हिंदू धर्मीय कार्तिक शुक्ल पौर्णिमा हा दिवस 'त्रिपुरारी पौर्णिमा' (Tripurari Purnima) म्हणून साजरी करतात. यंदा ही पौर्णिमा 8 नोव्हेंबर दिवशी साजरी केली जाणार आहे. या पौर्णिमेचं औचित्य साधत सर्वत्र दिवे लावले जातात. घर, मंदिरांचा सारा परिसर या तिन्ही सांजेच्या वेळेस दिव्यांनी उजळून टाकला जातो. देव दीपावली म्हणून हा दिवस साजरा करत असताना अनेक मंदिरं आकर्षक रोषणाई करतात.
पुराण कथेतील माहितीनुसार त्रिपुरारी पौर्णिमेला, भगवान शंकर, भगवान विष्णू यांची रात्री 12 वाजता भेट होते. त्यामुळे या दिवशी शंकराला प्रिय असलेला बेल आणि भगवान विष्णूची प्रिय तुळस अर्पण करण्याची देखील रीत आहे.
त्रिपुरारी पौर्णिमेची कहाणी
त्रिपुरारी पौर्णिमेची एक पौराणिक कथा देखील सांगितली जाते. यामध्ये तारकासूर नावाचा राक्षस होता. त्याला ताराक्ष, कमलाक्ष आणि विद्युन्माली असे 3 पुत्र होते. दरम्यान मयासुराने तीन राज्यं बनवली आणि ती ताब्यात देताना सांगितले की, तुम्ही देवांना त्रास देऊ नका. मात्र या तिघांनी ते ऐकलंच नाही. देवांना त्रास दिला. अखेर भगवान शंकरांनी कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरासुराला जाळून टाकलं. त्याच्या तिन्ही मुलांना ठार केले. हा दिवस देवांनी आनंदोत्सव साजरा करत दिव्यांची आरास करत साजरा केला. म्हणून त्रिपुरारी पौर्णिमेला दिव्यांची आरास करून देव दिवाळी साजरी केली जाते. दरम्यान सात्विक मनं एकत्र करून दैवी शक्ती निर्माण करून दानवांचा नाश करा. सदाचार, सदविचार अंगिकारा असा संदेश देण्यासाठी त्रिपुरारी पौर्णिमा साजरी केली जाते. नक्की वाचा: Tulsi Vivah 2022 Dates: तुलसी विवाह यंदा कधी? इथे जाणून घ्या तारखा.
दरम्यान यंदा त्रिपुरारी पौर्णिमा प्रारंभ 7 नोव्हेंबरच्या संध्याकाळी 4 वाजून 15 मिनिटांनी होणार आहे तर समाप्ती 8 नोव्हेंबर दिवशी संध्याकाळी 4 वाजून 31 मिनिटांनी होणार आहे. त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी यंदा 8 नोव्हेंबरला भारतात चंद्रग्रहण देखील आहे. त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी काही ठिकाणी पवित्र कुंडात, नदीमध्ये भाविक डुबकी देखील मारतात.
टीप: वरील लेख केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहण्यात आला आहे. यामधील कोणत्याही गोष्टीची लेटेस्टली मराठी पुष्टी करत नाही.