World Students' Day 2020 (Photo Credits: File Image)

15 ऑक्टोबर रोजी भारताचे माजी राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन डॉ. एपीजे अब्दुल कलाम (Dr A.P.J. Abdul Kalam) यांची जयंती असते. त्या निमित्ताने वर्ल्ड स्टूडेंट्स डे (World Student's Dayसाजरा केला जातो. 2010 पासून संयुक्त राष्ट्राने (United Nations) डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या 79 व्या जन्मदिवस जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. 15 ऑक्टोबर 1931 मध्ये तामिळनाडू (Tamil Nadu) येथील रामेश्वर  (Rameswaram) येथे अब्दुल कलाम यांचा जन्म झाला. तर 27 जुलै 2015 मध्ये आसाम मधील शिलॉंग येथे एका कार्यक्रमादरम्यान त्यांचे निधन झाले.

अब्दुल कलाम यांचे जीवन अतिशय संघर्षमय होते. अनेक कठीण परिस्थितीचा सामना करुन त्यांनी राष्ट्रपती पदापर्यंत मजल मारली होती. घरच्या बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना घरोघरी जावून वर्तमानपत्रं विकत असतं. त्यांचा विद्यार्थी दशेतील संघर्ष येणाऱ्या अनेक पीढ्यांसाठी प्रेरणादायी आहे.

जागतिक विद्यार्थी दिन 2020 थीम:

Learning for people, planet, prosperity and peace या थीमवर यंदाचा जागतिक विद्यार्थी दिन साजरा केला जाणार आहे. या थीममध्ये मानवतावादी उद्देशांसोबत विकासासाठी महत्त्वाकांक्षा उत्तेजित करणाऱ्यावर भर दिला आहे.

जागतिक विद्यार्थी दिवसाचे महत्त्व:

विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. त्यांच्या प्रगतीवर देशाच्या विकासाचे भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे त्यांना समर्पित असा एक दिवस असायला हवा. म्हणूनच अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त विद्यार्थी दिवस साजरा करण्यात येतो. विद्यार्थ्यांना महत्त्व देणे आणि त्यांचे समाजातील महत्त्व जाणणे हे या दिवसाचे उद्दिष्ट आहे. या दिवशी डॉ. एपीजे अब्दुल कलाम आणि त्यांच्या जीवनातील प्रेरणादायी कथा विद्यार्थ्यांना सांगून प्रेरित केले जाते. कलाम यांच्या आयुष्यातील बरेच काही शिकण्यासारखे आहे. त्यामुळेच या दिवसानिमित्त ते शिकण्याची संधी विद्यार्थ्यांनी दवडू नये.

जीवनात कितीही आव्हाने येऊ दे. पण योग्य शिक्षकाद्वारे सर्व बंधने दूर करुन लक्ष्य गाठता येते, ही शिकवण अब्दुल कलाम यांच्या जीवनातून मिळते आणि विद्यार्थी दशेत ही प्रेरणा मिळणे आवश्यक आहे.