Gadge Maharaj Death Anniversary : स्वच्छतेची कास धरणारे थोर समाजसुधारक गाडगे महाराज यांना अभिवादन
गाडगे महाराज (संग्रहित - संपादित प्रतिमा)

Gadge Maharaj Death Anniversary : संत मालिकेचा पाया ज्ञानेश्वरांनी घातला. नामदेवांनी त्याचा भारतभर विस्तार केला. नाथांनी त्यावर इमारत बांधली व तुकाराम महाराजांनी त्यावर कळस चढविला. उरलेले कार्य गाडगेबाबांनी सिध्दीस नेले. म्हणूनच संत गाडगेबाबा (Gadge Maharaj) हे संत मालिकेतील ‘शिरोमणी‘ म्हणून ओळखले जातात. अशा या थोर कीर्तनकार, संत, समाजसुधारक आणि स्वच्छतेच्या पूजाऱ्याची आज (20 डिसेंबर) 62 वी पुण्यतिथी. विसाव्या शतकातील समाजसुधार आंदोलनांमध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे, त्यापैकी एक महत्त्वाचे नाव गाडगे बाबा यांचे आहे. आज त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यभरात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले गेले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील ट्विटरच्या माध्यमातून गाडगे महाराज यांना अभिवादन केले आहे.

महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात शेगाव गावात झिंगराजी व सखुबाई यांच्या पोटी 13 फेब्रूवारी 1876 रोजी गाडगे महाराज यांचा जन्म झाला. त्यांचे लहानपणीचे नाव डेबूजी असे होते. त्यांचे पालनपोषण त्यांच्या मामांकडे झाले. सर्वसाधारण कुटुंबातील मुलांप्रमाणेच त्यांचे जीवन व्यतीत होत होते. कालांतराने त्यांचे लग्न झाले, कन्यारत्न प्राप्त झाले. मात्र त्यांचे मन संसारात रमेना. एका आज्ञात विभूतीच्या हाकेला ओ देऊन आपला सुखाचा संसार सोडून 1 फेब्रूवारी 1905 रोजी पहाटे 3 वाजता जगाचा संसार सुखी करण्यासाठी डेबूजी घराबाहेर पडले.

लोकजीवन तेजाने उजळण्यासाठी हाती असलेल्या खराट्याने गावाचे रस्ते झाडीत ते महाराष्ट्रात सर्वत्र फिरले. विवेकाच्या खराट्याने गावोगावी फिरून त्यांनी लोकांची मने स्वच्छ केली. खेडोपाडी, शहरोशहरी जाऊन कीर्तने केली. शिक्षणाचे महत्व गाडगे महाराजांनी लोकांना पटवून दिले. साक्षरतेचा प्रचार केला. गाडगे महाराज म्हणजे लोकजागृती साधणारे एक फिरते विद्यापीठ होते. गाडगे महाराज जास्त शिकलेले नव्हते; परंतु संतांचे अभंग त्यांना तोंडपाठ होते. ‘गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला’ असा गजर केल्यानंतर लगेच हरिपाठ म्हणत. गाडगे महाराजांचे कीर्तन असले म्हणजे ते ऐकण्यासाठी लोक लांबलांबून येत. गाडगे महाराजांनी पंढरपूर, देहू, आळंदी, नाशिक, मुंबई येथे धर्मशाळा बांधल्या. जनकल्याणाची अनेक कामे त्यांनी यशस्वीरित्या राबविली. आपले जीवन त्यांनी विरागी व धर्मशील वृत्तीने व्यतीत केले.

गाडगे महाराजांचे चिंध्याची गोधडी हे महावस्त्र होते. ते तुटक्या पादत्राणांचे विजोड जोडपायी वापरत. डोईवर फुटके मडके असे. भोजनाच्या वेळी थाळी म्हणून आणि भोजनानंतर शिरस्त्राणे म्हणून त्याचा वापर होत असे. त्यांनी कशाचा संग्रह केला नाही, कशाची हाव बाळगली नाही. बाबांनी धर्मशाळा, घाट, अन्नछत्रे आणि सदावर्त बांधली. फिरते दवाखाने सुरु केले. बाबा स्वतः निरक्षर होते पण समाजसुधारक आणि शिक्षण प्रसारक होते. ‘सद्‍गुरु गाडगे महाराज कॉलेज’ काढून कर्मवीर भाऊराव पाटील यांनी त्यांच्या ऋणविमोचनाचा अल्पसा प्रयत्न केला.

अज्ञान, अंधश्रद्धा आणि अच्छतेच्‍या नायनाटासाठी जीवन खर्ची घातलेले अनाथ, अपंगांचे सेवेकरी थोर संत गाडगेबाबा यांनी 20 डिसेंबर 1956 मध्‍ये वलगाव (अमरावती) येथे आपला देह ठेवला.