Coronavirus Outbreak: घरगुती Reusable Face Cover, Cloth Mask वापरताना या खास टीप्स नक्की लक्षात ठेवा
Coronavirus in India | Representational Image | (Photo Credits: IANS)

मुंबई, पुणे शहरांमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे आता सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासोबतच बाहेर पडताना फेस मास्क किंवा कव्हर वापरण्याची वेळ आली आहे. कोरोना व्हायरसची लागण होऊनादेखील सार्‍यांनाच कोरोना व्हायरसची लक्षण दिसतातच असे नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक हे कोरोना व्हायरसचे सायलंट कॅरियर बनत आहेत. यामुळे त्या व्यक्तीच्या आजुबाजूला असणार्‍या अनेकांमध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग पसरत आहे. त्यामुळे आता अशाप्रकारे कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी गर्दीच्या शहरांमध्ये प्रत्येक नागरिकांनी मास्क घालून म्हणजेच नाक आणि तोंड हे कापडाने बंद करून बाहेर पडण्याचा सल्ला आरोग्य मंत्रालयाकडून जारी करण्यात आला आहे. दरम्यान नागरिकांना यासाठी बाजारात जाऊन मास्कची खरेदी करण्याची गरज नाही. घरच्या घरी देखील नागरिकांना स्वच्छ कापडापासून मास्क बनवता येऊ शकतो. त्यासाठी अनेक व्हिडिओ, DIY फेस मास्क व्हिडिओ युट्युबवर उपलब्ध आहेत. मात्र हे मास्क वापरताना काही गोष्टींची विशेष काळजी घेणं आवश्यक असल्याचं आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे घरच्या घरी बनवलेल्या मास्कचा वापर करत असाल तर या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. Coronavirus: कोरोना संदर्भात ज्येष्ठांनी घ्यावयाच्या काळजीबाबत केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाची मार्गदर्शक सूचना जारी.  

घरगुती Reusable Face Cover / Cloth Mask चा वापर करताना लक्षात ठेवा या टीप्स

  • तुम्हांला श्वसनाचा कोणता त्रास नसेल तर तुम्ही बाहेर पडताना घरगुती कापडाच्या फेस कव्हरचा वापर करणं सुरक्षित आहे.
  • फेस कव्हर बनवण्यापूर्वी कापड स्वच्छ धुणं आवश्यक आहे.
  • घरातील प्रत्येक व्यक्तीसाठी 2 फेस मास्क तयार ठेवा. एक धुतलेलं असेल, दमट असेल तर दुसरं स्वच्छ फेस कव्हर वापरू शकाल.
  • प्रत्येक वेळेस फेस कव्हर वापरण्यापूर्वी हात साबणाने किंवा हॅन्ड सॅनिटायझरने स्वच्छ धुवावेत.
  • वापरल्यानंतर किंवा धुतलेला फेस मास्क घरात कुठेही ठेवू नका. त्याला स्वच्छ आणि ठराविक ठिकाणी ठेवा.
  • फेस कव्हर, मास्क धुताना गरम पाणी आणि साबणाचा वापर करा. तसेच ते पुन्हा वापरण्यापूर्वी नीट कोरडे करा.
  • कुटुंबीयांसमवेत किंवा इतर कुणाही व्यक्तीसोबत तुमचं फेस मास्क शेअर करू नका. घरातील प्रत्येक व्यक्तीसाठी स्वतंत्र फेस मास्क बनवा.
  • जर तुम्ही कोरोना बाधित, संशयित किंवा कोरोनाबधितांवर उपचार करण्यांपैकी, त्यांची सेवा करणार्‍यांपैकी एक असाल तर घरगुती फेस मास्क वापरणं टाळा. अशा व्यक्तींना खासमास्क, प्रोटेक्टिव्ह गियर वापरणं अत्यावश्यक आहे. Coronavirus: बाजारात 'मास्क' उपलब्ध नसतील तर 'या' सोप्या पद्धतीने बनवा 'घरगुती मास्क': पहा व्हिडिओ.

दरम्यान महाराष्ट्रासह भारतामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. अद्याप या जीवघेण्या आजारावर औषध नसल्याने प्रत्येकाला खबरदारीचा उपाय म्हणून सरकारच्या आदेशांचं पालन करणं आवश्यक आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळणं गरजेचे आहे. घरातही एकमेकांसोबत बोलताना, वावरताना विशिष्ट अंतर ठेवा. अनावश्यक गर्दी टाळा.