हापूस आंबा कसा ओळखला? नैसर्गिकरित्या पिकलेले आणि कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्यातील नेमका फरक काय? आंबे विकत घेताना पारखून पाहा 'या' गोष्टी
Alphonso Mango (Photo Credits: Facebook)

फळांचा राजा आंबा आवडत नसलेली व्यक्ती दुर्मिळच असेल. सध्या आंब्याचा मौसम सुरु झाला आहे. त्यामुळे आंबा खाण्याचा आनंद आपल्या पैकी अनेकजण नक्कीच घेत असतील. आंबा, आमरस, आंब्याचे विविध पदार्थांचा आस्वाद घेणे म्हणजे केवळ सुख. आंबा खाणे सोपे आहे. मात्र तो निवडता विशेष खबरदारी घ्यावी लागते. आंब्याचे विविध प्रकार आहेत- हापूस, केशर, दशेरी, तोतापूरी, मालगोवा, चौसा, वनराज इत्यादी. यात हापूस आंब्याला देशातच नाही तर जगभरात मोठी मागणी असते. हापूस आंब्याच्या चवीने त्याला विशेष महत्त्व प्रदान केले आहे. पण हा हापूस आंबा नेमका ओळखायचा कसा?  हापूस आंब्याच्या निवडीसाठी काही खास टिप्स: (आंबा खाताना 'या' गोष्टींच्या घ्या काळजी अन्यथा शरीरावर होतील दुष्परिणाम)

# हापूस आंब्याला अतिशय गोड वास असतो. काही अंतरावरुनही तो वास तुम्ही घेऊ शकता.

# हापूस आंब्याची साल लालसर पिवळी असते. केमिकल्सद्वारे पिकवलेले आंबे अधिक पिवळसर असून संपूर्ण आंबा एकाच रंगाचा असतो. पण हापूस आंब्यावर लालसर रंग पाहायला मिळतो.

# हापूस आंब्याचे वेगळेपण त्याच्या आकारात देखील असते. हापूस आंबा अंडाकृती असून शेवटी छानसे टोक असते. तसंच आंब्याचा खालचा भाग खूपच बारीक असेल तर तो हापूस नाही हे ओळखावे.

# हापूस आंब्याची साल पातळ असून शक्यतो त्यावर डाग नसतात. नैसर्गिकरित्या पिकलेल्या आंब्याचा स्पर्श कोमल असतो. तर कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे जाडसर सालीचे असतात.

# शक्य असल्यास आंबा खरेदी करण्यापूर्वी चाखून पाहा. हापूस आंब्याच्या चवीमुळे तो अधिक लोकप्रिय आहे. हापूस आंब्याची चव अतिशय मधूर असते. इतर कोणत्याही आंब्यांना हापूस आंब्याच्या चवीची तोड नाही.

कोकणातील हापूस आंब्याला जगभरात मागणी आहे. मात्र यंदा कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे बऱ्याचशा बाजारपेठा बंद आहेत. वाहतूक सुरळीत नसल्याने आंबा मोठ्या प्रमाणावर बाजारात येऊ शकला नाही. याचा फटका आंबे व्यापाऱ्यांना नक्कीच बसला आहे. हापूस आंबा हा महाराष्ट्रातील रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यातून बाजारापेठांमध्ये येतो. मात्र 'देवगड हापूस' म्हणून हापूस आंबा प्रचलित आहे.