Tulsi Vivah 2020 Date and Shubh Muhurat: यंदा तुळशी विवाह कधी आणि कसा कराल? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्त्व
Tulsi Vivah (Photo Credits: Facebook/Durga Online)

Tulsi Vivah significance: भाऊबीज, पाडव्याने यंदाच्या दिवाळीची सांगता झाली. मात्र अजून एक लहानसा उत्सव, विधी आपली वाट पाहत आहे. अर्थात तुळशी विवाह. दीपोत्सवानंतर काही दिवसांनी तुळशी विवाह संपन्न होतो. तुळशी विवाहासाठी 3-4 दिवसांचे मुहूर्त असतात. यंदा 26 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत तुळशी विवाह करता येईल. तुळशी विवाह म्हणजे प्रत्येकाच्या घरी असणाऱ्या तुळशीचे (तुळशीच्या रोपट्याचे) विष्णू सोबत विवाह लावला जातो. हा सोहळा अनेक ठिकाणी अगदी साग्रसंगीत केला जातो. तुळशीला सजवणे, मंगलाष्टकं, अंतरपाट, अक्षता, फटाके फोडणे या सगळ्याची धूम तुळशी विवाहनिमित्त अनुभवता येते. अगदी पारंपारिक विवाहपद्धतीने हा सोहळा साजरा करण्यात येतो. जाणून घेऊया यंदाच्या तुळशी विवाहाचा शुभ मुहूर्त, विधी, महत्त्व...

तुळशी विवाह 2020 तारीख:

यंदा तुळशी विवाह 26 ते 30 नोव्हेंबर दरम्यान करता येईल.

तुळशी विवाह 2020 शुभ मुहूर्त:

तुळशी विवाह साधारणपणे संध्याकाळी केला जातो. 26 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 5.59 ते 30 नोव्हेंबर रोजी दुपारी 2.59 पर्यंत तुळशी विवाहासाठी शुभ मुहूर्त आहे.

तुळशी विवाहाचे महत्त्व:

अशी आख्यायिका आहे की, वृंदा नावाच्या एका मुलीचे लग्न असूरांचा राजा जालंधरशी झाले होते. तो अतिशय सामर्थ्यवान होता. मात्र तो दुष्ट होता आणि आपल्या शक्तीचा उपयोग तो वाईट कामांसाठी करत असे. त्याची पत्नी वृंदा ही विष्णुची एकनिष्ठ भक्त होती. जालंधरला नष्ट करण्यासाठी वृंदेची पतीव्रता मोडीत काढणे गरजेचे होते. म्हणून भगवान विष्णूने जालंधरचे रूप घेतले आणि तिची पतीव्रता मोडीत काढली. त्यानंतर भगवान शिवाला असूरांचा राजा जालंधरचा पराभव करण्यात यश आले.

वृंदाला जेव्हा सत्य समजले तेव्हा तिने भगवान विष्णूला शालिग्राम नावाचा दगड बनण्याचा शाप दिला आणि स्वत: ला निर्जन केले. म्हणून भगवान विष्णूने तिला तुळशीच्या वनस्पतीमध्ये रूपांतरित केले आणि तिच्याशी लग्न करण्याचे वचन दिले. त्यामुळेच तुळशी विवाहानंतर तुळशीला देवीचे महत्त्व प्राप्त झाले आणि भगवान विष्णुला तुळस प्रिय आहे, असे मानले जावू लागले.

तुळशी विवाह कसा कराल?

तुळशी विवाह सोहळा पारंपारिक लग्न पद्धतीने साजरा केला जातो. तुळशीला एखाद्या नववधूप्रमाणे नटवले जाते. उस तुळशीमागे मामा म्हणून खोवला जातो. समोर विष्णू (कृष्ण) ठेवून दोघांचीही पूजा केली जाते. त्यानंतर दोघांमध्ये आंतरपाट धरुन मंगलाष्टका वाजवल्या जातात. जमलेले लोक अक्षता टाकतात. त्यानंतर विवाहपूर्तीच्या माळा घातल्या जातात. दिवाळीच्या फराळाचा नैवेद्य दाखवला जातो. फटाक्यांची आतिषबाजी केली जाते. काही ठिकाणी महिला एकत्रित येऊन पारंपारिक गाणी, भजनं म्हणतात.

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तुळशी विवाह सोहळ्या मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. अगदी घरातलं लग्न असल्याप्रमाणे तुळशी विवाहाची धामधूम पाहायला मिळते.