गणेशोत्सव विशेष : कशी बनवाल ऋषीपंचमीची हेल्दी टेस्टी भाजी ?
ऋषीपंचमी भाजी

गणेशोत्सवाच्या काळात भाद्रपद शुद्ध पंचमीला ऋषी पंचमी साजरी केली जाते. यादिवशी ऋषींचे स्मरण केले जाते. तसेच आहारात बैलाच्या मदतीशिवाय पिकवलेल्या पदार्थांमधून अन्न शिजवले जाते. त्यामुळे यादिवशी स्त्रिया ऋषीपंचमीचा उपवास करताना खास भाजीचं सेवन करतात. मग पहा ऋषीपंचमीची भाजी कशी बनवली जाते.

ऋषीपंचमीची भाजी कशी बनवतात ?

ऋषी पंचमीच्या भाजीमध्ये प्रामुख्याने पालेभाज्यांचा समावेश केला जातो. तेलाशिवाय बनणारी ही भाजी हातसडीच्या तांदळापासून बनवलेल्या भातासोबत वाढली जाते.

नक्की वाचा : काही वर्षी गणपतीचं विसर्जन ५ किंवा ७ दिवसांनी का होतं?

ऋषीपंचमीच्या भाजीचं साहित्य

अळूची पानं

माठाचा देठ

माठाची पानं

भेंडी

वाल

मटार

मका

शिराळं

भोपळा

चिंचेचा कोळ

हिरव्या मिरच्या

शेंगदाणे

मीठ

कशी बनवाल ऋषीपंचमीची भाजी

ऋषीपंचमीची भाजी बनवण्यासाठी सार्‍या पालेभाज्या स्वच्छ धुवून चिरून घ्याव्यात. अळूचे देठ आणि माठाचे कोवळे देठ, शिराळं,भोपळा यांचे बारीक बारीक तुकडे करावेत. पातेल्यामध्ये किंवा प्रेशर कूकरमध्ये सार्‍या भाज्या एकत्र मिक्स कराव्यात. भाजी शिजताना त्यामध्ये चिंचेचा कोळ, उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या, भिजवेले शेंगदाणे आणि मीठ टाकून काही वेळ शिजत ठेवावी. प्रेशर कूकरमध्ये थेट 2 शिट्यांमध्येही ऋषीपंचमीची भाजी बनवता येऊ शकते.

ऋषी पंचमीचा उपवास करणार्‍या महिला दोन्ही वेळच्या जेवणात केवळ भाजीचा आहारात समावेश करतात. यासोबत उकडीचा तांदूळ, कोशिंबीर, काकाडीचा रायता किंवा खोबर्‍याची चटणी यांचा समावेश केला जातो.