Deep Amavasya 2019 Puja Significance: आज आषाढी अमावस्येदिवशी श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी मांगल्याचं प्रतिक असलेल्या दिव्याची पूजा करून दीप अमावस्या साजरी केली जाते. आज (31 जुलै) महाराष्ट्रात दीप अमावस्या साजरी केली जात आहे. भारतीय संस्कृतीत अंधार दूर करुन प्रकाशाची वाट दाखवणाऱ्या दिव्याला अत्यंत महत्त्व आहे. संध्याकाळी देवासमोर, तुळशीसमोर दिवा लावून घरातील वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करणे, हा आपल्याकडे पिढ्यानपिढ्या चालत आलेला संस्कार आहे. आजही आपण सायंकाळी देवासमोर दिवा लावून देवाला नमस्कार करतो. पूर्वी वीज नसल्याने अंधार दूर करण्यासाठी देवासमोर, तुळशीसमोर लावलेला दिवा महत्त्वाचा होता. मात्र आता विजेच्या दिव्यांचा झगमगाट असताना हेच दिवे मनातील अंधार, नैराश्य दूर करून सुखद आणि पवित्र वातावरणाची निर्मिती करतात. Deep Amavasya 2019 Wishes and Messages: दीप अमावस्येच्या शुभेच्छा WhatsApp,Facebook च्या माध्यामातून शेअर करून साजरी करा यंदाची आषाढी अमावस्या
का साजरी करतात दीप अमावस्या?
आपल्या संस्कृती अनेक लहान मोठे सण विविध अर्थ घेऊन येतात. असाच एक सण म्हणजे दीप अमावस्या. दीप अमावस्या म्हणजे आषाढ अमावस्या होय. या दिवसानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते. यंदा ही दीप अमावस्या बुधवार, 31 जुलै रोजी आहे.
पूर्वी श्रावणात अंधारून येत असे आणि भरपूर पाऊस पडत असे. त्यामुळे पुढील बदलणाऱ्या हवामानाची पूर्वतयारी म्हणून घरात असलेले दिवे, समया, निरांजने, लामणदिवे या सर्वांना एकत्र करून, घासून पुसून लख्ख करून ठेवण्याचा हा दिवस. त्यामुळे या दिवशी दिव्यांची पूजा करण्याचा रिवाज सुरु झाला असावा. आषाढी अमावस्येनंतर श्रावण महिना सुरू होतो पुढील व्रत वैकल्यांच्या काळात मद्यपान, मांसाहार वर्ज्य केला जातो त्यामुळे गटारी अमावस्या साजरी करून चमचमीत पदार्थांवर ताव मारला जातो. (नक्की वाचा: Gatari Amavasya 2019 Jokes & Memes: गटारीच्या शुभेच्छा मजेशीर Wishes, WhatsApp Messages and Status च्या माध्यमातून देण्यासाठी खास शुभेच्छापत्र)
कशी करावी दिव्यांची पूजा?
दीप अमावस्ये दिवशी सर्व दिवे घासून पुसून चकचकीत करून पाटावर मांडून ठेवावेत. पाटाभोवती सुरेख रांगोळी काढावी. फुलांची आरास करावी. सर्व दिव्यांमध्ये तेल वात घालून प्रज्वलित करावेत. त्यानंतर सर्व दिव्यांची हळद कुंकू, फुले, अक्षता वाहून मनोभावे पूजा करावी. गोडाचा नैवेद्य दाखवावा. दीप अमावस्येला खीर-पुरीचा नैवेद्य करण्याची प्रथा अनेक ठिकाणी आहे.
त्यानंतर मनोभावे पूजा करुन मनातील नकारात्मक, वाईट, दृष्ट विचार नष्ट होऊ दे आणि सकारात्मक, तेजोमय, चांगल्या विचारांची आस धरु दे, अशी प्रार्थना करावी.
आपल्याकडील प्रत्येक लहान मोठ्या सणाला, उत्सवाला विशिष्ट अर्थ, महत्त्व आहे. त्यामुळे त्यामागील अर्थ समजून उमजून ते सण साजरे करणे अधिक महत्त्वाचे आहे.