 2019: तुळशीचे 'हे' आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहिती आहेत का?)

तुळशीचे विविध प्रकार आणि त्यांचे औषधी गुणधर्म -

कृष्ण तुळस -

या तुळशीचे खोड, पाने, व मंजिऱ्या कमी-अधिक प्रमाणात गडद जांभळ्या रंगाची असतात. उन्हात वाढलेल्या व जुन्या झाडांमध्ये हा रंग जास्त ठळकपणे उठून दिसतो. याच तुळशीला 'काळी तुळस', असेही संबोधले जाते. या तुळशीचे पाने खाल्ल्याने सर्दी-खोकला, ताप यावर लवकर आराम मिळतो.

कृष्ण तुळस

राम तुळस -

राम तुळस ही मोठ्या पानांची, उंच व रानटी पद्धतीने वाढणारी तुळस आहे. या तुळशीच्या पानांना लवंग सदृश, मसालेदार असा सुवास येतो. पोटाच्या विकारांसाठी ही तुळस उपयुक्त आहे. या तुळशीला 'लवंगी तुळस', असेही संबोधले जाते.

राम तुळस

कापूर तुळस -

या तुळशीच्या पानांना कापराचा सुंगंध येतो. या तुळशीच्या तेलामध्ये 60 ते 80 % कापराचे प्रमाण असते. सर्दी, कफ, खोकला यावर कापूर तुळस गुणकारी ठरते. हर्बल टी बनवण्यासाठी ही तुळस उपयुक्त आहे.

कापूर तुळस

सब्जा तुळस -

आपल्या येथे सब्जाचे झाड खास त्याच्या बियांसाठी लावले जाते. शरीराला थंडावा देणारा सब्जा उन्हाळ्यात महत्वाचा ठरतो. जागोजागी मिळणारा वर्ल्ड फेमस फालुदा, सब्जा शिवाय बनू शकत नाही. या तुळशीची पाने व बिया सरबतात घालून प्यायल्याने उष्णता कमी होते. विंचू दंशावर सब्जा तुळशीचा पाला चुरडून लावला जातो.

सब्जा तुळस

वन तुळस -

अतिशय तीव्र असा सुवास असलेली ही तुळस विशेष औषधी आहे. पानांचा चोथा त्वचाविकारांवर वापरला जातो. तसेच न भरणाऱ्या जखमांवरही हा पाला लावला जातो. जंगली पद्धतीने वाढणाऱ्या या तुळशीचे ‘रान तुळस’ असेही नाव आहे.

वन तुळस/रान तुळस

तुळशीला 'औषधाची राणी' असं संबोधलं जातं. तुळशीच्या सेवनामुळे अगदी कर्करोगासारखे दुर्धर रोग ते सर्दी-खोकल्यासारखे सर्वसाधारण आजार बरे होतात. त्यामुळे अनेक शतकापासून तुळशीचा वापर केला जातो. भारतीय संस्कृतीत वृक्ष, झाडे, वनस्पती यांना आरोग्यात असलेले मोठे स्थान ऋषीमुनींपासून अधोरेखित केले गेले आहे. निसर्गात वाढणाऱ्या विविध वनस्पती आरोग्य राखण्यात उपयोगाच्या ठरतात हे आयुर्वेद तसेच शास्त्रांमध्ये सांगण्यात आले आहे. (सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे. हे उपाय करण्याअगोदर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.)