काही वर्षी गणपतीचं विसर्जन ५ किंवा ७ दिवसांनी का होतं?
(Photo Credits: Unsplash)

गणपती बाप्पा हे आबालवृद्धांच्या आवडीचं दैवत आहे. अनेकांना गणपती बाप्पा हा त्यांचा सखा वाटतो. त्यांच्या मनातील सार्‍या गोष्टी ते बाप्पाशी बोलतात. गणपती बाप्पाचं आगामन आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलं आहे. गणेशोत्सवाचा सोहळा हा चैतन्यमय असतो. मग तो एक दीड दिवसाचा असो किंवा दहा दिवसांचा.

गणपतीचं आगमन आणि विसर्जन कसं ठरते ?

घरगुती स्वरूपातील गणपती हा दीड, पाच किंवा सहा/ सात आणि दहा दिवसांचा असतो. घरगुती परंपरेनुसार काही जण दीड दिवस गणपतीची पूजा करतात. काहींकडे ५ किंवा ६,७ दिवसांचा गणपती असतो. तर काही घरांमध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाप्रमाणे १० दिवस गणपतीचं पूजन केले जाते.

तुमचा गणपती हा गौरी-गणपती असेल तर तो प्रत्येक वर्षी येणार्‍या तिथी आणि नक्षत्रानुसार वेगवेगळा असतो. मग काही वर्षी गणपती पाच आणि काही वर्षी सात अशा वेगवेगळ्या स्वरूपात का येतो ? हा प्रश्न तुमच्याही मनात आलाय ना? मग पहा त्यामागील शास्त्रीय कारण काय आहे ?

प्रसिद्ध पंचागकर्ते दा.कृ. सोमण यांनी दिलेल्या माहितीनुसार गणपतीचं आगमन हे तिथीनुसार होतं. त्यामुळे गणपती भाद्रपद शुद्ध चतुर्थीला येतो. मात्र गौरीचं आगमन हे अनुराधा नक्षत्रावर होते, त्याचे पूजन ज्येष्ठा नक्षत्रावर होते तर विसर्जन हे मूळ नक्षत्रावर केले जाते. त्यामुळे दरवर्षी नक्षत्रानुसार गणपती विसर्जन हे पाच, सहा किंवा सात दिवसांचं असं वेगवेगळे असू शकते. गणपती विसर्जनावर अधिक महिन्याचा काहीच प्रभाव नसल्याचे दा.कृ. सोमण यांनी सांगितले आहे.

यंदा कधी कराल पूजा ?

गणपतीचं आगमान गुरूवार, १३ सप्टेंबर २०१८ रोजी होणार आहे. या दिवशी तुमच्या सोयीनुसार ब्रम्ह मुहूर्त म्हणजे सकाळी ४ वाजल्यापासून सायंकाळी ६.४२ पर्यंत गणेशाची पूजा केली जाऊ शकते. गणेशपूजनासाठी मध्यान्हाचा काळ हा चांगला मानला जातो.

गौरीच्या आवाहन, पूजन आणि विसर्जनाच्या दिवशीदेखील दिवसभर नक्षत्र असल्याने तुम्ही या दिवशी सोयीनुसार गौरी आणू शकता, पूजा करू शकता.