कोविड-19 लसी Delta Plus वेरिएंटवर परिणामकारक? ICMR च्या अभ्यासातून लवकरच होणार खुलासा
Coronavirus Delta Plus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदचे (Indian Council of Medical Research) तज्ञ कोविड-19 लसींचा (Covid-19 Vaccines) डेल्टा प्लस (Delta Plus) वेरिएंटवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करत आहेत. लवकरच याचे निकाल हाती येतील. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, लस घेणाऱ्यांकडून अँटीबॉडीजचे न्युट्रलायझेशन कसे होत आहे, याचा सखोल अभ्यास केला जात आहे, अशी माहिती आयसीएमआरचे (ICMR) शास्त्रज्ञ डॉ. सामिरान पांडा (Dr Samiran Panda) यांनी दिली. काही आठवड्यांमध्येच आपल्या हाती या अभ्यासाचे निष्कर्ष येतील असेही ते म्हणाले. तसंच डेल्टा प्लस वेरिएंटचे रुग्ण आढळलेल्या परिसरामध्ये कठोर निर्बंध लागू करावेत आणि त्या परिसरातील लसीकरणाचे प्रमाण वाढवावे, असेही त्यांनी सर्व राज्यातील सरकारला सूचित केले आहे. (Covid-19 Delta Plus Variant in Maharashtra: कोरोना व्हायरसच्या डेल्टा प्लस वेरिएंटच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा कठोर निर्बंध)

कोरोनाचा पहिल्या वेरिएंटची लागण झालेल्या रुग्णांमध्ये तयार झालेल्या अँटीबॉडीज या कोविड-19 च्या सर्व वेरिएंट्सविरुद्ध तपासल्या जात आहेत, अशी माहिती न्युरोलॉजिस्ट डॉ. टी. जेकब जॉन यांनी दिली. याधीच्या वेरिएंट लक्षात घेऊन बनवलेल्या लसी अजूनही यशस्वी आहेत. त्यामुळे लसीमुळे निर्माण होणारी प्रतिकारक शक्ती ही डेल्टा प्लस वेरिएंटविरुद्ध सुद्धा कार्य करेल, असे ते म्हणाले.

सध्या डेल्टा प्लसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या खूप कमी असून याचा प्रसार किती वेगाने होतो, हे अजून आपणास ज्ञात नाही. डेल्टा वेरिएंटपेक्षा याचा अधिक वेगाने प्रसार होतो का, हे जाणणे गरजेचे आहे. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात देशात डेल्टा वेरिएंटचे रुग्ण आढळले होते. परंतु, त्यावेळेस केलेला हलगर्जीपणा आता करु चालणार नाही, हे सर्व कोविडचे वेरिएंट असल्यामुळे लस घेतलेल्यांना यापासून काही प्रमाणात सुरक्षा मिळेल, असे डॉ. जॉन यांनी सांगितले.

दरम्यान, देशात कोविड-19 ची दुसरी लाट ओसरत असताना डेल्टा प्लस वेरिएंटने डोके वर काढले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या देशात डेल्टा प्लस वेरिएंटचे 40 रुग्ण आढळून आले असून एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे.