Beauty Benefits Of Ajwain: आजीच्या बटव्यात हमखास सापडणारा जादुई पदार्थ म्हणजे ओवा (Ajwain) , पोटदुखीपासून ते सर्दी पडसं पर्यंत सगळ्याच आजारांवर गुणकारी औषध म्हणून ओळखला जातो. ओवा हा भारतीय किचन (Indian Kitchen) मध्ये एक अविभाज्य घटक मानला जातो. ओव्यामध्ये शरीरासाठी पोषक असलेल्या तत्वांची मात्रा इतकी असते की प्राचीन काळापासून अनेक ग्रंथांमध्ये ओव्याला औषध म्हणून सांगण्यात आले आहे. पण हा ओवा तुमच्या त्वचेसाठी किती गुणकारी आहे हे तुम्हाला माहित आहे का? ओव्याचा वापर करून चेहऱ्यावरील मुरुमं घरच्याघरीच अगदी काही दिवसात घालवता येऊ शकतात. चला तर मग पाहुयात या अस्सल भारतीय पदार्थाचे खास फायदे...
त्वचेचे आरोग्य सुधारतो ओवा
ओव्याचे पाणी म्हणजे ओमा हे त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठी अत्यंत फायद्याचे मानले जाते. चेहऱ्यावरील मुरुमं व डाग घालवण्यासाठी याची मदत होते. मुळात दररोज ओव्याचे सेवन केल्यास पांचन प्रक्रिया सुकर होते परिणामी शरीरात शुद्ध रक्ताची मात्रा वाढते त्यामुळे एकंदरीतच त्वचेला देखील फायदा होत असल्याचे अनेक गृहिणी सांगतात. अतिउन्हाच्या दिवसात चेहरा सुकल्यावर किंवा लाल झाल्यावर ओवा किंवा ओव्याचे पाणी चेहऱ्यावर लावल्याने त्वचेच्या आद्रतेची पातळी टिकून राहते. उन्हाळ्यात हवी नितळ, मुलायम, निरोगी त्वचा? घरच्या घरी करा हे उपाय
(Watch Video)
सौंदर्य तज्ज्ञांच्या माहितीनुसार ओव्यामध्ये थायमॉल आणि गामा-टर्पिनेन हे नैसर्गिक रसायन असते जे जंतूनाशकाचे काम करतात त्यामुळे चेहऱ्याला ओवा भरडून पेस्ट करून लावल्यास त्वचा रोगांपासून बचाव होतो. याशिवाय अख्खा ओवा लावल्यास तो एक उत्तम स्क्रब म्हणून देखील काम करू शकतो.
कसा वापराल ओवा
ओव्याचे पाणी बनवण्यासाठी काही विशेष मेहनत करावी लागत नाही यासाठी चेहऱ्याला लावायच्या साधारण अर्धा एक तास आधी ओवा पाण्यात भिजवून ठेवल्यास त्याचे गुण आपोआप पाण्यात उतरतात त्यानंतर हे पाणी उकळून किंवा थंड करून तुम्ही ओमा तयार करू शकता. या पाण्यात चिमूटभर मीठ टाकून प्यायल्याने देखील फायदा होतो.
ओवा हा खरतर त्वचेबरोबर केसांसाठी देखील गुणकारी मानला जातो. ओव्यांतील पोषक तत्व केस यावेळी पांढरे होणे थांबवून कोंडा घालवण्यात देखील मदत करतात.
सूचना: वरील आर्टीकलचा उद्देश हा माहिती देणे हा आहे. यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे