कधी कधी कामाच्या नादात सहज आपल्याकडून एका वेळेचं जेवण मिस होऊन जातं आणि आश्चर्य असं की ही बाब आपल्या लक्षातही येत नाही, पण असाच एखाद्या दिवशी उपवास करायचं ठरवल्यास सकाळी उठल्यापासून भूक लागायला सुरुवात होते. वास्तविकता, उपवासाच्या दिवशी पूर्णतः उपाशी राहण्याची सक्ती नसतेच, त्यामुळे एका वेळेस फलाहार घेण्यात किंवा उपवासाला चालणाऱ्या पदार्थांचे सेवन करण्यात काहीच हरकत नाही. येत्या काही दिवसात तर श्रावण महिना मग गणपती, त्यापाठोपाठ नवरात्री असा उपवासाचा सीझनच सुरु होणार आहे, त्यामुळे आतापासूनच आपण उपवासात खायच्या गोष्टींचं प्लॅनिंग करणं महत्वाचं आहे.
उपवासाचे पदार्थ म्हणताच सर्वात आधी सर्वांच्या डोळ्यासमोर येणारा पदार्थ म्हणजे साबुदाणा, या साबुदाण्याचे वेफर्स, खिचडी, वडे असे हजार प्रकार जरी करून पहिले तरी बऱ्याचदा खाण्यात कंटाळा येतो, शिवाय इतर काही बनवायचे झाल्यास त्यात वेळ आणि मेहनत अधिक लागत असल्याने अनेकदा आपण स्वतःच आळस करतो. पण काळजी करू नका यंदा आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय काही उपवास स्पेशल झटपट रेसिपीज..या रेसिपीज ट्राय करून तुम्ही न थकता कमी वेळात या उपवास सीझनला चविष्ट बनवू शकाल.. चला तर मग पाहुयात या रेसिपी आणि त्यांची सोप्पी कृती..
चमचमीत फराळी मिसळ
साहित्य : 1 वाटी साबुदाणा खिचडी , 1 वाटी उपवासाची बटाटा भाजी ,अर्धा वाटी बटाट्याचा तळलेला किस, रताळ्याचे छोटे तुकडे, अर्धी वाटी खोवलेला नारळ, शेंगदाण्याचे कूट, 2-3 हिरव्या मिरच्या, जिरं, मीठ, दही, कोथिंबीर, तूप (भाजी व खिचडीसाठी)
कृती:
साबुदाणा खिचडीसाठी: साबुदाणा धुवून पाणी काढून 5-6 तास बाजूला करून ठेवावा. आवश्यक असल्यास थोडेसे पाणी घालून भिजू ठेवावा. शेंगदाणे भाजून थंड करावे. शेंगदाण्याची साल काढून मिरची सोबत वाटून कूट तयार करावे. एका भांडयात साबुदाणा घेऊन त्यात वाटलेले शेंगदाणे,मिठ एकत्र करून घ्यावे. तूप गरम करून त्यात जिरे घालावे. बटाटयाच्या काचऱ्या घालून परतावे व नंतर छान शिजू द्यावे . साबुदाणा शिजला की लिंबाचा रस, साखर व कोथिंबीर घालावी.
उपवासाची बटाटा भाजी: प्रथम एका भांडयात तेल गरम करून त्यात जीरे, कढीपत्ता व बारिक चिरलेली हिरवी मिरची घालावी.शेंगदाण्याचे कूट घालून 5 मिनिटे परतावे.उकडून घेतलेले बटाटे सोलून त्यांच्या बारिक फोडी करून त्या वरच्या फोडणीवर घालून चांगले परतून घ्यावे. मीठ घालून परतावे झाकण ठेवून 5 मिनिटे मंद ग्यासवर भाजी होवू दयावी.
शेंगदाण्याची आमटी: शेंगदाणे भाजून सालं काढून घ्यावीत, त्यात हिरवी, खोबर, कोथिंबीर व मिरची घालून पेस्ट करून घ्यावी. एका भांडयात थोडेसे तूप गरम करून त्यात जीरे घालावे व त्यावर शेंगदाण्याची पेस्ट घालून चमच्याने ढवळून घ्यावे. मीठ व पाणी घालून शेंगदाण्याची आमटी करून घ्यावी.
मिसळ एकत्र करताना प्रथम एका बाउल मध्ये साबुदाणा खिचडी घ्यावी त्यावर बटाटा भाजी, शेंगदाणा आमटी, बटाटा चिवडा घालावा आवडत असल्यास दही घालावे व बारिक चिरलेली कोथींबिर घालून सर्व्ह करावे.
