राणी दुर्गावती पुण्यतिथि 2021 (Photo Credits: Facebook)

Rani Durgavati Death Anniversary 2021: राणी दुर्गावती यांचा जन्म प्रसिद्ध राजपूत राजा चंडेल सम्राट किरत राय यांच्या कुटुंबात झाला होता. राणी दुर्गावती या राणी लक्ष्मीबाई यांच्यापेक्षा कमी पराक्रमी आणि शौर्यवान नव्हत्या. राणी दुर्गावतीची वीर गाथा दडपली गेली कारण त्यांनी मुघलांच्या सैन्याचा अनेकदा धूळ चारली होती. असे म्हटले जाते की, अकबराला (Akbar) राणी दुर्गावतीचे राज्य त्याच्या निवासस्थानाचा भाग बनवायचे होते, परंतु राणीने  राज्य गोंडवानाच्या अस्तित्वाशी कधीही तडजोड केली नाही. अशाच एका लढाईत बाणांनी घेरली गेलेली राणी दुर्गावतीने पाहिले की,मुगल सेना आता त्यांना पकडणार आहे तेव्हा राणीने स्वतः खंजीर आपल्या छातीत खुपसून आपल्या अस्तित्वाचे रक्षण केले. 24 जून रोजी संपूर्ण देशात आपल्या आन बान शान साठी बलिदान देणाऱ्या राणी दुर्गावती यांची पुण्यतिथी साजरी केली जाते. (Rani Lakshmibai Jayanti: ब्रिटीश सत्तेला आव्हान देणार्‍या रणरागिणी राणी लक्ष्मीबाई यांच्या आयुष्याबद्दल काही खास गोष्टी! )

दुर्गावती राणीचा जन्म 5 नोव्हेंबर 1524 रोजी कालिंजरचा राजा कीर्तिसिंह चंदेल यांच्या येथे झाला.त्या दिवशी दुर्गाष्टमी होती म्हणून राणीचे नाव दुर्गावती ठेवण्यात आले. एकुलती एक कन्या असूनही बालपणातच दुर्गावती बाण-तलवार आणि घोड्यावर स्वार होणे इत्यादी गोष्टींमध्ये निपुण झाल्या होत्या.नावाप्रमाणेच दुर्गावती राणी धैर्य आणि शौर्याची मूर्ती होत्या. तसेच सौंदर्याची उत्तम प्रतिमा ही होत्या. १५४२ साली, राणी दुर्गावती यांचा विवाह, गोंड राजघराण्यातील राजा संग्राम शाह यांचे सुपुत्र दलपत शाह यांचेशी बऱ्याच संघर्षानंतर झाला. या विवाहामुळे चंडेल व गोंड राजघराणी एकत्र आले. इ.स. १५४५ साली राणी दुर्गावती यांनी एका मुलास जन्म दिला होता. त्यांनी मुलाचे नाव वीर नारायण ठेवले होते. वीर नारायण अवघ्या 3 वर्षांचा असतानाच राणीच्या पतीचे निधन झाले. वीर नारायण त्या वेळेस वयाने खूपच लहान असल्याने गोंड राज्याची सूत्रे राणी दुर्गावतींनी आपल्या हाती घेतली. दिवाण किंवा प्रधान मंत्री व मान ठाकूर मंत्री यांनी राणी दुर्गावती यांना यशस्वी व प्रभावी राज्यकारभारासाठी मदत केली. नंतर राणी आपली राजधानी सिंगौरगडावरून हलवून चौरंगगडावर घेऊन गेल्या. सातपुडा पर्वतरांगांमधील या किल्ल्याला राजकीय महत्त्व होते.

१५६२ मधे अकबर राजाने माळवा प्रांताचा राजा बाज बहादूर याचा पराभव केला व माळवा प्रांत मुघल साम्राज्याखाली आणला. यामुळे आपसूकच राणी दुर्गावतीच्या साम्राज्याची हद्द, मुघल साम्राज्याच्या हद्दीला स्पर्श करू लागली.रेवा साम्राज्याच्या रामचंद्र राजाचा पराभव करणारा, राणीचा एक समकालिन मुघल सेनापती, ख्वाजा अब्दुल माजिद असफ खान हा अतिशय महत्त्वाकांक्षी मनुष्य होता. राणीच्या साम्राज्यातील समृद्धीने हा प्रदेश आपल्या अंकित करण्याची त्याची लालसा बळावली आणि अकबर राजाच्या परवानगीने त्याने राणीच्या राज्यावर हल्ला केला.राणीला जेव्हा असफ खानच्या आक्रमणाविषयी कळलं, तेव्हा त्यांचे दिवाण ब्योहर आधार सिंह यांनी मुघल सैन्यबलाविषयी त्यांना पूर्ण कल्पना दिली. मात्र राणीने आपल्या सर्वशक्तीनीशी असफ खानला तोंड द्यायचं ठरवलं. अपमानित जगण्यापेक्षा सन्मानाने मृत्यूला कवटाळणं त्यांना जास्त पसंत होतं. या युद्धात राणीचा विजय झाला मात्र त्यानंतरअसफ खानने पुन्हा गोंडवानावर हल्ला केला. (राणी लक्ष्मीबाई जन्मदिन विशेष : आपल्या पराक्रमाचा ठसा पूर्ण जगताच्या इतिहासावर उमटवणाऱ्या वीरांगनेची गाथा)

यावेळी दुर्गावती राणीकडे फारच कमी सैनिक होते.राणीचं मत होतं की शत्रूवर रात्री हल्ला करावा म्हणजे तो कमजोर पडेल पण राणीच्या सल्लागारांनी याला नकार दिला. दुसर्‍या दिवशी सकाळी असफ खानने अवाढव्य तोफा युद्धासाठी आणल्या. राणी आपल्या सरमन नावाच्या हत्तीवर स्वार झाली आणि युद्धाला सामोरी गेली. तिचा मुलगा राजपुत्र वीर नारायण यानेदेखील या युद्धात भाग घेतला होता. त्याने तीन वेळा मुघल सैन्याची पिछेहाट केली होती पण एके क्षणी तो जखमी झाल्यामुळे एका सुरक्षित स्थळी तो मागे फिरला. या युद्धादरम्यान राणीला देखील एका बाणामुळे कानावर जखम झाली. दुसरा बाण थेट त्यांच्या गळ्यात घुसला व त्यांची शुद्ध हरपली. शुद्धीवर आल्यावर त्यांच्या लक्षात आलं की या युद्धात पराभव अटळ आहे. त्यांच्या माहूताने त्यांना युद्धभूमीवरून परत फिरण्याचा सल्ला दिला पण राणीने तो मानला नाही. त्यांनी आपला खंजिर काढला व स्वतःचे जीवन संपवले. तो दिवस होता २४ जून १५६४. १९८३ साली, मध्य प्रदेश सरकारने राणी दुर्गावती यांच्या स्मरणार्थ जबलपूर युनिव्हर्सिटीचे नामकरण दुर्गावती विश्वविद्यालय असे केले.