Taj Mahotsav 2020: 18 ते 27 फेब्रुवारी दरम्यान आग्रा येथे रंगणार 'ताज महोत्सव'; घेऊ शकाल गीत, संगीत, कला, संस्कृती व खाद्यपदार्थांचा आनंद
Taj Mahotsav 2020 (संग्रहित संपादित प्रतिमा)

आज, मंगळवारी दिनांक 18 फेब्रुवारीपासून, आग्रा (Agra) येथे ताज महोत्सव 2020 (Taj Mahotsav 2020) रंगणार आहे. ताजमहालच्या (Taj Mahal) साक्षीने ‘संस्कृति के रंग ताज के संग’ थीमवर आधारतीत, या महोत्सवाचे उद्घाटन आज झाले. हा महोत्सव 27 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. सायंकाळी साडेसहा वाजता राज्यमंत्री डॉ. नीलकंठ तिवारी यांच्या हस्ते या कला महोत्सवाचे उद्घाटन झाले.

1992 मध्ये सुरु झालेल्या ताज महोत्सवाचे हे 29 वे वर्ष आहे. 10-दिवसीय ताज महोत्सवात सामील होऊन तुम्ही विविध रंगारंग कार्यक्रम,गाणी-संगीत, नृत्य, कला-संस्कृती आणि मधुर पाककृतींचा आनंद घेऊ शकता. जर आपणही  ताजमहाल पाहण्यासाठी आग्रा येथे येण्याचे विचार करीत असाल, तर विकेंडला आपण या उत्सवात सामील होऊ शकता.

आग्रा येथे होणारा हा महोत्सव ताजमहाल जवळील शिल्पग्राम परिसरामध्ये आयोजित करण्यात आला आहे. शिल्पग्रामव्यतिरिक्त सदर बाजार आणि सुरसदान येथे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. हा महोत्सव ताजमहालसारख्या प्रसिद्ध पर्यटनस्थळाच्या जवळ असल्याने, आपल्याला घटनास्थळी पोहोचण्यात फारसा त्रास होणार नाही. आपण आपल्या गाडीने, कॅब किंवा ऑटोने इथे येऊ शकता. या महोत्सवात सहभागी होण्यासाठी तुम्हाला आधी नोंदणी करावी लागेल किंवा 50 रुपयांचे तिकिट घ्यावे लागेल.

ताज मोहोत्सव 2020 मध्ये हस्तकला मेळावा, विविध राज्यांशी संबंधित पदार्थांचे खाद्य स्टॉल्स तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल. या वेळी या उत्सवात तुम्हाला भगवान गंगावर आधारित गंगा अवतारन नृत्य आणि भगवान राम यांच्या जीवनावर आधारित नृत्य सादर केले जाईल. केंद्र सरकारतर्फे ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ योजनेंतर्गत अरुणाचल प्रदेशातील लोकसंस्कृती आणि पाककृतींचे प्रदर्शन केले जाईल.सात दिवस संध्याकाळी बॉलिवूड नाईटही चालणार आहे. 20 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी दरम्यान हेमंत ब्रिजवासी, मीत ब्रदर्स सारखे गायक त्यांची कला सादर करतील. (हेही वाचा: ताजमहाल नाही, तर मुंबईची झोपडपट्टी धारावी ठरले आशियातील लोकप्रिय पर्यटन स्थळ, जाणून घ्या संपूर्ण यादी)

भारतीय संगीत आणि नृत्य या विविध प्रकारांचा सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये समावेश करण्यात आला आहे. यात कथक, भरतनाट्यम, भोजपुरी गायन, अवधी गायन, कव्वाली, तबला वादन, पखावज वादन, सितार वादन यांचा समावेश आहे.