गर्भवती महिलांना (Pregnant Women) कोविड-19 लस (Covid-19 Vaacine) देण्यात यावी की नाही, याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून संभ्रम निर्माण झाला होता. परंतु, गर्भवती महिला लस घेऊ शकतात आणि त्यांनी नक्कीच घ्यावी, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Union Health Ministry) स्पष्ट केले आहे. कोरोना विरुद्धची लस स्तनदा मातांसाठी सुरक्षित आहे. परंतु, गर्भवती महिलांसाठी नाही, असे मागील महिन्यात सरकारने सांगितले होते. क्लिनिकल ट्रायल्समधून पुरेसा डेटा न मिळाल्यामुळे गर्भवती महिलांच्या सुरक्षिततेसाठी सरकारने हा निर्णय घेतला होता.
"गर्भवती महिलांना कोविड-19 लस देणे अगदी सुरक्षित आहे आणि यासंबंधी आरोग्य मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना देखील जारी केल्या आहेत," अशी माहिती आयसीएमआरचे (ICMR) डिरेक्टर जनरल डॉ. बलराम भार्गव (Dr. Balram Bhargava) यांनी एएनआयशी (ANI) बोलताना दिली. (कोविड-19 लसी Delta Plus वेरिएंटवर परिणामकारक? ICMR च्या अभ्यासातून लवकरच होणार खुलासा)
गर्भवती महिलांना लस देण्यासंबंधी नॅशनल टेक्निकल अॅडव्हायजरीमध्ये मे महिन्यात चर्चा सुरु होती. सध्याची कोरोनीची परिस्थिती पाहता गर्भवती महिलांना लसीकरणापासून वगळण्यात यावे, असा निर्णय 28 मे च्या बैठकीत घेण्यात आला होता. कोविशिल्ड लस घेतल्याने गर्भवती महिला आणि तिच्या बाळाला ब्लड क्लॉटिंगचा धोका निर्माण होऊ शकतो, असे देखील प्रश्न उद्भवले होते. परंतु, लस घेतल्याने गर्भवती महिलांना फायदाच होईल आणि ही लस महिला व तिच्या होणाऱ्या बाळासाठी अगदी सुरक्षित आहे, असेही कमिटीने सांगितले आहे.
दरम्यान, गर्भवती महिलांना लसीकरणातून वगळण्यात येण्याच्या निर्णयावर शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी प्रश्न उपस्थित केले होते. जर एखाद्या महिलेला लस घ्यायची असल्यास तर केवळ बायोलॉजिकल प्रोसेसमुळे तिला तुम्ही कसे अडवू शकाल?, असे त्यांनी म्हटले होते.