अनेक लोकांचा असा विश्वास आहे की थोडीशी दारू (Alcohol) प्यायल्याने शरीराला कोणतेही नुकसान होत नाही, परंतु आता जागतिक आरोग्य संघटना (WHO) म्हणते की थोडेसे मद्यपान केल्यानेही शरीरावर अनेक दुष्परिणाम होतात. डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार, असे कोणतेही सुरक्षित प्रमाण नाही ज्यामध्ये असे म्हणता येईल की ‘इतक्या प्रमाणात’ दारू पिल्यास ते आरोग्यासाठी हानिकारक ठरणार नाही. डब्ल्यूएचओने द लॅन्सेट हेल्थ जर्नलमध्ये म्हटले आहे की, अल्कोहोलच्या सेवनाने सात प्रकारच्या कर्करोगाचा धोका वाढतो.
डॉ. कॅरिना फरेरा म्हणतात की अल्कोहोलचे ठराविक प्रमाण शरीरासाठी सुरक्षित आहे या दाव्याबाबत काहीही ठोस सांगता येणार नाही. दुसरीकडे अल्कोहोलमुळे यकृत, तोंड, पोट, स्तन, कोलन कर्करोग होण्याचा धोका अनेक पटींनी वाढतो. शरीरात जर कर्करोगाच्या पेशी आधीच वाढत असतील तर, दारूमुळे त्या आणखी वाढू शकतात.
डब्ल्यूएचओने म्हटले आहे की दारू किती महाग आहे किंवा ती कोणत्या ब्रँडची आहे याने काही फरक पडत नाही. कोणत्याही स्वरूपात अल्कोहोलचे सेवन हानिकारक आहे. भलेही अगदी कमी प्रमाणात घेतली तरी. दारूचा एक थेंब देखील हानी पोहोचवू शकतो असे डब्ल्यूएचओने म्हटले आहे. जितके जास्त अल्कोहोलचे सेवन केले जाईल तितके शरीरातील रोगांचा धोका वाढेल. दारू ही यकृताव्यतिरिक्त मूत्रपिंड आणि आतड्यांचे देखील नुकसान करते, असे आरोग्य संस्थेने म्हटले आहे.
जे लोक स्वस्त दारू पितात त्यांना मृत्यू आणि रुग्णालयात दाखल होण्याचा धोका सर्वाधिक असतो. अशी प्रकरणे गरीब आणि वंचित घटकातील लोकांमध्ये जास्त दिसतात. अल्कोहोलची थोडीशी मात्रा देखील स्लो पॉयझन म्हणून कार्य करते. त्यामुळे निरोगी व्यक्तीमध्ये अनेक आजार होऊ शकतात. संशोधनात असे म्हटले आहे की तंबाखू आणि सिगारेटप्रमाणेच अल्कोहोलमुळे देखील कर्करोग होतो, परंतु लोकांना हे माहित नाही. अल्कोहोलमुळे रोगप्रतिकारशक्तीही कमकुवत होते, त्यामुळे टीबीचा धोका असतो. (हेही वाचा: Heart Attack In Winters: हृदयविकाराचा धोका हिवाळ्यात वाढतो? काय सांगतात हृदयविकाराचे तज्ज्ञ?)
गर्भवती महिलेने दारूचे सेवन केले तर त्याचा परिणाम तिच्या बाळावरही होतो. परंतु जगभरात दारूचे सेवन करणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे ही चिंतेची बाब आहे. अशा परिस्थितीत आजारांचा धोकाही वाढत आहे. डब्ल्यूएचओ सल्ला देतो की तंबाखू उत्पादनांप्रमाणेच, अल्कोहोलवर देखील कर्करोगाचा इशारा दिला पाहिजे. दरम्यान, युरोपातील अनेक भागात अल्कोहोल हेच कर्करोगाचे कारण असल्याचे नवीन आकडेवारीवरून दिसून येते. इथले लोक भरपूर दारू पितात आणि त्यामुळेच 20 कोटींहून अधिक लोकांना कर्करोग होण्याचा धोका आहे.