
गणेशोत्सवात लालबाग मार्केट पासून करीरोड, चिंचपोकळी स्टेशनच्या दरम्यान सर्वात जुन्या व प्रसिद्ध मंडळांचे बाप्पा विराजमान होतात. यातील एक म्हणजे तेजुकाया (Tejukaya) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा राजा. यंदा देशभर सुरु असणाऱ्या पर्यावरणपूरक सणाच्या पार्श्वभूमीवर तेजुकाया मंडपात कागदाच्या लगद्यापासून 22 फूट उंच इको फ्रेंडली गणेशमूर्ती तयार करण्यात आली आहे. नुकतेच वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियाच्या वतीने या बाप्पांच्या मूर्तीला World's Largest Eco-Friendly Paper Ganesha म्हणून गौरविण्यातही आले. यानिमित्ताने आम्ही तेजुकायाच्या बाप्पाचे मूर्तिकार राजन झाड (Rajan Zad) यांच्याशी खास बातचीत केली.. चला तर मग जाणून घेऊयात तेजुकायाचा कागदी लगद्याच्या गणपतीची मेकिंग कहाणी ..
कागदी मूर्तीची कल्पना का व कशी सुचली, कामाची सुरुवात कधी झाली?
तेजूकाया गणपतीची मूर्ती हि सुरुवातीपासून आकाराने विशाल असते, साहजिकच 1 ते दीड टन वजनाची पीओपीची मूर्ती विसर्जनानंतर विरघळायला वेळ घेते आणि परिणामी प्रदूषण होते. पर्यायी इको फ्रेंडली मूर्ती घडवावी असा विचार होता, इतक्यात मंडळातर्फे कागदी मूर्तीची कल्पना समोर आली. कागद हा विरघळायला सोप्पा असल्याने त्यामुळे निसर्गाचा ऱ्हास होणार नाही असा विचार घेऊन कल्पना ठरली. मात्र यानंतर सर्व परमिशन मिळवण्यात बराच वेळ गेला परिणामी मुर्तीसाठी फार कमी वेळ मिळाला. आम्ही 25 मे ला मूर्तीची प्रत्यक्ष सुरुवात केली.
कागदी मूर्ती बनवताना कामाचं प्लॅनिंग कसे केले?
कामाची सुरुवात थोडी उशिराने झाल्याने फार कमी दिवस हातात होते. साचा बनवण्याला पहिले प्राधान्य दिले व पाठोपाठ लगद्याची तयारी केली. यासाठी कागद पाण्यात भिजत घालून तो कुजवत ठेवतात, त्यानंतर त्यात फेविकॉल आणि गम घातला जातो. खडी मिसळली जाते. या मिश्रणात शाडू माती टाकून पीठ बनवले जाते. हे पीठ लाटून त्याच्या पातळ चपात्या केल्या जातात आणि मग त्या साच्यात बसवतात, या आवरणाला घट्टता यावी यासाठी ब्राऊन पेपर लावला होता त्यानंतर तीन महिने ही मूर्ती प्राथमिक रूपात मंडपात ठेवण्यात आली. यानंतर मूर्तीला पॉलिशिंग करून रंगकामासाठी तयार केले. यंदा रंग सुद्धा नैसर्गिक वापरण्यात आले आहेत.
यंदाच्या मूर्तीचे वैशिष्ट्य काय?
मूर्तीच्या डिझाईन मध्ये काही खास गोष्टी आहेत. यंदाची मूर्ती ही 1979 साली बनवण्यात आलेल्या मूर्तीची प्रतिकृती आहे. दरवर्षी तेजूकाकाय गणपतीच्या माथ्याचा भाग हा काहीसा पुढे आलेला असतो व त्याला जोडून सोंड असते. यंदाही हाच पॅटर्न फॉलो केला आहे. तसेच मूर्तीच्या पोटावर एक नाग साकारण्यात आला आहे. हे पोटावर लावलेल्या बंधनाचे प्रतीक आहे. मूर्ती ही साधारण दीड टन इतकी जड आहे.
मूर्ती साकारताना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागला ; कोणाचे सहकार्य लाभले?
इतकी उंच मूर्ती साकारण्याचा अनुभव नसल्याने सुरुवातीला काम पूर्ण होईल कि नाही याची भीती होती. त्यामुळे हे ट्राय अँड एरर तत्वावर काम सुरु होते. अशातच पावसामुळे आणखीन समस्या निर्माण झाल्या. पण सुदैवाने वेळेत काम पूर्ण झाल्याने आता समाधान वाटते. मी आणि माझे कुटुंब मिळून साधारण 27 ते 28 जणांनी तसेच प्रभागातील नागरिकांनी सुद्धा या कामात हातभार लावला. काही भाविकांनी आपल्याकडील रद्दी आणून दिली होती.तसेच गिरगाव मधील अविनाश पाटकर या मूर्तिकारांची देखील मदत लाभली.
मूर्तीचे विसर्जन कसे करणार?
दरवर्षी तेजुकायाच्या मूर्तीचे विसर्जन हे बाप्पाला खांद्यावरून केले जाते. त्यामुळे साग्रसंगीत विसर्जन मिरवणूक काढून गिरगाव चौपाटीवर पोहचटाच बापाची मूर्ती बांबूच्या मदतीने कार्यकर्ते खांद्यावर घेऊन विसर्जित करतात. यंदा कागदाच्या लगद्याची मूर्ती असल्याने अवघ्या 10 ते 12 मिनिटात पूर्ण मूर्ती विरघळून जाईल. विसर्जन मिरवणुकीत पावसामुळे बाधा येण्याची चिंता आहे पण असे झाल्यास मूर्तीची काळजी घेणे कठीण जाऊ शकते.
इको फ्रेंडली मूर्तीची संकल्पना यापुढे कशी जपली जाईल?
यंदाप्रमाणे पुढील वर्षी सुद्धा बाप्पाच्या मूर्तीचे रूप इको फ्रेंडली ठेवण्याचा विचार आहे. आपल्याकडे प्रत्येक सणाला फुलांचा वापर केला जातो कालांतराने ही फुले निर्माल्य रूपात पाण्यात वाहिली जातात, अशी फुलं जमा करून ती सुकवून त्यांची पावडर करून यापासून बाप्पाची मूर्ती साकारावी असा माझा विचार आहे.
दरम्यान यंदा 12 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी च्या दिवशी बाप्पा आपली रजा घेतील, पण मुंबईच्या गणेशोत्सवात नव्याने रुजलेले हे इको फ्रेंडली मूर्तीचे मूळ कायम टिकून राहावे ही सदिच्छा!