
महाशिवरात्री (Mahashivratri 2025) हा हिंदू धर्मातील एक महत्त्वपूर्ण सण आहे, जो भगवान शिवांना समर्पित आहे. हा सण फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला साजरा केला जातो. यंदा महाशिवरात्री 26 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाईल. महाशिवरात्रीचे महत्त्व अनेक पौराणिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून स्पष्ट होते. काही मान्यतांनुसार, या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वती यांचा विवाह संपन्न झाला होता, ज्यामुळे हा दिवस वैवाहिक जीवनातील पवित्रतेचे प्रतीक मानला जातो. तसेच, काही कथांनुसार, भगवान शिवांनी या रात्री तांडव नृत्य केले होते, जे सृष्टीच्या निर्माण आणि संहाराचे प्रतीक आहे.
आध्यात्मिक दृष्टिकोनातून, महाशिवरात्री ही आत्मचिंतन, ध्यान आणि आत्मशुद्धीची संधी आहे. या रात्री, भक्त उपवास करतात, भगवान शिवाची पूजा करतात, आणि रात्री जागरण करतात. ‘ॐ नमः शिवाय’ या मंत्राचा जप केला जातो, आणि शिव चालीसाचे पठण केले जाते. शिवालयांमध्ये विशेष पूजा आणि अभिषेक आयोजित केले जातात. महाशिवरात्री हा सण विशेषतः शैव परंपरेत महत्त्वपूर्ण मानला जातो. या रात्री, भक्त भगवान शिवाच्या उपासनेत तल्लीन होऊन आत्मचिंतन आणि ध्यान करतात, ज्यामुळे आत्मशुद्धी आणि आध्यात्मिक उन्नती साधता येते. या सणाच्या माध्यमातून भक्त ‘अंधकार आणि अज्ञान’ यांवर विजय मिळवण्याचा प्रयत्न करतात.
महाशिवरात्री पूजा-
महाशिवरात्रीच्या पूजेला विशेष महत्व आहे. या दिवशी उपवास केला जातो. महाशिवरात्रीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून पवित्र नदी किंवा जलाशयात स्नान करावे. स्वच्छ वस्त्र परिधान करून भगवान शिवाची पूजा करण्याची तयारी करावी. घरातील पूजा स्थळ स्वच्छ करून, त्यावर शिवलिंग किंवा भगवान शिवाची मूर्ती स्थापित करावी.
शिवलिंगावर पंचामृत (दूध, दही, तूप, मध, आणि साखर) आणि नंतर पवित्र जल अर्पण करावे. प्रत्येक अभिषेकानंतर ‘ॐ नमः शिवाय’ मंत्राचा जप करावा. शिवलिंगाला भस्म लावून, त्यावर बेलपत्र, धोत्रा, पांढरी फुले, फळे अर्पण करावेत. त्यानंतर धूप आणि दीप प्रज्वलित करून भगवान शिवाची आरती करावी. (हेही वाचा: Maha Shivratri 2025: मुंबईत 26-27 फेब्रुवारी रोजी महा शिवरात्रीनिमित्त भव्य उत्सवाचे आयोजन; सामूहिक शिवमंत्र आणि स्तोत्रांचे जप, यज्ञ, शास्त्रीय शिव तांडव सादरीकरणसह बरेच काही, जाणून घ्या सविस्तर)
महाशिवरात्रीला जागरणाचे खूप महत्त्व आहे. या दिवसाचे व्रत दीड दिवसाचे असते. त्यामुळे ते दुसऱ्या दिवशी संपते. महाशिवरात्रीच्या रात्री जागरण करून, चार प्रहरांमध्ये (प्रहर म्हणजे रात्रीचे चार भाग) शिवलिंगाची पूजा करावी. प्रत्येक प्रहरात वेगवेगळ्या पदार्थांनी अभिषेक करावा:
पहिला प्रहर: पाणी
दुसरा प्रहर: दही
तिसरा प्रहर: तूप
चौथा प्रहर: मध
त्यानंतर दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर, ब्राह्मणांना दान-दक्षिणा देऊन उपवास सोडावा. महाशिवरात्रीला भक्तीभावाने उपवास केल्याने मागील पापे नष्ट होतात आणि मोक्षप्राप्ती होते.या रात्री जागृत राहण्याने आध्यात्मिक वाढ होते, तर या दिवशी उपवास केल्याने शरीर आणि मन शुद्ध होते, असे मानले जाते.