Health Insurance (PC -Pixabay)

Cashless Health Insurance At Any Hospital: आरोग्य विमा पॉलिसी (Health Insurance Policy) खरेदी करणाऱ्यांसाठी क्रांतिकारी निर्णय समोर आला आहे. अशा लोकांना आता उपचार घेतलेले रुग्णालय विमा कंपनीच्या यादीत आहे की नाही याची पर्वा न करता, देशातील कोणत्याही रुग्णालयात कॅशलेस उपचार (Cashless Treatment) घेण्याची सुविधा मिळणार आहे. जनरल इन्शुरन्स कौन्सिलने (GIC) पॉलिसीधारकांच्या हितासाठी हा निर्णय घेतला आहे. सर्वसाधारण आणि आरोग्य विमा कंपन्यांशी चर्चा केल्यानंतर परिषदेने 'कॅशलेस एव्हरीव्हेअर' उपक्रम सुरू केला आहे. यामध्ये देशातील कोणत्याही रुग्णालयात कॅशलेस उपचार सुविधा उपलब्ध करून देण्याचे मान्य करण्यात आले आहे.

सध्या, आरोग्य पॉलिसी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना विमा कंपनीच्या नेटवर्कमध्ये समाविष्ट असलेल्या हॉस्पिटलमध्येच कॅशलेस उपचाराची सुविधा मिळू शकते. जर एखादे रुग्णालय कंपनीच्या नेटवर्कमध्ये समाविष्ट नसेल, तर तेथे उपचारासाठी, पॉलिसीधारकाला संपूर्ण रक्कम स्वतः भरावी लागते आणि नंतर त्याला विमा कंपनीकडून प्रतिपूर्ती करावी लागते. यात अडचण अशी आहे की, जर व्यक्तीकडे उपचारासाठी पैसे नसतील तर त्याला विम्याचा लाभ मिळू शकत नाही. मात्र यापुढे याबाबत चिंता करण्याची गरज भासणार नाही.

'कॅशलेस एव्हरीव्हेअर' उपक्रमांतर्गत, कंपनीच्या नेटवर्कमध्ये समाविष्ट नसलेल्या हॉस्पिटलमध्येही विमाधारक कॅशलेस उपचार घेऊ शकतील. हॉस्पिटल त्यांच्या नेटवर्कमध्ये असो वा नसो, तुमची विमा कंपनी हॉस्पिटलमध्ये केलेल्या उपचारांसाठी पैसे देण्यास बांधील असेल.

ज्या रुग्णालयांमध्ये 15 पेक्षा जास्त खाटांची सुविधा आहे आणि ज्यांची राज्य आरोग्य प्राधिकरणाकडे नोंदणी आहे, अशा ठिकाणी कॅशलेस उपचाराच्या सुविधेचा लाभ घेता येईल. नेटवर्कमध्ये समाविष्ट नसलेल्या रुग्णालयांमध्ये उपचारांचा खर्च विमा कंपन्यांच्या नेटवर्क असलेल्या रुग्णालयातील दरांच्या आधारे ठरवला जाईल. यामुळे कंपन्या ग्राहकांकडून मनमानी पद्धतीने पैसे आकारू शकणार नाही.

यासाठी विमाधारकांनी पुढील बाबी लक्षात ठेवाव्यात-

  • जर एखाद्या व्यक्तीला कंपनीच्या नेटवर्कमध्ये नसलेल्या रुग्णालयात उपचार घ्यायचे असतील, तर त्याला त्याच्या विमा कंपनीला 48 तास अगोदर कळवावे लागेल.
  • एखाद्याला आपत्कालीन परिस्थितीत उपचार घेण्याची आवश्यकता असल्यास, अशा परिस्थितीत, त्याला रुग्णालयात दाखल केल्याच्या 48 तासांच्या आत त्याच्या विमा कंपनीला कळवावे लागेल.
  • कंपनीने दिलेल्या पॉलिसीमध्ये नमूद केलेल्या नियमांनुसार कॅशलेस उपचाराची सुविधा असेल. नव्या नियमाचा त्यावर कोणताही परिणाम होणार नाही. (हेही वाचा: Motivational Story Of Brigadier: डॉक्टर म्हणाले 'आयुष्यभर सायकल चालवू शकणार नाही'; ब्रिगेडीयरने केला 'कश्मीर ते कन्याकुमारी' Bicycle प्रवास)

दरम्यान, कॅशलेस उपचाराची सुविधा मिळाल्याने कंपनी आणि ग्राहक दोघांनाही फायदा होईल. सध्या एखाद्या ग्राहकाने नेटवर्क नसलेल्या रुग्णालयात उपचार घेतल्यास त्याला विम्याची रक्कम मिळवण्यासाठी अनेक कागदपत्रे जोडावी लागतात. त्याशिवाय, विमा कंपन्यांच्या सर्व प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात. कॅशलेस उपचार झाल्यास ही समस्या संपेल. दुसरीकडे, बनावट बिलांद्वारे दावे करण्यासारख्या घटनांना आळा बसल्याने, विमा कंपन्यांनाही फायदा होईल.