World Hindi Day 2021: 10 जानेवारी हा दिवस जगभरातील हिंदी साधकांसाठी खूप खास दिवस आहे. कारण या दिवशी 'जागतिक हिंदी दिन' साजरा केला जातो. जगभरात हिंदी भाषेचा प्रचार-प्रसार करणे हे या दिवसामागचे महत्त्वाचे उद्दीष्ट आहे. जगात हिंदीला चालना देण्यासाठी आणि हिंदी भाषेसंदर्भात जागरूकता निर्माण करण्यासाठी व हिंदीला आंतरराष्ट्रीय भाषा म्हणून ओळख निर्माण करू देण्यासाठी दरवर्षी 10 जानेवारी या दिवशी जागतिक हिंदी दिवस साजरा केला जातो. परदेशातील भारतीय राजदूत हा दिवस विशेषरित्या साजरा करतात. या दिवशी सर्व सरकारी कार्यालयांमध्ये विविध विषयांवर हिंदीमधील व्याख्याने आयोजित केली जातात. जगात हिंदीचा विकास व प्रसार व्हावा म्हणून जागतिक हिंदी परिषदेची सुरुवात झाली. नागपूर येथे 10 जानेवारी 1975 रोजी प्रथम जागतिक हिंदी परिषद झाली, म्हणून हा दिवस 'जागतिक हिंदी दिन' म्हणून साजरा केला जातो.
तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 10 जानेवारीला जागतिक हिंदी दिन म्हणून साजरे करण्याची घोषणा केली. तेव्हापासून या दिवशी जागतिक हिंदी दिन साजरा केला जातो. हिंदी दिन आणि जागतिक हिंदी दिन यांच्यात फरक आहे. देशात 14 सप्टेंबर रोजी 'हिंदी दिन' साजरा केला जातो. त्याचबरोबर 10 जानेवारी रोजी 'जागतिक हिंदी दिन' साजरा केला जातो. (वाचा - Hindi Diwas 2019: भारतामध्ये हिंदी दिवस 14 सप्टेंबर दिवशी का साजरा केला जातो? या दिवसाच्या सेलिब्रेशन बाबत '8' इंटरेस्टिंग गोष्टी)
जागतिक हिंदी दिनाशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी -
-
जगभरात हिंदी चा प्रचार-प्रसार करण्यासाठी नागपुरात पहिली जागतिक हिंदी परिषद आयोजित करण्यात आली होती. म्हणून हा दिवस जागतिक हिंदी दिन म्हणून साजरा केला जातो. या परिषदेत 30 देशांतील 122 प्रतिनिधी उपस्थित होते. 2006 सालापासून दरवर्षी 10 जानेवारी रोजी जागतिक हिंदी दिन साजरा केला जातो.
- माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी 10 जानेवारी 2006 रोजी दरवर्षी जागतिक हिंदी दिन साजरा करण्याची घोषणा केली.
- जागतिक हिंदी दिनानिमित्त परदेशातील भारतीय दूतावासाद्वारे विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात. या दिवशी सर्व सरकारी कार्यालयांमध्ये विविध विषयांवर हिंदीमध्ये कार्यक्रम आयोजित केले जातात.
- भारतीय दूतावासाने नॉर्वे येथे पहिला जागतिक हिंदी दिन साजरा केला. यानंतर, भारतीय नॉर्वे माहिती व सांस्कृतिक मंच यांच्या संयुक्त विद्यमाने लेखक सुरेशचंद्र शुक्ला यांच्या अध्यक्षतेखाली दुसरा आणि तिसरा जागतिक हिंदी दिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.
- 'जागतिक हिंदी दिन' वगळता दरवर्षी 14 सप्टेंबरला हिंदी दिवसा साजरा केला जातो. 14 सप्टेंबर 1949 रोजी संविधान सभेने हिंदीला राजभाषेचा दर्जा दिला, तेव्हापासून 14 सप्टेंबर रोजी हिंदी दिन साजरा केला जातो.
- जगातील शेकडो विद्यापीठांमध्ये हिंदी भाषा शिकविली जाते. जगभरात कोट्यावधी लोक हिंदी बोलतात. एवढेचं नव्हे तर हिंदी ही जगभरात सर्वाधिक बोली जाणारी भाषा आहे.
- दक्षिण प्रशांत महासागरातील मेलानेशियामध्ये फिजी नावाचे एक बेट आहे. फिजीमध्ये हिंदीला अधिकृत भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. त्याला फिजीयन हिंदी किंवा फिजीयन हिंदुस्तानी असेही म्हणतात. ही भाषा भोजपुरी आणि अन्य बोलीभाषांचा संमिश्र प्रकार आहे.
- पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश, यूएसए, यूके, जर्मनी, न्यूझीलंड, युएई, युगांडा, गयाना, सुरिनाम, त्रिनिदाद, मॉरिशस आणि दक्षिण आफ्रिका यासह अनेक देशांमध्ये हिंदी बोलली जाते.
- 2017 मध्ये ऑक्सफोर्ड शब्दकोषात प्रथमच 'अच्छा', 'बड़ा दिन', 'बच्चा' आणि 'सूर्य नमस्कार या हिंदी शब्दांचा समावेश केला गेला. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या गणनेनुसार, हिंदी ही जगातील दहा शक्तिशाली भाषांपैकी एक आहे.