राज्यात कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) बदलत्या रुपाचा म्हणजेच डेल्टा प्लस वेरिएंटचा (Delta Plus Variant) धोका वाढल्याचे दिसून येत आहे. राज्यात डेल्टा प्लस स्ट्रेनचा संसर्ग झालेले एकूण 21 रुग्ण आढळून आले असून काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीत वाढ झाली आहे. याचपार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. राज्यात पाच टप्प्यात निर्बंध शिथिल केले जात होते. त्या पद्धतीत आता बदल करण्यात येणार असून दुकानांच्या वेळेतही बदल होण्याचे संकेत आहेत.
राज्यात 7 जून पासून 'ब्रेक द चेन' अंतर्गत लागू करण्यात आलेले कठोर निर्बंध शिथिल होण्यास सुरुवात झाली. कोरोनाचा पॉझिटीव्हीटी रेट आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता या आधारे पाच टप्प्यात निर्बंध शिथिल करण्यात येत होते. मात्र मुंबई, पुणे, ठाणे, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नाशिक, रायगड या 10 जिल्ह्यांमध्ये कोरोना बाधितांचे प्रमाण राज्याच्या सरासरीपेक्षा अधिक आहेत. तसंच निर्बंध शिथिल केल्यासपासून त्यात रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू करण्याबाबत मंत्रिंडळात चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
त्याचबरोबर तिसऱ्या लाटेचा धोका असल्याने पुन्हा एकदा पूर्वीसारखे निर्बंध लादण्याबाबतही चर्चा झाली. त्यामुळे सध्या पाच टप्प्यात सुरु असलेले शिथिलीकरणाची पद्धत बदलून किंवा रद्द करुन दोन दिवसांत नवीन आदेश काढण्यात येणार असल्याचेही सुत्रांनी सांगितले आहे. (महाराष्ट्रासह 'या' 3 राज्यांना कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरीएंटचा धोका, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सावध राहण्याचा इशारा)
दरम्यान, राज्यात काल कोविड-19 चे 10,066 नवे रुग्ण आढळून आले असून 163 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात 1,21,859 अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. विशेष म्हणजे डेल्टा प्लस वेरिएंटचा धोका वाढला आहे. देशात आतापर्यंत डेल्टा प्लस वेरिएंटचे एकूण 40 रुग्ण आढळून आले असून महाराष्ट्र, केरळ आणि मध्य प्रदेशमध्ये हे रुग्ण असल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.