
Rishi Panchami 2020 Vrat Puja Vidhi and Muhurt: गणेश चतुर्थीच्या दुस-या दिवशी संपूर्ण देशभरात ऋषि पंचमी साजरी केली जाते. या दिवशी अनेक स्त्रिया व्रत करतात. हिंदू पुराणानुसार, सात ऋषींच्या स्मरणार्थ, त्यांच्याप्रती असणारा आदरभाव, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महिला ऋषी पंचमीचं व्रत करतात. या दिवशी भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नि, वशिष्ठ या सात ऋषींचे स्मरण केले जाते. या दिवशी बैलांचे साहाय्य न घेता स्वकष्टाने बनवलेल्या पीकांचा, भाज्यांचा, धान्यांचा आहारात समावेश करून हे ऋषी पंचमीचे (Rishi Panchami 2020) व्रत केले जाते. 'स्वकष्टार्जित' या शब्दाला ऋषींनी प्रतिष्ठा दिलेली आहे. जीवनाच्या सर्वांगीण विकासासाठी ऋषींनी सांगितलेल्या ज्ञान सिद्धांताचे वाचन, चिंतन, मनन पुढच्या पिढीने करत राहावे, याची आठवण करून देण्यासाठी ऋषिपंचमी साजरी केली जाते. यंदा महाराष्ट्रात ऋषी पंचमी 23 ऑगस्टला साजरी केली जाणार आहे.
या दिवशी महिला उपवास करतात. तसेच या दिवशी ऋषि पंचमीची विशेष भाजी बनविली जाते. ऋषी पंचमीच्या भाजीमध्ये प्रामुख्याने पालेभाज्यांचा समावेश केला जातो. तेलाशिवाय बनणारी ही भाजी हातसडीच्या तांदळापासून बनवलेल्या भातासोबत वाढली जाते.
ऋषी पंचमी तिथी वेळ:
भाद्रपद पंचमी प्रारंभ : शनिवार, 22 ऑगस्ट 2020 रोजी सायंकाळी 7 वाजून 57 मिनिटे.
भाद्रपद पंचमी समाप्ती : रविवार, 23 ऑगस्ट 2020 रोजी सायंकाळी 5 वाजून 4 मिनिटे.
ऋषी पूजनाचा मुहूर्त:
महाराष्ट्रात दाते पंचांगानुसार, पंचमीची तिथी 23 ऑगस्टला सकाळी 11.06 मिनिटांनी सुरू होणार असून दुपारी 1.41 ला संपते.
कसे कराल ऋषि पंचमीचे व्रत:
1. या दिवशी स्त्रियांनी सकाळी आघाड्याच्या काडीने दात घासावेत.
2. आंघोळ झाल्यावर पूजेपूर्वी ‘मासिक पाळीच्या वेळी कळत-नकळत केलेल्या स्पर्शांमुळे जे दोष लागतात, त्यांच्या निराकरणासाठी अरुंधतीसह सप्तर्षींना प्रसन्न करण्यासाठी मी हे व्रत करीत आहे’, असा संकल्प करावा. गणेशोत्सव विशेष : कशी बनवाल ऋषीपंचमीची हेल्दी टेस्टी भाजी ?
3. पाटावर तांदुळाच्या आठ पुंज्या घालून त्यांवर आठ सुपार्या ठेवून कश्यपादी सात ऋषि आणि अरुंधती यांचे आवाहन अन् षोडशोपचार पूजन करावे.
4. या दिवशी कंदमुळांचा आहार घ्यावा आणि बैलांच्या श्रमाचे काहीही खाऊ नये, असे सांगितले आहे.
5. दुसर्या दिवशी कश्यपादी सात ऋषि आणि अरुंधती यांचे विसर्जन करावे.
6. बारा वर्षांनी किंवा वयाच्या पन्नाशीनंतर या व्रताचे उद्यापन करायला हरकत नाही. उद्यापनानंतरही हे व्रत चालू ठेवता येते.
ऋषी पंचमी हा गणेश चतुर्थीनंतर येणारा दुसरा दिवस असतो. या दिवशी अनेक घरांमध्ये दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन केले जाते. सार्वजनिक तलावं, पाणवठे, नदी किंवा आता कृत्रिम तलावांमध्ये गणपतीचे विसर्जन केलं जातं.