Buddha Purnima 2022: वैशाख महिन्यातील पौर्णिमा ही बुद्ध पौर्णिमा (Buddha Purnima) म्हणून साजरी केली जाते. यावर्षी 16 मे रोजी बुद्ध पौर्णिमा आहे. या दिवशी बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांचा जन्म झाला आणि याच दिवशी त्यांना बोधगया येथे ज्ञानप्राप्ती झाली, असे म्हटले जाते. भगवान बुद्धांचे बालपणीचे नाव सिद्धार्थ गौतम होते. ते राजा शुद्धोदनाचा पुत्र होते. एकदा सिद्धार्थने असे दृश्य पाहिले, त्यानंतर तो आपली पत्नी, मूल, राजेशाही, संपत्ती आणि सर्व काही सोडून संन्यासी झाला. यानंतर सिद्धार्थाने घोर तपश्चर्या करून आत्मज्ञान प्राप्त केले आणि ते महात्मा बुद्ध झाले. त्यानंतर त्यांनी सगळ्या जगाला जगायला शिकवलं. सिद्धार्थने असे काय पाहिले की, तो संसार सोडून बुद्ध झाला? यासंदर्भात तुम्हालाही जाणून घ्यायचे असेल तर याची संपूर्ण कथा आम्ही तुम्हाला सांगितली आहे.
सिद्धार्थचा जन्म लुंबिनी (सध्याचे नेपाळ) येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव राजा शुद्धोदन आणि आईचे नाव माया होते. सिद्धार्थच्या जन्मानंतरचं त्याची आई वारली. असे म्हणतात की, एका तपस्वीने शुद्धोदनाला सांगितले होते की सिद्धार्थ मोठा होऊन सर्व जगाचे कल्याण करेल. हे पाहून शुद्धोदनाला काळजी वाटू लागली. त्यांना वाटले की सिद्धार्थ संन्याशाच्या मार्गाने गेला तर त्याचे राज्य कोण सांभाळणार. त्यामुळे शुध्दोधनाने सिद्धार्थाचे चांगले संगोपन केले. त्याला कसलीही वेदना जाणवू दिली नाही. त्याला सर्व प्रकारच्या सुविधा देण्यात आल्या. त्यांनी सिद्धार्थाला अनेक विषयांपासूनही लपवून ठेवले. मोठे होईपर्यंत सिद्धार्थला सांसारिक दु:खांची जाणीव नव्हती. (हेही वाचा - Buddha Purnima 2022 Date: गौतम बुद्धांच्या जयंतीची तारीख, तिथी आणि बुद्ध पौर्णिमेचे महत्त्व जाणून घ्या)
वयाच्या सोळाव्या वर्षी सिद्धार्थचा विवाह यशोधराशी झाला. राजा शुद्धोधनाने सिद्धार्थला अनेक आलिशान राजवाडे भेट दिले. त्यांच्या वाड्यांमध्ये हजारो नोकर-दासी काम करत. त्यांच्याकडे उपभोग व चैनीच्या सर्व सोयी होत्या. पुढे सिद्धार्थची पत्नी यशोधरा हिने एका मुलाला जन्म दिला. काही दिवसांनी सिद्धार्थ आपल्या रथात फिरायला गेला. त्याआधी तो कधीच एकटा बाहेर फिरायला गेला नव्हता. जेव्हा सिद्धार्थचा रथ बाजारातून बाहेर पडला तेव्हा सिद्धार्थला एक वृद्ध व्यक्ती दिसली. त्याची कंबर पूर्णपणे वाकलेली होती. चेहऱ्यावर सुरकुत्या होत्या आणि मोठ्या कष्टाने तो उभा राहू शकला. हे पाहून सिद्धार्थचे मन अस्वस्थ झाले. त्याने आपल्या सारथीला विचारले की, तो माणूस असा का आहे? तेव्हा सारथीने सांगितले की तो वृद्ध झाला आहे. त्यामुळे त्याचे शरीर आता त्याला साथ देत नाही. म्हातारपण हे जीवनाचे कटू वास्तव आहे. आपणही एक दिवस म्हातारे होऊ.
रथ थोडा पुढे सरकला तेव्हा सिद्धार्थला एक आजारी व्यक्ती दिसली. त्याला श्वास घेण्यासही त्रास होत होता. तो जीवन आणि मृत्यू यांच्यात संघर्ष करत होता. सारथीने सिद्धार्थला सांगितले की, आपले शरीर नश्वर आहे. काही काळानंतर ते सहकार्य करत नाही आणि माणूस आजारी पडू लागतो, त्यानंतर माणसाचा मृत्यू होतो.
पुढे गेल्यावर सिद्धार्थला एक अंत्ययात्रा दिसली. एका मृतदेहाला चार जण खांदा देत होते. त्यांच्या मागून काही माणसं चालत होती, जे ओरडत होते. सारथीने सिद्धार्थला सांगितले की, मृत्यू हे आपल्या जीवनातील आणखी एक कटू सत्य आहे. माणसाचा मृत्यू निश्चित आहे. हे सर्व दृश्य पाहून सिद्धार्थच्या मनात खळबळ माजली. जीवनाचे हे पैलू त्याला यापूर्वी कधीच जाणवले नव्हते. त्याच्या मनात वेगवेगळे विचार येऊ लागले.
सिद्धार्थाचा रथ थोडा पुढे सरकला तेव्हा एक संन्यासी तिथून जात होता. सिद्धार्थची नजर त्या साधूवर पडली. साधूच्या चेहऱ्यावर वेगळाच प्रकाश होता. त्याच्या चेहऱ्यावर हसू होते. जणू त्याला आयुष्यात कोणत्याही प्रकारच्या दुःखाची भीती नव्हती. सिद्धार्थला त्याचं उत्तर मिळालं. त्यानंतर त्याने संन्यासी होण्याचे ठरवले.
सिद्धार्थ आपल्या महालात गेला आणि रात्रीच्या पहाटे पत्नी आणि मुलासह सर्व प्रकारची आसक्ती, राजेशाही, भोग आणि विलास सोडला. त्यावेळी सिद्धार्थ अवघा 27 वर्षांचा होता. ते अनेक ठिकाणी फिरले. मग घोर तपश्चर्या केली. वयाच्या 35 व्या वर्षी त्यांनी बोधगया (सध्याचे बिहार) येथील बोधीवृक्षाखाली परम ज्ञान प्राप्त केले. अशा प्रकारे ते सिद्धार्थ गौतमापासून महात्मा बुद्ध झाले. वाराणसीजवळ सारनाथ नावाच्या ठिकाणी त्यांनी पहिला उपदेश केला.