Ganpati | File Image

महाराष्ट्रात गणपती बाप्पांच्या भाविकांसाठी संकष्टी चतुर्थीचा (Sankashti Chaturthi) दिवस खास असतो. कृष्ण पक्षातील चतुर्थीचा दिवस हा संकष्टी चतुर्थीचा दिवस असतो. मे महिन्यात ही संकष्टी चतुर्थी 16 मे दिवशी आहे. दर महिन्यात संकष्टी चतुर्थीचं औचित्य साधून अनेक भाविक गणेश मंदिरांमध्ये बाप्पांच्या दर्शनाला गर्दी करतात. काहीजण या दिवशी दिवसभराचं व्रत पाळतात. रात्री चंद्रदर्शनानंतर हा संकष्टी चतुर्थीचा उपवास सोडला जातो. त्यामुळे या दिवशी चंद्रोदयाच्या वेळेचं विशेष महत्त्व असते.

16 मे हा शुक्रवारचा दिवस आहे. त्या दिवशी घरात गणेश मूर्तीचं विशेष पूजन केलं जातं. बाप्पाला दूर्वा, जास्वंदचं फूल अर्पण केलं जातं. घरात सात्विक जेवण सोबतीला उकडीचे मोदक केले जातात.संध्याकाळी चंद्रोदयानंतर गणपतीची आरती करून दिवसभराच्या व्रताची सांगता केली जाते.

16 मे संकष्टी चतुर्थी चंद्रोदय वेळ

मुंबई 22.29

पुणे 22.23

नाशिक 22.27

रत्नागिरी 22.22

नागपूर 22.08

गोवा 22.16

बेळगाव 22.14

गणपती ही बुद्धीची देवता आणि संकटांचे हरण करणारा असल्याची हिंदू धर्मीयांची भावना असल्याने त्याच्या सेवेतून आणि संकष्टी चतुर्थीच्या उपवासामधून समृद्धी, चांगले आरोग्य, यश, कीर्ती आणि सार्‍या मनोकामना पूर्ण व्हाव्यात या धारणेतून उपवास ठेवला जातो. चंद्रोदयानंतर चंद्राला अर्घ्य दिल्यानंतरच उपवास सोडला जातो.