भगवान विष्णु (PC - File Image)

Vaikuntha Chaturdashi 2019: त्रिपुरारी पौर्णिमेचा आधिचा दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी. ही चतुर्दशी 'वैकुंठ चतुर्दशी' (Vaikuntha Chaturdashi 2019) म्हणून साजरी केली जाते. चातुर्मासामध्ये विष्णू शेषावर झोपत असल्याने त्या काळात विश्वाचा कारभार शंकराकडे असतो, असे म्हणतात.वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी शंकर विष्णूकडे येऊन त्याला कारभार सोपवतात व स्वतः कैलास पर्वतावर तपस्येसाठी जातात. या दिवशी 'हरिहर भेट' म्हणजे विष्णू आणि शंकराची भेट होते, असं मानलं जातं. या दिवशी चतुर्मासाची सांगता होते. या दिवशी रात्री शंकराची 1008 नावे घेऊन आणि विष्णूची सहस्र नावे घेऊन बेल आणि तुळस वाहून पूजा केली जाते. विविध मंदिरांमध्ये तसेच अनेक कुटुंबांमध्येही ही पूजा केली जाते. महाराष्ट्राबरोबरच उज्जैन, वाराणसी या शहरांमधील मंदिरांतसुद्धा 'हरिहर' पूजा केली जाते. चित्रकार राजा रविवर्मा यांनी काढलेले हरिहर भेटीचे चित्र प्रसिद्ध आहे. यंदा ही चतुर्दशी 10 नोव्हेंबरला साजरी केली जात आहे. ही पुजा मध्यरात्री केली जाते.

हेही वाचा - Kartiki Ekadashi 2019 Marathi Abhang: कार्तिकी एकादशी निमित्त ऐका विठूरायाचे 'हे' खास मराठी अभंग

वैकुंठ चतुर्दशीचा मुहूर्त -

10 नोव्हेंबर 2019, वार रविवार

चतुर्दशी प्रारंभ – 10 नोव्हेंबर 2019 ला दुपारी 04:33 पासून

चतुर्दशी समाप्ती – 11 नोव्हेंबर 2019 सायंकाळी 06:02 वाजेपर्यंत

वैकुंठ चतुर्दशी महत्त्व -

पौराणिक कथेनुसार, एकदा भगवान विष्णु यांनी काशी येथे महादेवाला एक हजार कमळ वाहण्याचा संकल्प केला होता. यावेळी महादेवाने विष्णुची परिक्षा घेण्यासाठी या कमळातून एक कमळ कमी केले. यावर भगवान विष्णु यांनी आपले कमळासारखे डोळे अर्पण करण्याचा निर्धार केला. विष्णुची ही भक्ती पाहून महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी विष्णुला वर दिला की, कार्तिक मासनंतर येणारी चतुर्दशी 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून ओळखली जाईल. जो कोणी हे व्रत करील त्याला वैकुंठ प्राप्ती होईल. या दिवशी महाभारत युध्दात ज्यांचा मृत्यू झाला होता. त्यांचे कृष्णाने श्राद्ध घातले होते. त्यामुळे या दिवशी श्राद्ध घालण्याचीही परंपरा आहे.

हेही वाचा - Tulsi Vivah 2019 Rangoli Designs: तुळशी आणि शाळीग्रामच्या विवाहानिमित्त काढा 'या' आकर्षक रांगोळ्या

या दिवशी भगवान विष्णुची पुजा केली जाते. विष्णुला चंदन, फुलं, दुध, दही या सर्वांनी अंघोळ घातली जाते आणि भगवान विष्णुचा अभिषेक केला जातो. या दिवशी विष्णु नामस्मरण केलं जातं. विष्णुला गोड नैवद्य दाखवला जातो आणि त्यानंतर उपवास सोडला जातो.