Coronavirus: नाकावाटे मेंदूमध्ये प्रवेश करू शकतो कोरोना व्हायरस; संशोधनामधून धक्कादायक खुलासा
Coronavirus | Representational Image | (Photo Credits: PTI)

जगभरात कोरोना विषाणूने (Coronavirus) हाहाकार माजवला आहे. या धोकादायक विषाणूवर मात करण्यासाठी वैज्ञानिक सातत्याने संशोधन व अभ्यास करत आहेत. आता शास्त्रज्ञांनी असा दावा केला आहे की, कोरोना व्हायरस नाकावाटे लोकांच्या मेंदूत प्रवेश करू शकतो. अलीकडील कोरोना रूग्णांमध्ये 'न्यूरोलॉजिकल' लक्षणे (Neurological Symptoms) म्हणजेच मानसिक आजाराची लक्षणे आढळली असल्याने असे दावे केले जात आहेत. अभ्यासाच्या निष्कर्षांच्या मदतीने कोविड-19 रोगामध्ये न्यूरोलॉजिकल लक्षणे का उद्भवतात आणि अशा रूग्णांवर त्याबाबत कसे उपचार करावे, हे शोधणे आता शक्य होईल. शास्त्रज्ञांनी केलेला हा अभ्यास नेचर न्यूरो सायन्स या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आहे.

अभ्यासानुसार, सार्स-सीओव्ही-2 केवळ श्वसन प्रणालीवरच नव्हे तर मध्यवर्ती मज्जासंस्थेवरही परिणाम करतो, ज्यामुळे गंध आणि चव जाणे, डोकेदुखी, थकवा आणि मळमळ यांसारखे वेगवेगळे 'न्यूरोलॉजिकल' लक्षणे उद्भवतात. संशोधकांनी या विषयाचा गंभीरपणे अभ्यास केला आहे. या अभ्यासासाठी कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्या 33 रुग्णांची निवड केली. या रुग्णांपैकी 22 पुरुष तर 11 महिला आहेत. या संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांचे सरासरी वय 71.6 वर्षे होते. त्याच वेळी, त्यांना कोरोना झाल्यापासून त्यांचा मृत्यू होण्यापर्यंतचा सरासरी वेळ 31 दिवस होता. मेंदू आणि श्वसनमार्गामध्ये सार्स-सीओव्ही-2 आरएनए आणि प्रथिने आढळली आहेत. यामुळे पुढील संशोधनात खूप मदत होईल. (हेही वाचा: संपूर्ण देशाला दिली जाणार नाही कोरोना विषाणू लस; आरोग्य मंत्रालयाची लसीकरणाबाबत महत्वाची माहिती)

ताज्या अभ्यासात, मेंदूत व्हायरल 'आरएनए' आणि 'सेरेब्रोस्पिनल फ्लुइड' असण्याचे सांगण्यात आले आहे. परंतु व्हायरस कुठून प्रवेश करतो आणि तो कसा पसरतो हे अस्पष्ट आहे. यासाठी जर्मनीच्या चरीटा विद्यापीठातील संशोधकांनी श्वसनमार्गाची तपासणी केली (घश्याच्या वरच्या भागापासून नाकापर्यंत) आहे. दरम्यान, जगात कोरोनाची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत आहेत. सध्या जगात एकूण 63,660,757 कोरोनाचे रुग्ण आढळले असून, 1,475,691 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 44,059,396 रुग्ण बरे झाले आहेत.