दिवाळीची (Diwali) खरी सांगता तुलसी विवाहाच्या (Tulsi Vivah) समारंभाने होणार आहे. हिंदू धर्मीय कार्तिकी एकादशीनंतर दुसर्या दिवशी तुलसी विवाह साजरा करतात. या दिवशी तुळशीचं लग्न लावण्याची प्रथा आहे. 4 नोव्हेंबरला यंदा कार्तिकी एकादशी साजरी केली जाणार आहे. त्यानंतर 5 नोव्हेंबर दिवशी तुलसी विवाहरंभ सुरू होणार आहे. धार्मिक मान्यतांनुसार भगवान विष्णू चार महिन्यांच्या विश्रांतीनंतर कार्तिकी एकादशीला निद्रावस्थेमधून पुन्हा जागे होतात आणि शुभ कार्यांना, लग्न समारंभांना सुरूवात केली जाते.
यंदा तुलसी विवाहाच्या तारखा काय ?
कार्तिक शुक्ल द्वादशी पासून तुलसी विवाह सुरू होतात. यामध्ये 5 नोव्हेंबरला या तुलसीविवाहाच्या कार्यक्रमाला सुरूवात होते आणि 8 नोव्हेंबर पर्यंत म्हणजेच कार्तिक पौर्णिमेपर्यंत हे तुलसी विवाह साजरे केले जातात. यंदा 8 नोव्हेंबरला कार्तिक पौर्णिमा संध्याकाळी 4 वाजून 31 मिनिटांनी संपणार आहे.
तुळशीचं लग्न लावणार्याला कन्यादानाचे पुण्य लाभते तसेच घरच्या कन्येस श्रीकृष्णासारखा आदर्श वर मिळतो अशी धारणा आहे. कार्तिकी द्वादशी ते पौर्णिमेच्या दिवसात तिन्ही सांजेच्या मुहूर्तावर तुळशीचं लग्न लावले जाते.
पुराणातील कथा पाहता, वृंदा नावाच्या एका मुलीचे लग्न असूरांचा राजा जालंधरशी झाले होते. तो अतिशय सामर्थ्यवान होता. मात्र तो दुष्ट होता आणि आपल्या शक्तीचा उपयोग तो वाईट कामांसाठी करत असे. त्याची पत्नी वृंदा ही विष्णुची एकनिष्ठ भक्त होती. जालंधरला नष्ट करण्यासाठी वृंदेची पतीव्रता मोडीत काढणे गरजेचे होते. म्हणून भगवान विष्णूने जालंधरचे रूप घेतले आणि तिची पतीव्रता मोडीत काढली. त्यानंतर भगवान शिवाला असूरांचा राजा जालंधरचा पराभव करण्यात यश आले.
वृंदाला जेव्हा सत्य समजले तेव्हा तिने भगवान विष्णूला शालिग्राम नावाचा दगड बनण्याचा शाप दिला आणि स्वत: ला निर्जन केले. म्हणून भगवान विष्णूने तिला तुळशीच्या वनस्पतीमध्ये रूपांतरित केले आणि तिच्याशी लग्न करण्याचे वचन दिले. त्यामुळेच तुळशी विवाहानंतर तुळशीला देवीचे महत्त्व प्राप्त झाले आणि भगवान विष्णुला तुळस प्रिय आहे, असे मानले जावू लागले.