मुंबई सह महाराष्ट्रामध्ये डोळे येणे (Conjunctivitis) आजारामध्ये वाढ झाली असल्याचे दिसत आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने सामायिक केलेली आकडेवारीनुसार, आतापर्यंत मुंबईमध्ये डोळे येणे आजाराची 3,462 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. त्यापैकी 1 ते 13 ऑगस्ट दरम्यान 3,360 नोंदणीकृत आहेत; म्हणजे दररोज 250 हून अधिक लोकांना हा आजार होत आहे.
नागरी संचालित रुग्णालयांपैकी एका वरिष्ठ नेत्ररोग तज्ज्ञाने सांगितले की, यावर्षी डोळे येणे रुग्ण संख्येमध्ये वाढ झाली आहे आणि ते संशोधन करणे आवश्यक असलेल्या विविध ताणांमुळे असू शकते. हा आजार विशेषतः 25 ते 40-50 वयोगटातील कामगार वर्गाला प्रभावित करतो. परंतु आजपर्यंत एकही गंभीर प्रकरण नोंदवले गेले नाही. बहुतांश रुग्ण तीन-चार दिवसांत बरे होत आहेत.
सर एचएन रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयातील नेत्ररोग विभागाचे संचालक डॉ सुजल शाह म्हणाले, ‘आम्ही या रोगाच्या घटनांमध्ये अचानक वाढ होत असल्याचे पाहिले आहे. महाराष्ट्राचे आरोग्य सेवा संचालक डॉ नितीन अंबाडेकर यांनी आश्वासन दिले की, पावसाळ्यात अशा रुग्णांची संख्या जास्त आहे मात्र त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही.
दुसरीकडे, नागरी आरोग्य विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ‘मुंबई शहरात फारसे रुग्ण आढळत नाहीत. सध्या मुंबईत सर्व रोग किंवा विषाणू नियंत्रणात आहेत आणि नागरिकांवर डोळे येणे रोगाचा फारसा प्रभाव पडत नाही. आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत आणि फक्त सौम्य प्रकरणे नोंदवली जात आहेत.’ (हेही वाचा: महाराष्ट्रातील सरकारी रुग्णालयांमध्ये मिळणार मोफत उपचार; 15 ऑगस्टपासून सुरु होणार निणर्याची अंमलबजावणी)
दरम्यान, डोळे येणे मुख्यत्वे ॲडिनो वायरसमुळे होतो. हा सौम्य प्रकारचा संसर्ग आहे. साधारणपणे या रुग्णामध्ये डोळा लाल होणे, वारंवार पाणी गळणे, डोळ्याला सुज येणे अशी लक्षणे आढळतात. डोळे आलेल्या व्यक्तींनी स्वत:ला घरामध्ये विलगीकरण करणे गरजेचे आहे. आजाराचा संसर्ग एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला वेगाने होतो. त्यामुळे हा आजार होवू नये म्हणून वारंवार हात धुणे, वैयक्तिक स्वच्छता ठेवणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार घेणे, डोळ्यांना हात न लावून या आजाराला प्रतिबंध करावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.