Coronavirus Outbreak (Photo Credits: IANS)

Coronavirus In India: कोरोनाच्या (Coronavirus) घटत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर डेल्टा प्लस व्हेरियंट हे देशातील कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचे (Coronavirus Third Wave in India) कारण ठरू शकते, असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. हा प्रकार जगातील 9 देशांमध्ये आहे. यातच इन्साकॉग- इंडियन सार्स कोवि-2 जीनोम कंसॉर्टीयाच्या अलीकडच्या अध्ययनाच्या आधारावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Union Health Ministry) महाराष्ट्र (Maharahtra), केरळ (Kerala) आणि मध्यप्रदेश (Madhya Pradesh) या राज्यांना कोविड-19 च्या डेल्टा प्लस या नव्या प्रकाराबाबत सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. हा नव्या स्वरूपाचा विषाणू या राज्यांच्या काही जिल्ह्यात आढळला आहे.

आतापर्यंत भारतात डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या 22 घटना समोर आल्या आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात 16 तर, उर्वरित प्रकरणे मध्य प्रदेश आणि केरळमधील आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या तिन्ही राज्यांना पत्र पाठवले आहे. महाराष्ट्राच्या रत्नागिरी आणि जळगाव जिल्ह्यांत, केरळच्या पलक्कड आणि पाठ्नामथित्ता जिल्ह्यांत तसेच मध्यप्रदेशातील भोपाळ आणि शिवपुरी जिल्ह्यात हा व्हेरीयंट आढळला आहे. हे देखील वाचा- COVID-19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 42,640 नवे कोरोना रूग्ण; गेल्या 91 दिवसांमधील निच्चांकी रूग्णवाढ

इंसाकॉग ने निश्चित केलेले या विषाणूच्या संसर्गाचे समूह आणि जिल्ह्यांमध्ये प्रतिबंधित क्षेत्राविषयीच्या उपाययोजना तातडीने अमलात आणल्या जाव्यात असे निर्देश, राज्यांच्या मुख्य सचिवांना देण्यात आले आहेत. यात गर्दी आणि सार्वजनिक ठिकाणी संचारावर निर्बंध, चाचण्यांची संख्या वाढवणे, संशयित रुग्णांचा माग अशा उपायांचा समावेश आहे. तसेच या भागात लसीकरणाला वेग देण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

कोविड पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांच्या स्वाबचे नमुने ताबडतोब इंसाकॉगच्या प्रयोगशाळांमध्ये पाठवले जावे जेणेकरुन त्यांचे क्लिनिकल परीक्षण लगेच केले जाऊन, राज्यांना त्याविषयी माहिती दिली जाऊ शकेल, अशीही सूचना राज्यांना देण्यात आली आहे.