शिंगाड्याच्या पिठाच्या पुऱ्या
साहित्य: शिंगाड्याचे पीठ, उकडलेले 2 ते 3 बटाटे , 1/4 टेबलस्पून काळीमिरी पूड, कोथिंबीर, तेल आणि सैंधव मीठ (काळं मीठ)
कृती: शिंगाड्याचे पीठ चाळून घ्यावे, त्यानंतर उकडलेले बटाटे कुस्करून पीठासोबत एकत्रित करवून घ्यावे यामध्ये चवीनुसार सैंधव मीठ, काळीमिरीपूड आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पीठ मळून घ्यावे. पुऱ्या कुरकुरीत होण्यासाठी नेहमीपेक्षा थोडं घट्ट पीठ मळावे आणि त्यानंतर 25 मिनिटे हे पीठ बाजूला ठेवून द्यावे. तो पर्यंत तेल तापण्यास ठेवावे. थोड्यावेळाने या पिठाचे छोटे गोळे बनवून हाताच्या तळव्याने हलकासा दाब देऊन पातळ करावेत, व गरम तापत्या तेलात सोडाव्यात. या पुऱ्या दोन्ही बाजून शेकवून पूर्णतः शिजल्याचा अंदाज घेत मगच कढईतून बाहेर काढावे. त्यानंतर शेंगदाण्याची चटणी किंवा दह्यासोबत या पुऱ्या सर्व्ह कराव्यात.
रताळ्याची कचोरी
साहित्य: 250 ग्रॅम रताळी, 1 मोठा बटाटा, 1 वाटी किसलेलं खोबरं, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 50 ग्रॅम शेंगदाणे, चिरलेली कोथिंबीर, मीठ, साखर.
कृती: सर्वप्रथम रताळे आणि बटाटे उकडून घ्यावे. त्यानंतर उकडलेल्या रताळे आणि बटाट्यांची सालं काढून हाताने कुस्करावे, आणि त्यात चवीनुसार मीठ टाकावे. यानंतर सारण बनवण्यासाठी 1 ते 2 चमचा तुपात मिरच्यांचे तुकडे, खोबरे परतून घ्यावेत. आपल्या आवडीनुसार, काजू बदाम, बेदाणे घालून सारण तयार करावे. थंड झालेल्या रतळ्यांच्या मिश्रणाची पारी करून त्यात थोडे सारण घालून कचोऱ्या कराव्यात. नंतर तांदळाच्या पिठात घोळवून तुपात तळाव्यात.थंडगार दही किंवा चटणीसोबत ही कचोरी सर्व्ह करावी.
उपवासाची चटणी
साहित्य: कोथिंबीर, पुदीना, अर्धी वाटी खवलेला नारळ, अर्धी वाटी दही, 8 ते 9 काजूचे तुकडे, दोन टेबलस्पून मध, 2 टेबल्स्पून लिंबाचा रस, हरी धनिया, भाजलेले जिरे, व स्वादानुसार हिरवी मिरची आणि सैंधव मीठ.
कृती: कोथिंबीर पुदिना, मिरची नीट धुवून, निवडून लगेचच मिक्सर मध्ये वाटून घ्या, या मध्ये काजूचे तुकडे, खवलेला नारळ, भाजलेलं जिरे, टाकून पुन्हा एकदा वाटून घ्या, यावेळेस मिक्सर अगदी कमी वेळेसाठी सुरु करा ज्यामुळे काजूचा कुरकुरीत पण टिकून राहील. यानंतर या चटणीत दही, लिंबूचा रस, मध अंडी मीठ घालून एकदा नीट मिक्स करा, गई आवश्यक असल्यास एकदा मिक्सर मध्ये फिरवून घ्या. ही चटणी उपवासाच्या पदार्थांची लज्जत वाढवते.
बटाटे वडे
साहित्य : 1 किलो उकडलेले बटाटे, राजगिरा पीठ, शिंगाड्याचे पीठ, साबूदाणा पीठ, खवलेला ओला नारळ, आले- हिरवी मिरची पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर, दाण्याचे कूट, लिंबाचा रस, साखर, मीठ.
कृती: सर्वप्रथम हिरव्या मिरच्या, आले व थोडेसे जीरे घालून वाटून घ्या. बटाटे गरम असतानाच सोलून घ्या व बारीक करा, थंड झाल्यावर त्यात मिरचीचा ठेचा चवीप्रमाणे मीठ व एक चमचा साखर घाला वर लिंबाचा रस टाका व सर्व मिश्रण हाताने एकजीव करा . हे मिश्रण हातात घेऊन हलक्या दाबाने थोडे पाणी लावून चपटे वडे बनवा. बॅटर साठी सर्व पीठे एकत्र करुन त्यात पाणी घालून जाडसर मिश्रण बनवा, व दुसरीकडे कढईत तेल तापण्यास ठेवा. नंतर तापलेल्या तेलात वडे पिठात घोळवून तळून काढा व गरमागरम वडे खोबर्याच्या चटणी सोबत सर्व्ह करा.
भारताच्या विविधांगी संस्कृतीनुसार विविध ठिकाणी उपवासात वर्ज्य गोष्टींमध्ये फरक आहे, त्यानुसार आपण काही साहित्यात फेरबदल करू शकतो. पण या उपवासाच्या विविध पदार्थानी तुमचा यंदाचा सण उत्सवाचा सीझन लज्जतदार होईल हे नक्कीच!