Savitribai Phule | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

समाजाचा रोष पत्करून स्त्री शिक्षणाचा पाया रोवणाऱ्या देशातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणजे सावित्रीबाई फुले होय. सावित्रीबाई यांची परवा पुण्यतिथी आहे. सावित्रीबाई भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखल्या जातात. पती आणि समाजसुधारक ज्योतिराव फुले यांच्या समवेत त्यांनी देशातील पहिल्या मुलींच्या शाळेची स्थापना केली होती. सावित्रीबाई फुले यांनी जातीयता आणि पुरुषप्रधान संस्कृतीविरुद्ध लढा दिला. मुलींना शिक्षण मिळाले पाहिजे, यासाठी त्यांनी चळवळ उभारली होती. सावित्रीबाईंनी समाजातील विषमता, भेदभाव, जातीय अत्याचार आणि बालविवाहाच्या विरोधात सातत्यानं आपल्या लिखाणाच्या माध्यमातून लढा दिला. महिलांना समाजात समानतेची वागणूक मिळावी, हक्क मिळावा यासाठी सावित्रीबाईंनी आपलं संपूर्ण आयुष्य वेचले. त्यांचा वारसा आजही कोट्यवधी लोकांना प्रेरणा देत आहे. सावित्रीबाई यांचे वयाच्या 66 व्या वर्षी बुबोनिक प्लेगमुळे निधन झालं.

 सावित्रीबाई फुले यांच्या समाज कार्याविषयी 

वयाच्या दहाव्या वर्षी सावित्रीबाई यांचे 13 वर्षांच्या ज्योतिराव फुले यांच्याशी लग्न झाले होते.

भारतीय समाजात असणाऱ्या विधवा महिलांच्या केशवपनाविरोधात आवाज उठवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला होत्या.

बलात्कारीत गर्भवती महिलांसाठी त्यांनी एक केंद्र सुरू केलं आणि या महिलांनी आपल्या बाळाला जन्म द्यावा यासाठी त्यांना खंबीर आधार दिला.

समाजात ‘अस्पृश्य’ समजल्या जाणाऱ्या लोकांसाठी सावित्रीबाईंनी स्वतःच्या घरातील विहीर खुली केली होती.

सावित्रीबाईंनी आपल्या पतीसमवेत सत्यशोधक समाजाची  स्थापना केली.

हुंडा न घेता आणि धार्मिक गुरुविना (भटजी) विवाह व्हावेत आणि विशेषत: आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी सत्यशोधकची स्थापना करण्यात आली होती.