कोरोना विषाणूची (Coronavirus) लस तयार करण्यासाठी भारतासह जगभरातील शास्त्रज्ञ अहोरात्र प्रयत्न करत आहेत. दरम्यान, भारत (India) आणि अमेरिकेतील (US) आयुर्वेदिक (Ayurvedic) चिकित्सक आणि संशोधक, आयुर्वेदाच्या माध्यमातून कोरोनाचा इलाज शोधण्यासाठी एकत्र क्लिनिकल चाचण्या (Clinical Trials) सुरू करणार आहेत. अमेरिकेतील भारतीय राजदूत तरनजित सिंह संधू (Taranjit Singh Sandhu) यांनी याबाबत माहिती दिली, ते म्हणाले, कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी आयुर्वेदिक चिकित्सक आणि संशोधक आयुर्वेदिक औषधांची संयुक्त क्लिनिकल चाचणी सुरू करण्याचा विचार करीत आहेत. बुधवारी भारतीय-अमेरिकन शास्त्रज्ञ, विद्वान आणि डॉक्टरांच्या गटाशी डिजिटल संवादात संधू म्हणाले की, संस्थात्मक सहभागाच्या व्यापक समुदायामुळे कोविड-19 विरुद्धच्या लढाईत दोन्ही देशांतील वैज्ञानिक समुदाय एकत्र आले आहेत.
संधू म्हणाले, 'आमच्या संस्था एकत्रित संशोधन, शिक्षण व प्रशिक्षण कार्यक्रमांच्या माध्यमातून आयुर्वेदाच्या संवर्धनासाठी एकत्र आल्या आहेत. कोविड-19 पासून बचाव करण्यासाठी आयुर्वेदिक चिकित्सक आणि दोन्ही देशांचे संशोधक आयुर्वेदिक औषधांची संयुक्त क्लिनिकल चाचणी सुरू करण्याचा विचार करीत आहेत. आपले शास्रज्ञ या आघाडीवर ज्ञान आणि संशोधन संसाधनांची देवाणघेवाण करीत आहेत.' पुढे ते म्हणाले, ‘स्वस्त औषध आणि लस तयार करण्यात भारतीय औषधी कंपन्या अग्रेसर आहेत आणि या साथीच्या आजाराविरुद्धच्या लढाईत मध्येही त्या महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील.’ (हेही वाचा: जगभरातील COVID19 चा आकडा 12 दशलक्षांच्या पार तर बळींचा आकडा 548,000 वर पोहचला- जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटी
राजदूतांच्या मते, अमेरिकेमधील संस्थांशी भारतीय औषध कंपन्यांचे किमान तीन करार झाले आहेत. याचा केवळ भारत आणि अमेरिकेलाच फायदा होणार नाही, तर ज्यांना कोविड-19 पासून बचावासाठी लसींची आवश्यकता आहे, अशा जगभरातील कोट्यावधी लोकांना याचा फायदा होणार आहे. सध्या भारतीय आणि अमेरिकन कंपन्यांच्या सहकार्याने किमान 3 लसींवर काम सुरू आहे.
दरम्यान, कोरोना विषाणू विरुद्धच्या लढाईमध्ये आयुष मंत्रालयाने आयुर्वेदाचा आधार घेण्याचा विचार केला आहे. आयुष-64, अगस्त्य हरिताकी आणि रेणू तेल, या गोष्टी ज्यांना लक्षणे नाहीत अशा आणि गंभीर रूग्णांना देण्याची तयारी आहे. ही तीन औषधे ताप, खोकला आणि श्वासोच्छवासाची त्रास असलेल्या रुग्णांना दिली जातील. याचे परिणाम सकारात्मक आल्यानंतर, सामान्य नागरिकांनाही ते )उपलब्ध करुन देण्यात येईल. आयुष मंत्रालयानेही यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.