म्हैसूर दसरा (Mysore Dussehra) हा कर्नाटकातील नाडाहब्बा (राज्यातील महत्वाचा सण) आहे. हा 10 दिवसांचा उत्सव आहे, जो नवरात्रीच्या नऊ रात्रींपासून सुरू होतो आणि विजयादशमीपर्यंत चालतो. नवरात्री, दसरा, आणि विजयादशमीचा हिंदू सण वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करतो. आज या उत्सवाला मोठे सामाजिक महत्व आले आहे. एकेकाळी देशभरातील अनेक संस्थानांमध्ये मोठ्या धुमधडाक्यात हा उत्सव साजरा होत असे. आता ही परंपरा अगदी काही संस्थानांमध्ये सुरु आहे. त्यातीलच एक म्हणजे म्हैसूरचा शाही दसरा.
महिषासुर राक्षसाच्या वधावरून या शहराचे नाव म्हैसुरू असे पडले. म्हैसुरू शहराला दसरा सण भव्यतेने साजरा करण्याची प्रदीर्घ परंपरा आहे. म्हैसुरू येथील दसरा उत्सवाने 2019 मध्ये 409 वा वर्धापन दिन पूर्ण केला. पुरावे सूचित करतात की 15 व्या शतकात विजयनगर साम्राज्याच्या राजांनी कर्नाटक राज्यात हा उत्सव साजरा केला होता. विजयनगरातून दख्खन सल्तनत गेल्यानंतर हा सण मुस्लिम शासकांच्या अधिपत्याखाली आला. मात्र त्यानंतरही महानवमी (दसरा) उत्सव चालू ठेवला गेला. (हेही वाचा: विजयादशमी निमित्त खास मराठी Messages, Greetings, HD Images शेअर करून द्या शुभेच्छा; द्विगुणीत करा दसऱ्याचा आनंद)
MUST WATCH!
The world famous Mysore #Dussehra -
Jumbo Sawari, this evening from 4:30 pm LIVE on https://t.co/OFUmYgGtxS #MysoreDussehra #JumboSawari pic.twitter.com/dTsKrCQ9JE
— Doordarshan National दूरदर्शन नेशनल (@DDNational) October 15, 2021
अनेक इतिहासकारांनी या म्हैसूर दसऱ्याचा उल्लेख विजयनगरचा सर्वात महत्वाचा धार्मिक सण म्हणून केला आहे. त्या काळात महोत्सवासोबत अनेक विशेष कार्यक्रम देखील आयोजित केले गेले जात असत, ज्यात गायन, परेड, मिरवणूक इत्यादींचा समावेश होता. या उत्सवामध्ये चामुंडेश्वरी देवी हत्तीच्या सोन्याच्या अंबरीमध्ये स्वार होऊन म्हैसूर शहराच्या दर्शनासाठी निघते. या महोत्सवात सामील होण्यासाठी लाखो पर्यटक म्हैसूर येथे जमतात. दरम्यान कोरोनामुळे सध्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जमण्यास परवानगी नाही, मात्र तुम्ही ऑनलाईन या उत्सवाचा आनंद घेऊ शकता. दूरदर्शनवर सायंकाळी 4.30 वाजल्यापासून या उत्सवाचे थेट प्रक्षेपण होणार आहे.
दरम्यान, या उत्सवादिवशी म्हैसूर पॅलेसचे सौंदर्य पाहण्यासारखे असते. संपूर्ण राजवाडा एखाद्या वधूसारखा सजवला जातो. महालाच्या भिंती, छत आणि आजूबाजूचा परिसर आधुनिक रंगीबेरंगी दिव्यांनी उजळलेला असतो. मिळालेल्या माहितीनुसार, दसऱ्याच्या विशेष प्रसंगी, राजवाडा प्रकाशित करण्यासाठी 100,000 दिवे वापरले जातात.