Shivaji Maharaj statue | (File Image)

Shivaji Maharaj Jayanti 2022: छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) हे नाव उच्चारताच अनेकांच्या मनात प्रेरणा निर्माण होते. त्यांनी आपल्या आयुष्यभराच्या कारकीर्दीमध्ये अनेक मापदंड आणि आदर्श घालून दिले. राजा कसा असावा याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ( Shivaji Maharaj). त्यांच्या आयुष्यातील प्रसंग, अडचणी, संकटे यांमधून त्यांनी काढलेला मार्ग आजही संशोधनाचा विषय आहे. तसेच, केवळ संषोधनच नव्हे तर तितकाच तो प्रेरणादाईसुद्धा आहे. आजच्या दैनंदिन जीवनातही छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीचा इतिहास मार्गदर्शक ठरतो. शिवरायांच्या अशा जाज्वल्य इतिहासातील काही प्रेरणादाई गोष्टी इथे खास आमच्या वाचकांसाठी.

धाडस

छत्रपती शिवाजी महाराज कोणत्याही आव्हान अथवा संकटांना कधीच घाबरले नाहीत. त्यांचा प्रत्येक कार्यक्रम कसा नियोजनबद्ध असायचा. ते जेव्हा गडावरुन खाली उतरत तेव्हापासून ते गडावर परत पोहोचेपर्यंतचा त्यांचा सर्व कार्यक्रम अगदी नियोजन बद्ध असे. संकट कितीही मोठे असो अथवा छोटे. शत्रू प्रबळ असो वा छोटा. शिवाजी महाराज नेहमीच सतर्क राहून प्रत्येक पाऊल धाडसाने पुढे टाकत असत. (हेही वाचा, Shivaji Maharaj Jayanti 2022 Wishes: छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मराठी WhatsApp Status, Facebook Messages द्वारे द्या खास शुभेच्छा!)

चोख व्यवस्थापन

चोख व्यवस्थापन हा एक गुण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गुणवत्तापूर्ण कारभाराचा महत्त्वाचा घटक होता. त्यांच्या कारभारात ते कोणत्यीही प्रकारची त्रुटी राहणार नाही याची खबरदारी ते घेत. त्यामुळे प्रत्येक निर्णय घेताना त्याचे दूरगामी परिणाम आणि सर्वांगीण विकास केला जायचा. सहाजिकच व्यवस्थापनात त्रुटी नावाचा घटक नगण्य राहात असे. परिणामी त्याचा फायदा कामे वेळेत आणि गतिमान होण्यात व्हायचा.

जनमानसावर गारुड

छत्रपती शिवाजी महाराज यांचे जनमानसावर प्रचंड गारुड होते. सर्वसामान्य लोक त्यांचे मावळे म्हणून सैन्यात भरती होत असत. मग त्यांना प्रशिक्षण दिले जायचे. हे मावळे महाराजांच्या एका हाकेवर जीवाची बाजी लावण्यास तयार होत असत.

दूरदृष्टी

शिवरायांच्या प्रत्येक निर्णयात त्यांची दूरदृष्टी दिसते. मग तो शत्रूशी केलेला तह असो की, उभारलेले गडकोट आणि किल्ले असो. प्रत्येक निर्णय ते अत्यंत दूरदृष्टीने घेत असत. त्याचा जनतेलाही चांगलाच फायदा होत असे. त्यामुळे बाजारपेठ, व्यापार, उद्योग, शेती आणि महसूल यात सहाजिकच वाढ होत असे.

गनिमी कावा

शिवरायांच्या लढाईतील सर्वात मोठे शस्त्र म्हणजे गनिमी कावा होय. अनेकदा शिवाजी महाराज शत्रूच्या बलाढ्य फौजेविरोधात केवळ तीनशे ते पाचशे मावळ्यांच्या साथीने लढत असत. विशेष म्हणजे त्यांचा गनिमी कावा इतका नियोजनबद्ध असे की, शत्रू घायाळ झालाच म्हणून समजा.

छत्रपती शिवरायांच्या आयुष्यात त्यांनी वापरलेले वरील गुण आजही आपण आत्मसात केले तरीही आपल्याला अनेक गोष्टींवर उपाय मिळू शकतो. आजही आपल्याकडे करण्यासारख्या अनेक गोष्टी असतात. परंतू, त्या कशा कराव्या यासाठी कोणताच दृष्टीकोण नसल्याने अनेक जण कर्तव्यापासून दूर जातात. त्यामुळे अशा लोकांनी शिवरायांचे गुण आत्मसात केले तर त्याचा चांगलाच फायदा होऊ शकतो.